उत्कंठापूर्ण न झालेल्या भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिकेतील भारताच्या विजयाचे श्रेय आपल्या नव्या खेळाडूंच्या संघालाही दिले जावे.  जाते. संघात जो बदल आवश्यक होता, तो करून उत्तम संघबांधणीची संधी महेंद्रसिंग धोनीला मिळाली. बदलाची ही चिन्हे अन्य क्षेत्रांतही उमटायला हवीत..
समंजस नागरिकांना समाधान वाटावे असे देशात फारसे काही घडत नसताना ऑस्ट्रेलियावरील विजयाची बातमी आली. होलिकोत्सव सुरू होण्यापूर्वीच देशातील राजकीय पटावर धुळवडीला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राने तर शिमगाच केला. असे असताना भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावरील निर्भेळ विजय किंचित का होईना, समाधान देऊन गेला. किंचित अशासाठी की हा विजय जरी निर्भेळ असला तरी काही विशिष्ट परिस्थितीत तो मिळालेला आहे व ही परिस्थिती ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताला सोयीची होती यात शंका नाही. घरच्या खेळपट्टीवर खेळण्याचे काही फायदे असतात. महेंद्रसिंग धोनीने या वेळी खेळपट्टय़ांबाबत विशेष आग्रह धरला होता. याशिवाय मायदेशात खेळताना हवामानाचा त्रास होत नाही. प्रेक्षकांची चांगली साथ असते आणि आत्मविश्वासही वाढतो. अर्थात या गोष्टींचा फायदा भारतीय संघ नेहमीच मिळवतो असे नव्हे. अन्यथा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची वाताहत झाली नसती. मात्र ती चूक धोनीच्या संघाने ऑस्ट्रेलियाबाबत केली नाही.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात वेगळा आनंद असतो. जग बदलले असले तरी ऑस्ट्रेलियाची मानसिकता अद्याप फारशी बदललेली नाही. वर्णवर्चस्वाचा पगडा त्या देशावर अद्याप आहे व तेथील क्रिकेटपटूंच्या वागण्या-बोलण्यातूनही तो वारंवार प्रकट होतो. भारताला ते फारच तुच्छ समजतात. भारताने विजय मिळविला की इयान व ग्रेग चॅपल यांचा होणारा चडफडाट लोकांनी पाहिलेला आहे. दुसऱ्या संघाला टोमणे मारीत नामोहरम करण्याचे शस्त्र ऑस्ट्रेलियन सफाईने चालवितात. ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वोत्तम होता तेव्हा हे चालून जात होते. आता परिस्थिती बदलली आहे. व्यावसायिकता जपणे हे ऑस्ट्रेलियाचे वैशिष्टय़. खेळाडूचे देव्हारे सजविणारा तो देश नाही व हा तेथील गुण घेण्यासारखा आहे. तथापि, व्यावसायिकता    नेहमी आदर्श असते असेही नव्हे. याबाबत बरेच तारतम्य पाळावे लागते. शिस्तीचा वा धावांचा  धाक घालून संघ उभा करता येत नाही. ऑस्ट्रेलियातील दिग्गज खेळाडूंची सद्दी संपली. त्यांची जागा घेणारे, त्या दर्जाचे नवे खेळाडू नाहीत. जुन्या-नव्यांचा मेळ घालून संघ घडवावा लागतो. तसे तेथे झालेले नाही. भारतातील फिरकी खेळपट्टीवर काय व्यूहरचना करायची हे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला शेवटपर्यंत उमजले नाही. अनेक चांगल्या संधी त्याने सोडल्या व त्याबद्दल त्याची हजेरी घेतली जात आहे. परंतु, संधीपेक्षाही ऑस्ट्रेलियाचा संघ बांधला गेला नव्हता. संघात एकोपा नव्हता. बंडाळीही झाली. संघ ईर्षेने मैदानात उतरला आहे असे कधीही वाटले नाही. भारताला विजय मिळाले असले तरी चकमक म्हणावी असा खेळ झाला नाही. कसोटी सामना तीन दिवसांत संपावा यावरूनच काय दर्जाचा खेळ ऑस्ट्रेलियाने केला असेल याची कल्पना यावी.
या तुलनेत भारतीय संघ उत्तम बांधला गेला होता. याचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला जाते. गेल्या वर्षी इंग्लंडकडून सणसणीत मार खाल्ल्यानंतर धोनीच्या कौशल्याबद्दल शंका घेतली गेली होती. मोहिंदर अमरनाथ यांनी तर त्याला घरी बसवा, असा उपदेश केला होता. बीसीसीआयचे श्रीनिवासन यांच्याशी जवळचे व व्यावसायिक संबंध असल्यामुळे धोनीला कर्णधारपदी ठेवले जात आहे, अशी टीका झाली. या टीकेची सव्याज परतफेड धोनीने केली. धोनी हा आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे हे आकडेवारी स्वच्छ दाखविते. मागील दोन दौऱ्यांत त्याला पराभव पत्करावा लागला. पण त्याची कारणे त्याच्यापेक्षा निवड समितीच्या कारभारात होती, हे या दौऱ्यातून उघड झाले. धोनीला हवा तसा तरुणांचा संघ मागील निवड समितीने दिला नव्हता. बडय़ा खेळाडूंचे ओढणे गळ्यात घेऊन त्याला खेळावे लागत होते आणि हे बडे खेळाडू मैदानात चमकत नव्हते. संदीप पाटील यांच्या निवड समितीने नव्या खेळाडूंना संधी दिली. हे खेळाडू देशाच्या विविध भागांतून आलेले आहेत. स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. आपल्यामागे कोणी गॉडफादर नाही याची जाणीव त्यांना असल्यामुळे संधीचे सोने करण्यासाठी ते अपरिमित कष्ट घेतात. या खेळाडूंशी धोनीचे जमले. फलंदाजीमध्ये जशी त्याची स्वत:ची शैली आहे तशीच कर्णधार म्हणून कामाचीही स्वतंत्र शैली आहे. नव्या खेळाडूंशी धोनीचा सहज संवाद होतो. कारण ते ऐकण्यास आणि त्यानुसार वागण्यास उत्सुक असतात. ऑस्ट्रेलियाच्या या मालिकेतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे नव्या खेळाडूंचा हा संघ. पुढील आठ-दहा वर्षे हे खेळाडू क्रिकेटमध्ये असतील. त्यांना घडविण्याचे काम धोनीने सुरू केले व पुढील दोन-तीन वर्षे ते चालू राहील. धोनी खेळाडूंना सरळ करतो तसा योग्य वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. गावस्कर, सचिनसारखा तो शहरी अदब जपणारा नसेल. रांचीची ग्राम्यता त्याच्या वागण्या-बोलण्यात डोकावत असेल. पण रोकडे यश या ग्राम्यतेने मिळविले आहे आणि म्हणून धोनीच्या नव्या संघावर देश फिदा आहे.
तसाच देश अजूनही फिदा आहे तो सचिन तेंडुलकर या नावावर. विराट कोहली ४० धावांवर चांगला खेळत असताना, त्याच्याच नगरवासीयांनी, सचिन सचिन असा नारा सुरू केला होता. ही बाब खटकणारी असली तरी कोहलीला आता त्याची सवय झाली असेल. कारण सचिन या नावाचे गारुड तो जाणून आहे. सचिन खेळायला आला तेव्हा उन्मादाचे वातावरण होते. पण एकाच धावेवर तो उन्माद विरला. तरीही सचिनला निरोप देताना संपूर्ण स्टेडियम उभे राहिले होते. सचिनची ही कमाई आहे व ती त्याने खेळाबरोबर स्वभावाने कमावली आहे. तथापि, या कमाईवरील व्याज किती दिवस वसूल करायचे याचा विचार आता केला पाहिजे. २०० कसोटी खेळण्याचा विक्रम करण्यास सचिन उत्सुक आहे असे म्हटले जाते. पण तो होण्यासाठी आणखी किती खेळाडूंना संधी नाकारायची हेही कधी ना कधी तपासावे लागेल.
धोनीच्या नव्या संघाचा खरा कस परदेशी भूमीवर लागेल. संघातील डावे-उजवे त्या वेळी लख्खपणे समोर येईल. उत्तम सवयी अंगी बाणवा, कारण सवयीतून यश स्थिर होते, असा मोलाचा सल्ला धोनीने सहकाऱ्यांना दिला. यश स्थिर करण्याची कला ऑस्ट्रेलियाला साधली होती. भारताला ती शिकून घ्यायची आहे. धोनी हा त्यासाठी लायक कर्णधार आहे. कर्णधारपदाच्या पुढची, संघ घडविण्याची कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक असल्याचे अलीकडील त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. ही चांगली सुरुवात आहे व अशा प्रयत्नांची भारताला गरजही आहे. तशीच गरज आहे ती धोनीच्या संघाप्रमाणे नव्या चेहऱ्यांना अन्य क्षेत्रांत संधी मिळण्याची. अन्य क्षेत्रांत, विशेषत: राजकारणात, धोनीसारख्या        नव्या दमाच्या कर्णधाराची व त्याच्या संघाची आवश्यकता आता नागरिकांना भासू लागली आहे. घोडा फिरवला नाही तर तो बसतो. राजकारणाचे तसेच झाले आहे. क्रिकेटप्रमाणे तेथेही माणसे फिरविण्याची वेळ आता आली आहे. धोनीचा पायरव आता अन्य क्षेत्रांतही ऐकू यावा ही अपेक्षा.