खरं पाहाता काही क्षण असे असतात, जेव्हा मनुष्य स्वत:लाही विसरून काही क्षण अशा मनोवस्थेत लीन होतो जेव्हा त्याच्या मनात कोणत्याही कल्पना, कोणतेही विचार नसतात आणि तरीही तो आनंदात असतो. अशा क्षणांचा लाभ बाह्य़ जगातल्या कोणत्याही गोष्टीनं अचानक झाल्याचं भासतं. मग एखादं गाणं ऐकताना हा क्षण गवसो की एखादं पुस्तक वाचताना तो गवसो.. निमित्त बाह्य़ जगातलं असलं तरी जी अंतर्मुखता त्यातून येते आणि जी आत्ममग्नता येते ती मात्र निर्विचारी, निर्विकारी असते. असा क्षण वारंवार वाटय़ाला येतच नाही. तो अतिशय दुर्मीळ असतो, तरीही त्या क्षणानं मन ज्या आनंदमय पातळीवर जातं त्याचा ठसा मागे उरतो. आपल्यातच असलेला जो निजानंद आहे, जे आत्मसुख आहे त्याची ही अगदी नगण्यशी झलक आहे! माणूस मुळातच आनंदस्वरूप आहे आणि आनंदात राहाण्याची त्याला म्हणूनच जन्मजात ओढ आहे. अगदी जवळ असूनही दुरावलेला हा आनंद  कसा गवसावा, हे काही त्याला कळत नाही. तो आनंद मिळवण्यासाठी म्हणून जी काही धडपड करीत राहातो त्यातून तो कधी सुख आणि कधी दु:खं, यातच हेलकावे खात राहातो. त्यामुळे  सुख मिळालं तरी ते ओसरण्याच्या वेदनेनं त्याचं मन मधेच जडावत असतं.  तेव्हा हा निजानंद, हे आत्मसुख मिळवण्यासाठी जो जाणता आहे त्याचाच आधार घ्यायला समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४१व्या श्लोकात सांगत आहेत.  हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू, मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

म्हणे दास सायास त्याचे करावे।

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी

जनीं जाणता पाय त्याचे धरावे।

गुरुअंजनेवीण तें आकळेना।

जुनें ठेवणें मीपणें तें कळेना।। १४१।।

प्रचलित अर्थ : ही गुणातीत अवस्था प्राप्त व्हावी, जुनी ठेव जे आत्मसुख ते आपल्याला मिळावे यासाठी जाणत्याचे पाय धरावे. त्याची सेवा करावी. गुरुने डोळ्यात अंजन घातल्याशिवाय मीपणा जात नाही आणि तो मीपणा गेल्याशिवाय आत्मसुखाची जुनी ठेव मिळत नाही.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात समर्थ रामदास यांनी स्वत:चा प्रथमच उल्लेख केला आहे.. ‘म्हणे दास..’ असा हा उल्लेख आहे. रामदास स्वामी म्हणतात, मी सांगतो की जो जनांमध्येही जाणता आहे त्याचे पाय धरावे आणि त्यासाठी कितीही कष्ट उपसावेत! आता हा ‘जनीं जाणता’ शब्द मोठा अर्थगर्भ आहे.  जनी म्हणजे संतजनांमध्ये.. त्यांच्यातही जो जाणता आहे तो! याचा अर्थ काय असावा? बघा जो भक्त आहे तो इतका तल्लीन होतो की त्याला स्वत:चाही विसर पडतो, स्वत:बद्दलची त्याची जाणीवही लोपते.. पण जो खरा सदगुरू आहे तोही भक्ताचंच रूप धारण करून वावरत असतो, पण आतून त्याची जाणीव पक्की असते. ही जाणीव आहे ती त्याच्या कार्याविषयीची. सदगुरूपद कशासाठी आहे, सदगुरू म्हणून कर्तव्य काय, याबाबतची ही जाणीव असते. तोदेखील भगवंताच्या भक्तीनंच व्याप्त असतो. भगवंताशिवाय अन्य कशाविषयीही तो बोलत नाही. पदोपदी आणि क्षणोक्षणी, आपल्या जीवन व्यवहारातून तो भगवंताची भक्ती कशी करावी, हेच बिंबवत असतो. असं असलं तरी लोकांना वळण लावण्याबाबत, त्यांना खऱ्या अर्थानं जागृत करण्याबाबत, संकुचित जगण्यातून त्यांची सुटका करून त्यांना व्यापक करण्याबाबत, अशाश्वतात ज्या मोह आणि भ्रमानं ते अडकले आहेत ते मोह आणि भ्रम दूर करून शाश्वताकडे त्यांना वळवण्याबाबत सद्गुरू प्रत्येक क्षणी जागरूक असतात. त्यामुळेच संतसत्पुरुषांमध्ये असूनही त्यांचं वेगळेपण अगदी सूक्ष्मपणे जाणवल्यावाचून राहात नाही. प्रत्येक गोष्टीचं कर्तेपण ते भगवंताकडेच देत असतात, पण जे घडतं ते त्यांच्या इच्छेबाहेरचं कधी नसतंच!