गेल्या दहा वर्षांत प्रतिमासंवर्धनाव्यतिरिक्त मनमोहन सिंग यांच्याकडून काही भरीव घडले नाही. हा कंटाळवाणा भूत आणि वर्तमानकाळ मागे टाकून सरकारच्या जिवंतपणाची खात्री पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर तरी द्यावी, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा असेल.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री नेकी आणि नैतिकतेबाबत थोर आहेत. परंतु त्याहूनही अधिक त्यांची थोरवी सांगता येईल ती कमालीच्या निष्क्रियतेबाबत. संरक्षणमंत्री ए के अँटनी, पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली आणि तिसरे खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग. आज देशासमोर ज्या काही समस्या आहेत, त्यातील महत्त्वाच्या या तिघांच्या खात्यांतून निर्माण झाल्या असून त्यास या तिघांची वाखाणण्याजोगी निष्क्रियता कारणीभूत आहे. सर्वप्रथम अँटनी यांच्याबाबत.
गेल्याच आठवडय़ात पाकिस्तानने काश्मीरमधील सीमारेषेवर पुन्हा एकदा भारताची कुरापत काढली आणि आपल्या संरक्षणमंत्र्यांना त्यानंतर बऱ्याच कोलांटउडय़ा माराव्या लागल्या. अँटनी हा उद्योग करणाऱ्यांना सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील बंडखोर म्हणाले, नंतर अधिक माहिती काढतो म्हणाले आणि शेवटी त्यांनी घुसखोरीचा उद्योग करणारे आणि भारतीय जवानांची हत्या करणाारे पाकिस्तानी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र दिले. या तीन कोलांटउडय़ा अँटनी यांनी अवघ्या २४ तासांत मारल्या. यातून दिसला तो त्यांचा बोटचेपेपणाच. जगातील पहिल्या पाचातील लष्कर बाळगणाऱ्या देशाचा संरक्षणमंत्री इतका भांबावलेला असेल तर ते त्या व्यक्तीविषयी संशय निर्माण करणारे असतेच. परंतु त्याहीपेक्षा अधिक अशा गोंधळीस इतक्या मोठय़ा पदावर बसवणाऱ्यांच्या निर्णयक्षमतेविषयीही शंका निर्माण करणारे असते. अँटनी यांच्याबाबत सध्या हे होत आहे. त्यांच्या आधी संरक्षण मंत्रालय हे मोठय़ा भ्रष्टाचाराचे केंद्र होते. संरक्षणसामग्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कंत्राटासाठी घोंघावणारे दलाल यांची या खात्यात वर्दळ असे. अँटनी आल्यानंतर हे सर्व प्रकार दूर झाले, हे कौतुकास्पदच. संरक्षणमंत्री हे किती अभ्रष्ट आहेत हेच त्यामुळे सिद्ध होते. परंतु अँटनी यांच्या प्रतिमेची किंमत भारतीय संरक्षणदलांस द्यावी लागत आहे, त्याचे काय? भ्रष्टाचारात अडकलेल्या वा तसा संशय असलेल्या अनेक कंपन्यांना अँटनी यांनी काळ्या यादीत टाकून व्यवहारांतून बाहेर काढले. परंतु ही यादी इतकी मोठी आहे, की आता भारताशी व्यवहार करण्यासाठी कोणी अधिकृत मध्यस्थदेखील शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न पडावा. अँटनी यांची स्वच्छतेची आस इतकी तीव्र की आपल्यावर कसलेही बालंट नको या विचाराने ते निर्णय घेणेच टाळत आहेत. परिणामी अनेक महत्त्वाच्या शस्त्रसामग्रीची आणि यंत्रोपकरणांच्या सुटय़ा भागांची खरेदीच होऊ शकलेली नाही. असे केल्याने अँटनी यांच्या शुभ्रस्वच्छ वेष्टीवर कोणतेही भ्रष्टाचाराचे किटाळ येऊ शकले नाही, हे खरेच. परंतु या स्वच्छतेच्या हव्यासामुळे महत्त्वाचा निर्णयदेखील घेतला गेला नाही, हेही तितकेच खरे. याचा थोडक्यात अर्थ असा की अँटनी यांच्या स्वच्छ प्रतिमेची किंमत ही लष्कराने मोजली. मग तो भारत-पाक सीमाप्रश्न असो वा नौदल वा हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा असो. कोणत्याच आघाडीवर काहीही होऊ शकले नाही. मंगळवारी रात्री मुंबईच्या गोदीत सिंधुरक्षक पाणबुडीला लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर हे मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरतात. जानेवारी महिन्यात एका भारतीय जवानाचा पाकिस्तानी सैनिकांनी शिरच्छेद केला. संरक्षणमंत्री शांत राहिले. नंतर पाकिस्तानी सैनिकांनी पाच भारतीय जवानांची अकारण हत्या केली, त्यानंतर पाठोपाठ वारंवार गोळीबार केला आणि आपण भारताबरोबरीच्या शस्त्रसंधीस किती मोजतो ते दाखवून दिले. त्यावर संरक्षणमंत्री अँटनी गोंधळले आणि निष्क्रियच राहिले. आता मंगळवारी रात्री पाणबुडीत १८ नौसैनिकांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होते. जे झाले तो अपघात असला तरी त्यास संरक्षणमंत्र्यांची एकूणच आधुनिकीकरणाबाबत असलेली निष्क्रियता जबाबदार नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही.
दुसरे असे स्वच्छनिष्क्रिय शिरोमणी म्हणजे वीरप्पा मोईली. खरे तर हे अँटनी यांच्याइतके आद्य स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांची वेष्टी ही अँटनी यांच्याइतकीच स्वच्छ आहे असे म्हणता येणार नाही. त्यांच्याआधी जयपाल रेड्डी यांच्याकडे पेट्रोलियम खाते होते. रिलायन्स उद्योगसमूहाच्या आंध्रातील गोदावरी खोऱ्यातून निघणाऱ्या नैसर्गिक वायूची विक्री कोणत्या दराने व्हावी याबाबत रेड्डी यांची काही मते होती आणि त्याबाबत ते ठाम होते. रिलायन्सला हवा होता तितका भाव आणि दरही देण्यास ते तयार नव्हते. किंबहुना त्यासाठी त्यांचा नकारच होता. अखेर त्यांना पेट्रोलियम खात्याचे मंत्रिपद सोडावे लागले. त्यानंतर या खात्यावर मोईली यांची वर्णी लागली. पेट्रोलियम क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा या खात्यावर दबाव येतो असे जाहीरपणे सांगून मोईली यांनी त्यांच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्या. परंतु त्या लगेचच धुळीसही मिळाल्या. कारण रिलायन्सला वायूसाठी हवा तेवढा आणि तितकाच दर देण्यास मोईली यांनी मान्यता दर्शवली आणि नंतर तिचे समर्थन करून आपणास त्या निर्णयाची जराही खंत नाही हे दाखवून दिले. कम्युनिस्टांनी मोईली यांच्या या कंपनी सरकार धोरणास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रश्न तेथेच संपत नाही. या खात्यातील अनेक ज्येष्ठांच्या बदल्या मोईली यांनी नुकत्याच केल्या आणि त्या करताना जे रिलायन्सविरोधी त्यांना मोक्याच्या पदावरून हटवणे हाच उद्देश त्यामागे असल्याचा आरोप झाला. त्यावर तसे काही नसल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न मोईली यांनी केला. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती खचितच नाही. वास्तविक तेलमंत्री या नात्याने सरकारी मालकीच्या तेलकंपन्यांच्या हिताचे रक्षण हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य असायला हवे. मोईली यांचे ते आहे असे म्हणता येणार नाही.
राहता राहिले पंतप्रधान मनमोहन सिंग. हे जे काही सरकारात सुरू आहे त्यावरून आपली मन:शांती ढळू द्यायची नाही आणि त्यामुळे त्यावर प्रतिक्रियाही द्यायची नाही, असे पंतप्रधान सिंग यांचे धोरण. त्यापासून ते जराही विचलित होताना दिसत नाहीत. मग तो भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला तणाव असो वा रुपयाच्या घसरणीमुळे निर्माण झालेला आर्थिक पेच. पंतप्रधानांच्या मनावर कसलाच ओरखडा उमटत नाही आणि त्यांची निष्क्रिय शांतता काही ढळत नाही. आज स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून आपले शेवटचे भाषण करताना मनमोहन सिंग या वास्तवास अपवाद करतील असे नाही. समस्यांनी ग्रासलेल्या, निर्नायकी परिस्थितीने साशंक बनलेल्या आणि सरकारी धोरणलकव्यामुळे गांजलेल्या जनतेच्या मनास उभारी येईल असे काही किमान बोलावे असे सिंग यांना वाटण्याची शक्यता कमीच. असे न करण्यामागे सिंग यांच्या मनात विचार असेल तो त्यांच्या प्रतिमेचाच. जवळपास दहा वर्षे सर्वोच्च पदावर राहूनदेखील सिंग यांच्यावर कोणतेही किटाळ नाही, ही बाब वाखाणण्याजोगी खचितच. पण या काळात प्रतिमासंवर्धनाव्यतिरिक्त सिंग यांच्याकडून काही भरीव घडले असेही नाही. हा कंटाळवाणा भूत आणि वर्तमानकाळ मागे टाकून सरकारच्या जिवंतपणाची खात्री पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर तरी द्यावी आणि जनसामान्यांना मुक्तपणाने जय हिंदचा नारा देता येईल अशी चेतना निर्माण करावी. निदान आजच्या दिवशी तरी या जनतेस.. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, उष:काल होता होता काळरात्र झाली.. असे वाटणार नाही, याची दक्षता त्यांनी घ्यावी.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
आसवेच स्वातंत्र्याची..
गेल्या दहा वर्षांत प्रतिमासंवर्धनाव्यतिरिक्त मनमोहन सिंग यांच्याकडून काही भरीव घडले नाही. हा कंटाळवाणा भूत आणि वर्तमानकाळ मागे टाकून...
First published on: 15-08-2013 at 05:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm manmohan singh ensure to make us happy on indepndent day