तुरुंग आणि कलानिर्मिती..
येरवडा कारागृहातल्या अभिनव प्रयोगाबद्दल ‘मन की बात’ हे शनिवारचे संपादकीय (१५ नोव्हें.) वाचल्यावर, पाहिलेले / वाचलेले आणखी काही आठवले म्हणून हे पत्र.
गमतीची गोष्ट म्हणजे अंजली माँटेरो आणि के. पी. जयशंकर यांनी बनवलेला याच येरवडा मध्यवर्ती कारागृहासंबंधी एक सुंदर माहितीपट अनेक वर्षांपूर्वी पाहिला होता. ‘वायसीपी १९९७’ असे त्याचे नाव आहे. कैद्यांनी लिहिलेल्या कविता, तबलावादन, कैद्यांचे जीवनाबद्दलचे विचार, आपण केलेल्या गुन्ह्यांविषयी मनोगते या सर्वातून या कैद्यांमधला माणूस अधोरेखित करण्याचा हा एक कलात्मक प्रयत्न होता. कैद्यांनी केलेली भाष्ये आपल्याला विचार करायला लावणारी होती. त्यात एक इटालियन कैदी तबला वाजवताना दाखवला होता. झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाने भारावून जाऊन या माणसाने तबल्याचे शिक्षण घेतले. पुढे कुठल्या तरी तस्करीच्या गुन्ह्याात पकडला जाऊन तो येरवडय़ाच्या तुरुंगात पडला होता.
समाजात गुन्हेगारी कशी निर्माण होते हा एक गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्यावर एकच एक उत्तर आहे असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. पण यासंबंधी जे काही प्रयोग जगात झाले आहेत त्यात व्हेनेझुएलामधल्या ‘एल सिस्तेमा’ या प्रयोगाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. झोपडपट्टीत विपन्नावस्थेत जगणाऱ्या आणि विशेषत: गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेल्या मुलांना एकत्र आणून त्यांना अभिजात पाश्चिमात्य संगीताचे धडे देऊन त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याच्या प्रयोगाची आज जगाने दखल घेतली आहे. जोस अन्तोनिओ अॅब्रू यांनी १९७५ साली या प्रयोगाला सुरुवात केली. आता समाजाच्या कोणत्याही थरातली मुलं यात सामील होऊ शकतात. मोफत वा नाममात्र मूल्य घेऊन हे शिक्षण दिलं जातं. व्हेनेझुएलात उजव्या ते डाव्या राजवटी असं स्थित्यंतर होऊनही ही संघटना वाढतच राहिली. आज या राष्ट्रव्यापी सांगीतिक अभियानात व्हेनेझुएलामधली पाच लाख मुलं गुंतलेली आहेत. ही चळवळ जगात अनेक देशांत पसरली आहे. ‘संगीत हे सामाजिक विकासाचे हे महत्त्वाचे माध्यम आहे; कारण ते समाजात उत्तम नीतिमूल्ये पसरवत असते’ असं अॅब्रू यांना वाटते.
पाब्लो नेरुदा या जगप्रसिद्ध कवीने आपल्या ‘पोएट्स ऑब्लिगेशन’ (कवीचं ऋण) या प्रसिद्ध कवितेत जी कल्पना मांडली आहे तिचा उल्लेख या संदर्भात करणं आवश्यक आहे. नेरुदा म्हणतात : माणसं विविध प्रकारच्या तुरुंगांत खितपत पडली आहेत. यात घर, रस्ते, कारखाने, प्रेमी व्यक्तीचा बाहुपाश आणि साक्षात तुरुंग ..सगळंच येतं. कवी समुद्राची गाज, तारे, पाण्याची सळसळ ..सगळं घेऊन येतो आणि या सगळ्या तुरुंगांचे दरवाजे उघडतो; आपल्याला या समुद्रापर्यंत कसे पोचता येईल ही इच्छा त्याच्या मनात जागी करतो आणि त्याच्या हृदयाची बंद कवाडे उघडतो. स्वातंत्र्य आणि समुद्र हे एकाच वेळी त्यातून व्यक्त होतात.
तुमच्या आमच्या मनातले तुरुंग आणि त्यातून बाहेर आणण्याची कवीची कामगिरी हे दोन्ही यात प्रभावीपणे आले आहेत.
अशोक राजवाडे, मालाड
लोकानुनयी अनुदाने ‘अनावश्यक’; पण..
‘विजयाची दुसरी बाजू’ या अग्रलेखात (१७ नोव्हेंबर), पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्देशित नवीन परराष्ट्र धोरण (त्यातल्या उणीवा आणि धोके दाखवत) स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेसारख्या अनेक जागतिक संस्था, करार मुळात विकसित देशांच्या गरजेतून निर्माण झाल्या आहेत. त्याला जागतिक दारिद्रय़ निर्मूलन,जागतिक रोजगार, उत्पादन वाढ आणि विकसनशील (खरे तर अविकसितच) देशांच्या अर्थव्यवस्थांचा विकास असे गोंडस नाव दिले जाते. जागतिक व्यापारात वाढ होण्यासाठी किमती या त्या त्या देशात नसíगकरित्या निश्चित झालेल्या असाव्यात, त्या कृत्रिमरीत्या कमी ठेवलेल्या नसाव्यात ( जेणेकरून त्या देशाची निर्यात वाढावी) आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेणाऱ्या उत्पादक, व्यापाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी अशी यामागची अपेक्षा आहे. जी वरवर पहाता अत्यंत रास्त वाटते; परंतु प्रत्यक्षात अमेरिकेत, चीनमध्ये जे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाते ते भारतासारख्या देशातील गरीब उत्पादक वापरू शकत नसल्याने ही स्पर्धा असमान स्पर्धकांमध्ये होत असते. आणि इथे विषय सुरू होतो अनुदान/सबसिडीचा. उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीमुळे ‘किमती बळजबरीने कमी ठेवल्या जातात’ असा आक्षेप या आंतरराष्ट्रीय संस्थातर्फे घेतला जातो.
भारतात सरकारतर्फे अर्थसंकल्पातून जो नियोजनबाह्य खर्च केला जातो त्यात तीन प्रकारची अनुदाने महत्त्वाची आहेत: निर्यात, संरक्षण आणि अन्नधान्य (सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि आता अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत). यापैकी निर्यातीसाठी आता कोणतीही सबसिडी अस्तित्वात नाही. म्हणजे वादाचा मुद्दा केवळ अन्नधान्य सबसिडी-संदर्भातला आहे. अनुदान संस्कृती संपविलीच पाहिजे, यात वाद असण्याचा प्रश्न नाही, पण दारिद्रय़रेषा बरीच खाली आणल्यानंतर उरलेले खरोखरचे गरीब,म्हातारे आहेत, नव्या कार्य संस्कृतीत आवश्यक शिक्षण,कौशल्य नसल्याने काम मिळवू न शकणारे.. अशा लोकांसाठी अन्नसुरक्षा कायदा अत्यंत गरजेचा आहे. या कायद्याने दारिद्रय़ निर्मूलन होणार आहे का, हाही वादाचा मुद्दा आहेच. परंतु अपेक्षा एकच अनुदाने जरूर द्यावीत,पण ती खऱ्या गरजूंना, तसेच हे गरजू सक्षम झाले की अनुदानांचे पांगुळगाडे वेळेत काढून घेणेही तितकेच आवश्यक असते हे लक्षात ठेवणे आवश्यक.
शिशिर सिंदेकर, नासिक.
‘यादव समिती’चा अन्याय
अभियांत्रिकी पदवी- पदविका, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांच्या प्रश्नावर काय करता येईल, यावर विचार करण्यासाठी डॉ. गणपती यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने काही सूचना केल्या आहेत. (संबंधित बातमी : लोकसत्ता, रविवार, ९ नोव्हेंबर); त्या ग्रामीण भागातील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत.
‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी राज्य सरकार खासगी महाविद्यालयांना अप्रत्यक्षपणे इतके अनुदान देऊ करत आहे की तितक्या पशात नवीन सरकारी महाविद्यालये सुरू करता येतील’, असे या समितीने म्हटले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे, आíथक अडचणींमुळे त्यात बाधा येऊ नये, म्हणून सरकार शुल्काचा भार उचलून विद्यार्थ्यांना मदत करत असते. विद्यार्थ्यांना होणारी ही मदत थांबविण्याची सूचना करणे अन्यायकारक आहे. अनुदानाच्या पशातून सरकारी महाविद्यालये सुरू करता येतील. परंतु कधी आणि कुठे? दर्जेदार सरकारी महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत? असतात?
‘अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षकसंख्या आणि पायाभूत सुविधा वाढवून अधिकच्या जागा उपलब्ध करून देता येतील’, असेही या समितीने म्हटले आहे. हे करण्यासाठी शुल्क प्रतिपूर्ती योजना बंद करण्याची काय गरज आहे? वरील गोष्ट सरकार आताही करू शकते! किंबहुना ते करायलाच पाहिजे. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्याच वेळी सांगितले आहे. त्यामुळे सरकार आपले सर्वाना शिक्षण देण्याचे कर्तव्य पार पाडत नसेल तर या समितीतील सदस्यांनीही सरकारला जाब विचारायला हवा होता.
‘राज्यात एकही नवीन महाविद्यालय सुरू करू नये’, असेही याच समितीने म्हटले आहे.. मुळात शहरी भागात व ग्रामीण भागात किती महाविद्यालये आहेत, याचा अभ्यास या समितीने केला होता का? ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात महाविद्यालयांचे केंद्रीकरण झालेले आहे. दुर्गम भागांमध्ये अद्यापही महाविद्यालयांची गरज आहे. तेथील मुले-मुली अजूनही उच्च शिक्षणापासून खरोखरच मैलोन्मैल दूर आहेत.
काही शिक्षणसंस्था शुल्काचे पसे हडप करत आहेत, ही गोष्ट खरी आहे. त्यासाठी सर्वच महाविद्यालयांना दोषी ठरवता येणार नाही. ज्या महाविद्यालयांना सरकार मान्यता देते त्यांची दरवर्षी तपासणीही केली जाते. ती तपासणी योग्य पारदर्शी पद्धतीने करून दोषी महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी. मात्र, या साध्या पारदर्शक उपायांऐवजी अनेक चुकीच्या उपाययोजना सदर समितीने सुचविलेल्या आहेत.
संदेश दशरथ कासार, अकोले
टपालखात्याची व्यावसायिकता? ‘००/००/..’!
‘आधी टपाल वेळेवर पोहोचवा’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, १७ नोव्हेंबर ) सर्वसामान्यांचे मनोगत व्यक्त करणारे असल्याने पटले. साधारणपणे १९८० सालापर्यंत साधे पोस्टकार्डदेखील दुसऱ्याच दिवशी पोहोचत असे. आता मात्र दिवाळीपूर्वी पाठवलेली शुभेच्छापत्रे अजूनही येत आहेतच. पोस्टाने २४ तासांत वितरण करणारी ‘स्पीड पोस्ट’ सेवा सुरू केली; त्या सेवेत २४ तासांत पत्र वितरण न झाल्यास पसे परत करण्याची तरतूद आहे. साहजिकच पोस्टाकडे पसे परत मागणारे अनंत अर्ज आले असावेत. आता या ‘हुशार मंडळींनी’ एक शक् कल काढल्याचे मला दिसले.. स्पीड पोस्टाच्या पावतीमध्ये वितरणाची तारीख ‘००/००/००००’ असे छापून देतात आणि वितरणाचे वेळी सही ‘मारून’, पत्र टाकून निघून जातात. तेव्हा बँकेचा व्यवसाय करण्यास व्यावसायिक दृष्टीचा अभाव असलेल्यांनी या उद्योगात न पडलेले बरे!
श्रीनिवास मुजुमदार