गड, बालेकिल्ला या संज्ञा इतिहास किंवा राजकारणात योजिल्या जातात, परंतु फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा नवव्यांदा जिंकणाऱ्या राफेल नदालने अद्भुत अशा खेळानिशी सिद्धच केले की, पॅरिसमधील रोलां गारो अर्थात लाल मातीचे कोर्ट हा त्याचा गड आहे! नोव्हाक जोकोव्हिचसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्यावर मात करत या स्पर्धेतील सलग पाचव्या जेतेपदावर नाव कोरले. टेनिसविश्वातील सर्वात आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील ६७ सामन्यांपैकी ६६ विजय ही नदालची आकडेवारी. अचाट आणि थक्क करणारी!  
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत झुंजार खेळ करणे, हे नदालच्या महानतेचे द्योतक आहे. अन्य टेनिसकोर्टाच्या तुलनेत मातीवर चेंडू कमी वेगाने हालचाल करतो. या बदलाशी जुळवून घेणेच बाकी खेळाडूंना कठीण जाते, मात्र लाल मातीचे कोर्ट हे नदालचे दुसरे घर. अर्धी लढाई नदाल इथेच जिंकतो. स्पर्धेच्या कालावधीत पॅरिसमधील वातावरण अतिशय उष्ण आणि दमट असते. टेनिससारख्या शारीरिकदृष्टय़ा दमवणाऱ्या खेळासाठी हे वातावरण पोषक नाही. त्यामुळे खेळातील कौशल्याइतकेच प्रदीर्घ काळ चालणाऱ्या लढतींसाठी तंदुरुस्ती टिकवणे, हे मोठे आव्हान असते. तंदुरुस्तीच्या बाबतीत नदाल हा निव्वळ अपवाद आहे. सतत खेळून, धावून ऊर्जेत घट होते, फटक्यांमधील ताकद मंदावते; पण नदालला यापैकी काहीच लागू होत नाही. तो थकत नाही, उलट त्याच्या अंगी उत्साह संचारतो आणि आणखी त्वेषाने खेळायला लागतो. अन्य खेळाडू ज्या ठिकाणी पिछाडीवर पडतात, नेमके तिथूनच नदालचा वारू भरधाव सुटतो. फ्रेंच खुल्या स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव स्पर्धेत नदालचा पराभव झाला होता. क्ले कोर्टवर नदालची मक्तेदारी संपुष्टात येणार अशा चर्चाना ऊत आला, परंतु खणखणीत विजयासह नदालने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. नदालच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे. यामुळे त्याला सहा महिने टेनिसपासून दूर राहावे लागले होते. गेल्या वर्षी पाठीच्या दुखापतीनेही त्याला सतावले होते. दुखापतींनी हालचालींवर मर्यादा येतात, परंतु विजिगीषू वृत्तीचे प्रतीक असलेल्या नदालने दुखापतींना ठेंगा दाखवत, मानांकित व दर्जेदार खेळाडूंना नमवत जेतेपदावर नाव कोरले आहे. इतक्या वर्षांनंतरही लाल मातीवर नदालला हरवण्याची गुरुकिल्ली अन्य खेळाडूंना सापडलेली नाही. ‘वर्चस्व असावे, तर लाल मातीवर नदालच्या सद्दीप्रमाणे’ अशा आख्यायिकेत नदाल पोहोचला आहे. १४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासह नदालने महान खेळाडू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, तर रॉजर फेडररच्या १७ ग्रँडस्लॅम जेतेपदांपासून केवळ तीन जेतेपदांच्या अंतरावर आहे. या जेतेपदाने सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीतील नदालचे स्थान पक्के झाले आहे.