आपला भूतकाळ थोर होता यात शंकाच नाही. पण प्राचीन शास्त्रे, विज्ञानाची पुराणकालीन प्रगती हे आजच्या कसोटय़ांवर धसाला लावता येणार आहे की आजकाल बोकाळलेल्या अनेक कुडमुडय़ा विज्ञानांप्रमाणेच तेही अमुक मुहूर्तावर, अमक्याच अटी पाळल्या गेल्या की मग सिद्ध होणार आहे? आपल्याकडे सारेच होते हा गंड आपल्या वर्तमानकालीन न्यूनगंडातून आलेला नाही ना, हा प्रश्न स्वत:ला तरी विचारायला हवा..  

शालेय पातळीवरील मुलांत मधल्या सुटीत बढाया मारताना तुझ्या वडिलांपेक्षा माझे वडील किती थोर, अशा स्वरूपाचा एक विषय हमखास असतोच असतो. भारतीय विज्ञान जगतास सध्या अशा या बढाईखेळाने ग्रासलेले दिसते. भारतात विमानविद्या प्राचीन काळापासून होती, पायथागोरसचा सिद्धांत भारतीयानेच आधी मांडला, बीजगणित हे आधी भारतातच विकसित झाले, प्लॅस्टिक सर्जरी भारतातच प्रथम झाली, औषधशास्त्र ही तर भारताचीच जगास देणगी आदी दाव्यांचा पूर सध्या आपल्याकडे येत असून यात बाजारगप्पा किती आणि विज्ञान किती हा संशोधनाचा मुद्दा आहे. स्वत:चा अभिमान असण्यात काहीही गर नाही. परंतु त्या अभिमानाची लक्ष्मणरेषा कोणती आणि कोठून त्या अभिमानाचे रूपांतर दुरभिमानात होते, हे समजून घेणे गरजेचे ठरते. सध्या या संदर्भातील विवेकाची घाऊक कमतरता आहे. त्यामुळे मुळातच बेताची विचारशक्ती असलेल्या आपल्या समाजात राष्ट्राभिमानाची अतिरेकी लाट तयार होत असून तीमुळे आपलेच नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. याचे कारण आपल्याकडे नाही ही बाब जेव्हा एखाद्याच्या मनी असते तेव्हा तो जे नाही ते मिळवण्यासाठी धडपड करू लागतो. परंतु आपल्याकडे सर्वच काही आहे, असा जेव्हा गंड एखाद्याच्या मनात तयार होतो तेव्हा त्यास अधिक परिश्रमांची निकड वाटेनाशी होते. आपल्याबाबत यातील दुसरी शक्यता अधिक दिसते. हे काही चांगले लक्षण म्हणता येणार नाही.
याचे कारण देदीप्यमान भूतकाळाच्या जोरावर वर्तमानात आनंद मानावयाची सवय लागल्यास भविष्यात अंधकार निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. इतिहासाची कोडकौतुके गाण्यात मश्गूल असलेल्या आपणास याचे भान नाही. आपला भूतकाळ थोर होता यात शंकाच नाही. त्यासाठी काँग्रेसला नकोसे झालेले आणि भाजपकडे पाहून डोळे मिचकावणारे शशी थरूर यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. थरूर हे भारतीय परंपरेचे किती उदात्त पाईक आहेत, त्याच्या सुरस आणि चटकदार कथा तृतीयपानींच्या वर्तुळात घुटक्याघुटक्याने चíचल्या जात असतात. तेव्हा आपल्या पुराणातील वानग्यांची दखल थरूर यांनी घेतली म्हणून पुराणांचे महत्त्व वाढते वा कमी होते असे नाही. परंतु प्रश्न हा आहे आपण या थोर भूतकाळाचे केले काय? गार्गी, मत्रेयी यांसारख्या विदुषींना या देशात मानाचे स्थान होते. त्या वेळी स्त्री-पुरुष समानता हा विषयदेखील नव्हता. परंतु त्याच भारतवर्षांत आजही महिलांना कस्पटापेक्षाही कमी आदराने वागवले जाते, स्त्री-भ्रूणहत्या सर्रास होतात त्याचे काय? अशा वेळी वर्तमान बदलासाठी आपण प्रयत्न करणार की भूतकाळाची आरती ओवाळत बसणार? या देशात विज्ञानाने पुराणकाळात खूपच प्रगती केली होती, हे मान्य. परंतु त्याच देशात आज बोगस बाबा-बापू आणि महाराजांची थोतांडे वाढत असून हे वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजल्याचे लक्षण मानावयाचे काय? भारतात औषधशास्त्र फारच पूर्वी विकसित होते हे तर खरेच. पण त्याच भारतात आज हगवण आणि डासजन्य आजारांत हजारो बालके मरतात त्याचा अर्थ काय? प्लास्टिक सर्जरी आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून होती. असेलही. पण त्याच आपल्या देशात साध्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांतून आजही शेकडय़ांनी महिला प्राण गमावतात तेव्हा त्या थोर इतिहासाची आरती करावयाची काय? आपल्या संशोधकांनी हजारो-लाखो वर्षांपूर्वीच विमाने उडवली होती आणि त्यांना प्रक्षेपण तंत्रज्ञानही अवगत होते. असेलही. पण इतका थोर इतिहास असलेल्या देशात आज सर्वत्र विमानतळ सोडा साधे उत्तम रस्तेदेखील नाहीत, तेव्हा आपल्या इतिहासातील थोरवीचे काय करायचे? आर्यभट्ट, भास्कराचार्य हे थोर गणिती ही भारताची विश्वाला देणगी. गणिताला शून्य आपणच तर दिले. हा ऐतिहासिक थोरपणा सोडला तर वर्तमानात शाळाशाळांत अनुत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रगतिपुस्तकातील लाल रेषा ही प्राधान्याने गणित या विषयाखाली असते, ती का? आयुर्वेदात सर्वच आजारांवर उत्तम इलाज आहेत आणि वर्तमानातील आधुनिक अ‍ॅलोपॅथी औषधांपेक्षा आयुर्वेदिक औषधे किती तरी उत्तम असेही सांगितले जाते. त्यावर प्रश्न असा की आयुर्वेदात सर्वच आजारांवर जर उत्तरे होती तर त्या काळी राजयक्षमा सोडाच पण साध्या ज्वरानेदेखील माणसे का मरत? या वर्तमानीय प्रश्नांनी आपण अस्वस्थ होणार नसू तर आपल्या भविष्याविषयी फार काही आशा बाळगता येणार नाही.
या अलीकडच्या ‘थोर कितीऽ इतिहास..’ या भावनेच्या जोडीस आपल्याकडे आणखी एक लाट मोठय़ा जोमाने आली आहे. ती म्हणजे कुडमुडय़ा विज्ञानाची. गोमूत्र सर्व आजार/ व्याधींना पळवून लावते, गोबरात किरणोत्सारास रोखण्याचीदेखील क्षमता आहे, रुद्राक्षसिद्ध पाणी अत्यंत औषधी असते,  खाली वाकून नमस्कार करण्याने शरीरातून एक प्रकारच्या लहरी निर्माण होतात, आदी बकवास बाता अलीकडे शास्त्रीय म्हणून खपवण्याची मोठी लाटच आली असून तीत अगदी भले भलेदेखील आपली अक्कल गहाण टाकून वाहत जाताना दिसतात. हे सर्व पाहिल्यावर आपल्या समाजाची सामुदायिक निर्बुद्धतेची पातळी किती उच्च आहे, याचा अंदाज यावा. यातील सर्वच बाबी टाकाऊ असतील असे नाही. तशा त्या कोणत्याच शास्त्र वा विज्ञानात नसतात. त्या अर्थाने कोणतीच ज्ञानशाखा कालाच्या कोणत्याही टप्प्यावर कधीच पूर्णत्वास पोहोचू शकत नाही. तशी ती पूर्णावस्थेस गेल्याचे मानणे हेच बौद्धिकदृष्टय़ा अप्रामाणिकपणाचे आहे आणि तो आपण सध्या करीत आहोत. गोमूत्र आणि गोबर हे सर्व आजारांवर आदी जालीम औषध असेल तर आपण त्याबाबतच्या संशोधनास का भितो? जगात इतक्या वैज्ञानिक संस्था असताना गोबर, गोमूत्राचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी आपणच उलट त्या संस्थांना संशोधनास उद्युक्त करावयास हवे. अशा व्यापक, चिकित्सक संशोधनाचे आपणास वावडे का? नमस्कार करण्याने जर शरीरातून लहरी निर्माण होत असतील तर कोणत्या तरी यंत्राद्वारे त्या मोजण्याची व्यवस्था व्हायला हवी आणि त्या मोजून दाखवता यायला हव्यात. यावर पारंपरिक भारताभिमान्याचा युक्तिवाद असतो, तो म्हणजे सर्वच काही सिद्ध करता येत नाही. तो जर खरा मानायचा तर मग या लहरी निघतात ते या मंडळींना कळले कसे? कोणत्याही यंत्राच्या कचाटय़ात न येणाऱ्या या लहरी काही विशिष्टांच्या चर्मचक्षूंनाच कशा काय दिसतात? विज्ञानाचे मोठेपण त्याच्या असापेक्षतेत असते. याचा अर्थ विज्ञानाने एखादी गोष्ट सिद्ध होत असल्यास ती कोणत्या भूमीत, कोणत्या प्रहरात होते, हे गौण आहे. हैड्रोजनाचे दोन आणि ऑक्सिजनाचा एक रेणू कोणत्याही मुहूर्तावर, कोणत्याही ग्रहदशेत आणि कोणत्याही प्रांतात एकत्र आले की पाणी होणारच. परंतु हे आपल्या कुडमुडय़ा विज्ञानवाद्यांना मान्य नसते. ते त्यात अटी घालतात. आपल्याकडे सगळेच कसे होते याच्या दंतकथा चघळण्यात आनंद मानतात.
याचे कारण वर्तमानाच्या न्यूनगंडात आहे. या गंडामुळेच उदात्त इतिहासाचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानली जाते. याउलट जे वर्तमानात जगत असतात ते मानवी आयुष्य भविष्यात अधिक कसे सुकर करता येईल याच्या प्रयत्नात असतात. गौरवशाली इतिहासाच्या फुशारक्या मानणाऱ्यांकडून मानवी संस्कृती पुढे जात नाही. तर भविष्यवेधी नजरेने वर्तमानात गाडून, पाय रोवून जे उभे राहतात त्यांच्यामुळेच आपले जगणे श्रीमंत होते. तेव्हा वाडवडील किती थोर याचे गुऱ्हाळ घालण्यात काहीही अर्थ नाही. समर्थ रामदासांनी अशा मंडळींची गणना, सांगे वडिलांची कीर्ति, तो येक मूर्ख. अशा शब्दांत केली आहे, ती किती योग्य आहे हे लक्षात यावे.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!