१६५. साधना-धीर

विचारांचा तो झंझावात थोपवून ठरलेला जप करीत राहाण्यात आंतरिक धीराचीच परीक्षा आहे.

सद्गुरू सदासर्वदा जवळ असूनही अल्प धारिष्टय़ जोखतात, हे सांगणाऱ्या या चरणातील ‘अल्प धारिष्टय़ा’ची आणखी एक अर्थछटा आहे ती साधनेतल्या धैर्याची! आता साधनेत कोणतं धैर्य आहे हो? आपल्याला वाटतं, सकाळचा ठरावीक जप केला की साधना संपली, मग त्यात धैर्य काय? गंमत अशी की साधना तासाभराची असो की मानसिक जपाप्रमाणे अखंड चालणारी असो, या दोन्हींतही धैर्याचीच परीक्षा होते! काय आहे हे धैर्य? अगदी सकाळच्या वेळी तासाभराच्या साधनेचा प्रथम विचार करू. या मार्गावर येण्याआधी आपली सवय काय होती? तर जाग आल्याबरोबर दिवसभरातल्या भौतिक धावपळीचीच आठवण यायची! आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, अमक्याला भेटायचं आहे, तमकी गोष्ट पूर्ण करायची आहे.. आता त्यात ठरावीक साधनेचा ‘अडथळा’ आला! मग काय होतं? समजा ठरावीक जपसंख्या पूर्ण केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही, असं ठरवलंय ना? मग तो जप भरभर घेणं सुरू असतानाच मन सदोदित जी जी कामं आज करायची आहेत, त्या त्या कामांच्या विचारांमागे वेगानं धावत असतं. विचारांचा तो झंझावात थोपवून ठरलेला जप करीत राहाण्यात आंतरिक धीराचीच परीक्षा आहे. सद्गुरू एकदा म्हणाले, ‘‘मनात विचारांचा असा झंझावात सुरू असतानाही साधक जेव्हा साधनेलाच चिकटून राहातो तेव्हा ती त्याची मानसिक तपश्चर्या म्हणूनच नोंदली जाते!’’ बघा अल्प धारिष्टय़ाचा काय लाभ आहे! तर असा आंतरिक संघर्ष सुरू असतो आणि त्यात एक विरोधी सूरही उमटत असतो. तो म्हणजे भौतिकातली जी धावपळ आपल्याला करायची असते ती आपल्याला खरी वाटत असते, ती महत्त्वाची, उपयोगाची आणि सुसंगत वाटत असते. सद्गुरूंवर कितीही प्रेम असलं आणि ते सांगतात म्हणून जपाचं महत्त्व आपण कितीही मानल्याचं भासवत असलो तरी भौतिकाइतका तो जप, ती साधना काही खरी, महत्त्वाची आणि सुसंगत वाटत नसते! साधनेच्या विरोधातला हा सुप्त सूर असतो! योगसाधनेची वगैरे गोष्ट सोडा. त्यातला कित्येक भाग हा सिद्धीप्रदायक असल्याच्या कल्पनेनं आंतरिक ओढीनं ती साधना करावीशी अनेकांना वाटते. इथं मला योगमार्गाला गौण लेखायचं नाही, फक्त प्राथमिक पातळीवरच्या साधकांच्या मनात योगाचं जे आकर्षण असतं त्यापुरतं हे सांगत आहे. बरं आता समर्थाचा मार्ग नामाचाच असल्यानं या सदरात नामापुरता विचार वेळोवेळी आपण करीत आहोत. तर प्राथमिक पातळीवरच्या साधकाला भौतिक जितकं खरं आणि महत्त्वाचं वाटत असतं तितकं नामसाधनेचं महत्त्व वाटत नसतं. त्यामुळे ठरावीक शब्दसमूहाची आवर्तनं आपण वारंवार करीत आहोत, हीच जाणीव अधिक असते. सद्गुरूंनी ते नाम दिलं आहे, ते भगवंताचं नाम आहे, ही जाणीव खोलवर असल्यानं त्या नामाचं दिव्यत्व आणि पावित्र्य मनाला भासत असतं खरं. पण तरीही दृश्य भौतिक जगाची जाणीव अधिक तीव्र असते. त्यामुळे भौतिक विचाराच्या माश्या घोंगावत असताना साधना नेटानं सुरू ठेवण्यातही धीराचीच परीक्षा होत असते! श्रीनिसर्गदत्त महाराजांना एका पाश्चात्यानं विचारलं, ‘‘ठरावीक शब्दांची पुनरूक्ती करीत राहाणं हा वेडेपणा नाही का?’’ महाराज उत्तरले, ‘‘तो ठरवून केलेला वेडेपणा आहे! अनेक गोष्टींची पुनरूक्ती आपण जन्मभर करीत असतो तरीही त्यातला वेडेपणा आपल्याला जाणवतदेखील नाही. तो वेडेपणा जाणवावा यासाठी ही पुनरूक्ती आहे!’’ तेव्हा प्राथमिक पातळीवर ‘अर्थहीन’, ‘निरूपयोगी’ भासणारं नाम जसजसं जगण्याची अर्थहीनता आणि दिशाहीनता जाणवून देऊ लागतं तसतसं नाम जिवंत असल्याची जाणीव वाढत जाते. हा अनुभव येईपर्यंत साधना करीत राहाण्यासाठी अल्प धारिष्टय़ लागतंच!

-चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samarth ramdas philosophy