जे शाश्वत, सार्वकालिक, अखंड आहे ते परमतत्त्वच सत्य आहे. जे अशाश्वत, काळाच्या चौकटीत जखडलेले आणि काळानुसार पालटणारे, घटणारे व नष्ट होणारे आहे तेच मिथ्या, असत्य आहे. त्या अशाश्वतात गुंतून राहणं हेच पाप आणि म्हणूनच त्या अशाश्वताशी जखडलेले सर्व संकल्प हेच पापसंकल्प आहेत. जे परमतत्त्वाशी जोडलेले आहेत असे सर्व संकल्प हेच सत्यसंकल्प आहेत. त्यामुळे ‘‘मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।’’  या चरणातून समर्थ सांगतात की,  हे मना, अशाश्वतात गुंतून, अशाश्वत इच्छांच्या पूर्तीच्या ओढीनं जगत राहून मनुष्यजन्माच्या खऱ्या लाभापासून वंचित राहू नकोस. काळ आणि श्रम वाया घालवू नकोस. त्याऐवजी शाश्वत तत्त्वाशी जोडून घेऊन शाश्वत सुखासाठीच प्रयत्न कर. हाच सत्यसंकल्प आहे. आता साधकाच्या प्रारंभिक वाटचालीत ‘संकल्प’ नेमका कशाचा असावा, याबाबत गुरूदेव रानडे यांचे प्रज्ञावंत शिष्य काकासाहेब तुळपुळे यांनी ‘डोळस नामसाधन’ (अर्थात ‘आत्मानंदाचा शोध’) या ग्रंथात थोडं मार्गदर्शन केलं आहे. कसं आहे, आपण साधनपथावर येण्याआधीही संकल्प सोडत होतो आणि ते सोडण्यासाठी नववर्षांचं, एखाद्या सणाचं, वाढदिवसाचं निमित्तही साधत होतो. साधनामार्गावर आल्यावरही ही सवय सुटली नाही. अशा एका साधकाला काकासाहेबांनी पत्राद्वारे मार्गदर्शन केलं होतं. ते या पुस्तकात आहे. त्यात काकासाहेब म्हणतात, ‘‘मनुष्याला कृत्रिमतेची व नाविन्याची आवड असल्याने, काही विशिष्ट दिवसांना तो नववर्ष म्हणतो; नवीन निश्चय करण्याला तो त्याला शुभमूहर्त वाटतो. साधक निश्चय करणार म्हणजे परमार्थाविषयीच. अधिक साधन, अधिक अनासक्ति, अधिक सत्संग, अधिक वाचन, मनन, चिंतन हाच आपला नववर्षांसाठीचा निश्चय. तो करून पाळण्याचे आपण ठरवू. ‘‘वाहिले ते वाहो। राहिले ते सांभाळा।।’’ किंवा ‘‘अब भी कुछ बिगडा नहीं है कुछ, थोडा समय बाकी रहा।’’ ही वचने आपली आशास्थाने आहेत. त्याचप्रमाणे, ‘‘तुका म्हणे जीवा पाहिजे अंकुश। नित्य नवा दिवस जागृतीचा।।’’ व ‘‘क्षणक्षणी जीवा करितो विचार। उतरावया पार भवसिंधू।।’’ हे आपलेही अंकुश आहेत. आशा व जागृती या दोन भावनांचा आधार घेणे अवश्यच आहे. अतिरेकी आत्मविश्वासाइतकीच अतिरेकी निराशाही साधनमार्गात विघ्नच आहे. श्रीबाबांनी (अंबुराव महाराजांनी) ‘‘मनाने झाले ते पाप नव्हे, देहाने केले ते पाप’’ हा सिद्धांत आवर्जून सांगितला. याचेही कारण अतिरेकी निराशेपासून साधकाला दूर ठेवणे हेच आहे.’’ (पृष्ठ ८६). काकासाहेब यांच्या या मार्गदर्शनात साधकाचा स्वाभाविक निश्चय (संकल्प) कोणता असतो आणि तो करतानाच अतिरेकी निराशेपासूनही दूर का राहिलं पाहिजे, याचा ऊहापोह आहे. थोडक्यात साधकाचा संकल्प हा नित्यनव्या जागृतीचा असला पाहिजे. एखादी गोष्ट सतत करीत राहण्याच्या सक्तीतून त्यात जी कृत्रिमता येते, तसं हे संकल्प पालन नसलं पाहिजे! संकल्प पालनाच्या प्रत्येक पावलावर आंतरिक जागृती वाढत गेली पाहिजे. अधिक साधना, अधिक सत्संग, अधिक वाचन-मनन-चिंतन यातून आंतरिक जागृती वाढत गेली पाहिजे. आंतरिक जागृती वाढत नसताना कितीही साधन केलं, कितीही वाचन केलं, कितीही सत्संग केला, तरी काय उपयोग? बरं, हे सारं करीत असतानाच अंबुराव महाराजांचा हवाला देत काकासाहेब सांगतात की मनात पापविचार येतीलही, तरी त्यानं निराश होता कामा नये! जप करताना मनात कित्येकदा विकार वाढविणारे विचार येतात. ते कसे रोखावेत, असा प्रश्न साधनपथावर पडतोच. त्याला हे उत्तर आहे. त्याचा खरा रोख जाणून घेऊ.

चैतन्य प्रेम

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान