मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग हे अत्यंत बुद्धिमान, सभ्य, सुसंस्कृत आणि व्यक्तिश: कोणत्याही आíथक घोटाळ्यात न अडकलेले चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व (काँग्रेस पक्षातील कदाचित एकमेव!). पण त्यांच्या सभ्यपणाचा गैरफायदा घेत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी व  मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या आड दडून राष्ट्रकुल, टू जी स्पेक्ट्रम, कोळसा, रॉबर्ट वढेरा जमीन इ. अनेक घोटाळे केले आणि मनमोहन सिंग हे अंगभूत सौजन्यामुळे त्यांना आवर घालू शकले नाहीत. सत्ताबाह्य़ सत्ताकेंद्राने त्यांना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वागविले आणि त्यांना स्वत: पंतप्रधान असूनही नॉनप्लेइंग कॅप्टन म्हणून वागावे लागले. निवडणूक प्रचारात ते कुठेही दिसले नाहीत.  
कारकिर्दीच्या अखेरच्या काळात त्यांना सीताराम केसरी यांच्याप्रमाणेच वागणूक मिळाली, याबद्दल सर्वपक्षीय नागरिकांच्या मनात (काँग्रेसजन वगळून!) त्याबद्दल कायम खंत वाटत राहील.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रगतीतील वाटा म्हणजे केवळ आर्थिकच?
हल्लीच ‘संदेश’ नामक गुजराती वर्तमानपत्राने मुंबईत बेस्टच्या बसगाडय़ांवरील जाहिरातींद्वारे मुंबईची प्रगती केवळ गुजराथी लोकांमुळेच झाली असा जो प्रचार केला त्याबद्दल खरे तर मराठी अभ्यासकांनी दुसरी बाजूदेखील मांडायला हवी. नाना शंकरशेठ, भाऊ दाजी लाड आणि इतर अनेक लोकांनी मुंबईसाठी केलेले काम प्रकाशात आणले गेले पाहिजे.
नाना (जगन्नाथ) शंकरशेठ हे त्या काळचे अत्यंत श्रीमंत, प्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मतांचा आणि सूचनांचा ब्रिटिश सरकार नेहमीच गंभीरपणे विचार करीत असे आणि कित्येकदा (मुंबई-गुजरातेसह) मुंबई इलाख्यातील स्थानिक जनतेला समजावून सांगण्यासाठी त्यांना शब्द टाकण्याचा आग्रहही करीत असे. त्या काळच्या ब्रिटिश अमलाखालील भारताची राजधानी कलकत्ता असूनही तेव्हा मुंबईतच इ.स. १८५३ या वर्षी आशियातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे मार्गावर धावली. नाना शंकरशेठ यांनी त्यासाठी बरीच वष्रे कलकत्त्याशी स्पर्धा देत ब्रिटिश दरबारी (इंग्लंडातही) सातत्याने प्रयत्न करून आणि तिच्या आíथक तरतुदीसाठी सहकार्य करून मुंबईत रेल्वे आणली. पहिली रेल्वेगाडी जिने आणली त्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (सध्याची सेंट्रल रेल्वे) कंपनीच्या संस्थापकीय संचालक मंडळात नाना शंकरशेठ आणि जमशेदजी जीजीभाय यांचे पुत्र करसेटजी जीजीभाय हे दोघेच िहदुस्थानी होते. यावरून नानांचा दबदबा आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या दरम्यान ज्यांनी मुंबईसाठी विविध मूलभूत क्षेत्रांत काम केले त्या मंडळीत इतर काही पारशी व बोहरी लोकांबरोबरच नाना शंकरशेठ, भाऊ दाजी लाड आणि इतर काही मराठी मंडळी अग्रगण्य होत. नानांचे चरित्र (लेखिका अमला नेवाळकर) गंधर्ववेद प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.     
 दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या ठिकाणाची प्रगती व कीर्ती केवळ आíथक कारणांवरच अवलंबून नसून संस्कृती, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजसेवा, समाजप्रबोधन इत्यादी क्षेत्रांतील विशेष कार्यामुळेदेखील होत असते. अशा सर्व क्षेत्रांत मुंबईतील मराठी लोकांनी केलेल्या योगदानाबद्दल स्वत: गुजराती संदेशकारांच्या मनातही शंका नसावी.     
सलील कुळकर्णी, कोथरूड, पुणे</strong>

.. आता प्रतिमा जपा!
सातहून अधिक मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत एनडीए सत्तेवर येईल व त्यात भाजपचा वाटा अधिक असेल व नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल लागायच्या अगोदरच भाजपचे काही नेते सत्ता मिळाली या आवेशात अवाजवी व्यक्तव्य करायला लागले आहेत.
यासाठी सामान्यजनांनी हा कौल दिला आहे का?
येणाऱ्या एनडीए सरकारमधील किंवा पक्षातील कुणीही वाहिन्या अगर वर्तमानपत्रे यांमधून बेताल व्यक्तव्य करू नयेत व पक्षाची/सरकारची प्रतिमा मलिन करू नये. सूडबुद्धीने कामे करू नयेत. सुरुवातीची एक-दोन वष्रे केवळ जाहीरनाम्यातील कामे सुरू करावीत. दिल्या वचनाप्रमाणे महागाई, भ्रष्टाचार कमी करावा.
तुम्हाला पुढील पाच वष्रे दिली आहेत व जर त्या कालावधीत तुम्ही जनतेच्या परीक्षेला उतरलात, समाधानकारक काम केलेत तर २०१९ सालच्या निवडणुकीत तुम्ही ताठ मानेने जनतेसमोर जाऊ शकाल अन्यथा िहदुस्थानी जनतेने व विशेष करून ३०-३५ टक्के नव्या पिढीने दिलेल्या संधीचा व विश्वासाचा घात होईल.
कुमार करकरे, पुणे

आजघडीला या कायद्याने
जमीनमालकांचा फायदा होण्याची शक्यता नाहीच
‘महाराष्ट्राचा कायदा गुजरातचा फायदा’,  हा सुलक्षणा महाजन यांचा लेख (१३ मे)वाचला. शहरांच्या विकासासाठीच नव्हे तर उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठीसुद्धा जमीन संपादन आवश्यक ठरते. त्यात देशाचा विकास किती होतो, खासगी उद्योजकांचा किती होतो व जमीनमालक कुठे जातो याचा लेखाजोखा अद्याप कोणी मांडलेला नाही. या विकासात जमीनमालकांचा बळी जातो याचे दु:ख कोणालाच नसते. महाजन यांनीच लिहिल्याप्रमाणे गुजरातमध्ये फारसा आíथक मोबदला न देता जमीनमालकांचे सहकार्य घेऊन १९१५ व १९६५ सालच्या कायद्याप्रमाणे जमिनीचे संपादन केले गेले. (मी प्रथमच सांगतो, मी साम्यवादी किंवा विकासविरोधक नाही तर मी एक सेवानिवृत असून, माझी अल्पस्वल्प जमीन विनामोबदला  गमावून बसलेला माणूस आहे.)
हा जुना कायदा जमीनमालकांना पुरेसा मोबदला मिळू देत नाही हा अन्याय आहे, म्हणून केंद्र सरकारने नवीन कायदा केला. महाजन म्हणतात की, गुजरातमध्ये शेतकऱ्यांचे व जमीनमालकांचे सहकार्य घेतले. सहकार्य घेतले म्हणजे नेमके काय केले हे त्यांनी सांगितलेले नाही. गुजरातमध्ये गेल्या दशकात पारदर्शी कारभार घडलेला दिसत नाही. ‘प्रत्येकाकडून त्या प्रकल्पातील पायाभूत सेवांसाठी लागणारी जमीन समान प्रमाणात घेतली जाते आणि उरलेली जमीन (त्याचीच त्याला) व्यवस्थित सीमा आखून त्याच्या ताब्यात ठेवली जाते’-  हे वाचायला छान वाटते, पण आज बांधकाम हा, काळा पसा चलनात आणण्याचा धंदा झाला आहे. माफिया, भ्रष्ट राजकारणी, नोकरशहा यांच्याकडील काळा पसा बांधकाम व जमिनी स्वस्तात विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. अशा वेळी हीच जुनी योजना राबवली तर, पायाभूत सुविधा वाढल्यामुळे जमिनीची किंमत वाढते एवढाच काय तो जमीनमालकांचा फायदा. परंतु ज्याची काही जमीन गेली त्याचा मोबदला का दिला जात नाही?
दिनकर र. जाधव, भाइंदर

संघ समजून घेणाऱ्यांस अधिक सांगणे नलगे!  
संविधानाच्या चौकटीत संविधानविरोधी कारभार करण्याची एक शक्यता ‘लोकमानस’च्या माध्यमातून वर्तविण्यात आली (लोकमानस, १३ मे). मी काही अभ्यासक वगरे नाही, एक सामान्य विद्यार्थी आहे, खऱ्या स्वयंसेवकाचे गुण अजून माझ्या अंगी नाहीच आहेत. तरीही एक सांगू इच्छितो की, संघ हा अभ्यासापेक्षा अनुभवण्याचा विषय जास्त आहे, संघकार्य कसे चालते ते संघाच्या शाखेत गेल्याशिवाय कळणे अवघडच वाटते, संघ समजून घ्यायचा असेल तर संघशाखेत येण्याविना पर्याय नाहीच.
आदरणीय अटलजींनी जेव्हा आदरणीय नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’  पाळण्याची शिकवण दिली तेव्हा पुढच्या क्षणी मोदींनी, ‘राजधर्म पाळतोच आहे,’ असे म्हटल्यावर त्यांच्या म्हणण्यास अटलजींनीही दुजोरा दिला होता, हे विसरणे योग्य ठरणार नाही. सावरकर म्हणाले होते, ‘सुज्ञाने, सुविचारे, स्थित्यानुसारेची धर्म सुधारावा.’ ही ओळ संविधानालाही लागू पडतेच. राष्ट्रहित सर्वोपरी मानून जे काही करण्याची गरज आहे ते करावे लागेल त्यात लांगूलचालनाचा भाग नकोच आणि तीच मोदिजींची भूमिका आता तरी दिसते आणि ती योग्यच आहे. राहता राहिला विषय गुरुजींच्या ‘विचारधना’तील काही विचारांचा, मोदींनीही त्यावर चर्चा व्हावी हे स्पष्ट केलंय, सुज्ञांस अधिक सांगणे न लागे.
शंतनु शरद पांढरकर, चाळीसगाव

योगदान काय?
लोकसभेचे अंतिम निकाल जाहिर होण्यापूर्वीच भाजपमध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. एग्झिट पोलनुसार सत्तेच्या मुकुटाचे मानकरी असणाऱ्या भाजपमध्येही सत्तेसाठी कुरबुरी सुरू होणे अपेक्षित होते.  देशाचे काहीतरी भले करण्याऐवजी पदांसाठी झटणाऱ्यांनी ज्यांच्यामुळे उद्या आपण सत्तेचे मानकरी होणार आहोत त्या नरेंद्र मोदींकडून काहीच शिकले नाही ? मोदी लाटेमुळेच भाजपमधील ’पडीक’ नेत्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. या स्वार्थीनी आपले योगदान काय होते ते आधी तपासावे.
जयेश राणे, भांडुप

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh treated like sitaram kesri in his last time
First published on: 15-05-2014 at 02:39 IST