माहीत होते, तेच सांगितले..

खातेऱ्यात दगड टाकला की ज्याप्रमाणे तो टाकणाऱ्याच्या अंगावर घाण उडते, त्याप्रमाणे क्रिकेट या खेळाचे झाले आहे.

खातेऱ्यात दगड टाकला की ज्याप्रमाणे तो टाकणाऱ्याच्या अंगावर घाण उडते, त्याप्रमाणे क्रिकेट या खेळाचे झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हीच बाब अधोरेखित केली. तरीही ही घाण पूर्णपणे साफ करण्याचा न्यायालयाचा इरादा दिसत नाही. नपेक्षा या निकालात दिसते तशी तारेवरची कसरत दिसली नसती. क्रिकेट मंडळाचे सर्वेसर्वा असलेले श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन हा आयपीएल नावाच्या क्रिकेट तमाशात निकालनिश्चितीचा उद्योग करतो. तो सिद्ध होतो. सर्वोच्च न्यायालय त्याला दोषी ठरवते आणि तरीही त्याचे सासरेबुवा श्रीनिवासन यांच्याविरोधात न्यायालय आणि चौकशी यंत्रणेस काहीही पुरावा सापडत नाही, असे या निकालावरून दिसते. यावरून किमान विचारी माणसाच्या मनातदेखील काही प्रश्न आल्याशिवाय राहणार नाहीत. एक म्हणजे या मय्यप्पन याचे सासरेबुवा क्रिकेट मंडळाचे प्रमुख नसते तर त्याने जे उद्योग केले ते तो करू धजला असता काय? हे श्रीनिवासन ज्या कंपनीचे प्रमुख होते, त्याच कंपनीच्या मालकीचा आयपीएल संघ होता. तेव्हा जावईबापू आणि सासरेबुवा या दोघांचेही उद्योग परस्परांना ठाऊक असल्याशिवाय सुरू आहेत, यावर कोण विश्वास ठेवेल? आणि इतके सर्व झाल्यावरही आपला जावई नको ते उद्योग करताना पकडला गेल्यावर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नही न करण्याइतके हे श्रीनिवासन संतसज्जन आहेत, असे मानायचे काय? आजच्या निकालाचा अर्थ तसा होतो. बरे, न्यायालय म्हणते त्याप्रमाणे श्रीनिवासन पापभीरू आहेत, असे समजा मान्य केले तर अशा संतसज्जनांकडे क्रिकेट मंडळाचे प्रमुखपद परत जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयास का बरे वाटावे? क्रिकेट मंडळाची निवडणूक श्रीनिवासन यांनी पुन्हा लढवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या मते परस्परविरोधी हितसंबंध हा श्रीनिवासन यांचा गुन्हा. म्हणजे ते क्रिकेट मंडळाचेही अध्यक्ष आणि आयपीएल संघाचेही मालक. पण हा गुन्हा इतका गंभीर असेल तर फक्त त्यास इतकीच शिक्षा का? आणि तो गंभीर नाही असे म्हणावे तर मग श्रीनिवासन यांना निवडणूक बंदी हा अन्यायच नाही काय? या सगळ्या व्यवहारांत श्रीनिवासन वाटतात तितके दोषी नसतील तर मुदलात क्रिकेट मंडळाच्या निवडणुका पुढील सहा महिन्यांत घेण्याचे कारणच काय? क्रिकेट मंडळात सर्व काही आलबेल असेल तर पुन्हा निवडणुकांची गरज का? आणि आलबेल नसेल तर फक्त नव्याने निवडणुका घेऊन आणि श्रीनिवासन यांना बाजूला करून सर्व काही सुरळीत होईल असे मानायचे का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा भुंगा या निकालामुळे तयार होईल. या निकालातून त्यातल्या त्यात समाधान मानावे अशी एक बाब म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे कायद्याच्या कचाटय़ात आले, ही. न्यासाच्या रूपात नोंदल्या गेलेल्या या मंडळाकडे भारतीय क्रिकेटची सूत्रे असून हा खासगी न्यास असल्याने त्यास अन्य कोणतेही कायदेकानू लागू होत नाहीत, असा इतके दिवस या मंडळाचा आविर्भाव असे. त्याचमुळे हे क्रिकेटपटू आमच्या न्यासासाठी खेळतात, देशासाठी नव्हे असे सांगण्याचा उद्दामपणा हे मंडळ दाखवत असे. कालच्या निकालानंतर या मंडळाचे पाय जमिनीवर यायला सुरुवात होईल, इतकेच काय ते समाधान. बाकी सर्व म्हणजे जे माहीत होते तेच न्यायालयाने मान्य केले, एवढेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: N srinivasan cant contest bcci elections