अचलानंद दादांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे कर्मेद्रला सुचेना. त्याच्या पाठीवर थोपटत दादा म्हणाले.
अचलदादा – अहो ही तुमचीच नाही, आपल्या सर्वाचीच तर गत आहे. भगवंताची मूर्ती किंवा चित्र निर्जीव म्हणून ते भाव जागा करीत नाही, पण आपल्या अगदी जवळच्या माणसाचं चित्र पाहाताना भावना उचंबळून येतात, डोळ्यात पाणी येतं.. ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता। तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ अशी रामाची आळवणी तोंडानं करायची आणि लेकीची गाडी कुठवर आली, यासाठी दहादा दूरध्वनीही करायचा, अशी गत! रामाआधी लेकीनं धावत यावं, ही खरी ओढ!! मग ‘त्या सद्गुरूचं रूप डोळ्यांनी पाहताच पूर्ण सुख लाभलं’ हा माउलींचा अनुभव आम्हाला शब्दार्थानंही कळत नाही. कारण ते शब्दही निर्जीवच तर वाटत असतात! त्यामुळे होतं काय आपण अभंग ऐकताना डोलतो, तल्लीन होतो, पण अर्थानं जागं होत नाही. तो अर्थ कळावा म्हणून आधी शब्दाशब्दांतला जीव जागा झाला पाहिजे..
हृदयेंद्र – दादा, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, इथे साजणी शब्दाचा अर्थ काय असावा हो?
अचलदादा – हृदयचं कसं आहे पहा.. त्याला ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले’ इथवरचा अर्थ कळलाय. त्याला पुढच्या अर्थाची आस लागल्ये.. पण थोडा धीर धर.. (मीही कधीपासून धीर धरलाच आहे, असं कर्मेद्र मनात म्हणतो!)
हृदयेंद्र – (हसत) बरं सांगा..
अचलदादा – ‘रूप पाहता लोचनी’ यात ‘पाहता’ हा शब्द फार अर्थगर्भ आहे. माणसाची ही जी दर्शनक्षमता आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. माणसाच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं तेवढंच मोल आहे, पण बाह्य़ जगाशी असलेलं आपलं नात, आपलं तादात्म्य यात दृष्टी फार मोलाची भूमिका बजावते. इतकंच नाही तर माणसाच्या जगण्याची जी रीत आहे, तिलाही आपण जीवनदृष्टीच म्हणतो! आता ही जी पाहण्याची जी क्षमता आहे ती काय आपल्याला आपल्या कर्तृत्वानं मिळाली आहे का हो? डोळ्यांनी आपण पाहतो, कानांनी ऐकतो, तोंडानं बोलतो, जेवतो, नाकानं हुंगतो, श्वासोच्छ्वास करतो.. प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेद्रियांच्या क्षमतांच्या आधारावर आपलं जगणं सुरू असतं. पण या क्षमता आपण मिळवल्या आहेत की मिळाल्या आहेत?
योगेंद्र – हृदू मला डॉक्टरसाहेबांचीच आठवण झाली बघ!
ज्ञानेंद्र – ते म्हणाले होते ना, शारीरिक क्षमतांच्या आधारे भगवंतापर्यंत नेणारा एखादा अभंग नाही का? काय योगायोग आहे पहा.. (हृदयेंद्रनं डॉक्टरसाहेबांविषयी सांगितलं. मग त्यांनी सांगितलेला दृष्टी जात असलेल्या मुलाचा प्रसंग आणि मग केलेलं भाष्यही सांगितलं.)
अचलदादा – खरंच हो.. जन्मभर आपण माझं-माझं करतो. हे शरीर तरी माझं असतं का हो?
कर्मेद्र – नाही ते आई-बाबा, बायको-मुलं यांच्यासाठीच तर जन्मभर राबत असतं बिचारं..
अचलदादा – (हसत) त्या अर्थानं नाही विचारत मी! पण ज्या शरीराला आपण माझं शरीर म्हणतो, ते मला किती किंमत देतं? डोक्यावरचे केस पांढरे होण्याआधी मला विचारतात का हो? दात पडताना विचारतात का? सुरकतण्याधी त्वचा परवानगी घेते का? आणि तुमचे डॉक्टरसाहेब म्हणाले ना, अगदी खरं आहे ते. जे फुकटात मिळालं आहे ना त्याची किंमत राहात नाही. पूर्वी पहा व्हिडीओ हा प्रकार नवा होता. लोक एका रात्रीसाठी तो भाडय़ानं आणत आणि त्याचं भाडं वाया जाऊ नये म्हणून रात्रभर जागून डोळे ताणून ताणून तीन-तीन चित्रपट पाहात बसत! (सगळेच हसतात) म्हणजे काय त्या शंभर-दीडशे रुपयांची किंमत होती, मग या लाखमोलाच्या शरीराची किंमत आहे का हो? तो व्हिडीओ जसा सकाळी परत करायचाय तसा हा देहही चितेवर जाणार आहे, याचं काही स्मरण आहे का हो? जगातलं सर्वात आश्चर्यकारक, परिपूर्ण, स्वयंचलित असं देहरूपी उपकरण मिळूनही मी त्याचा खरा उपयोग करीत नाही. त्या देहात बिघाड होतो, तेव्हाच माझं तिकडे लक्ष जातं आणि हा बिघाडही मी बिघडल्यामुळेच झाला असतो. जे मानवणार नाही, ते खाण्याचं, पिण्याचं, ओढण्याचं, चघळण्याचं व्यसनच त्याच्या मुळाशी असतं ना? मग या देहाच्या अनेक क्षमता मला का मिळाल्या आहेत, याचा विचार सुरू व्हावा म्हणून माउली एका इंद्रियाच्या एका क्षमतेचा दोर माझ्यापुढे टाकतात.. रूप पाहता लोचनी!
चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
९. दोर..
अचलानंद दादांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे कर्मेद्रला सुचेना. त्याच्या पाठीवर थोपटत दादा म्हणाले.
First published on: 25-02-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potential eye view