गौरव सोमवंशी ‘बँकां’कडे राष्ट्र-देशांच्या अर्थसत्तेची ताबेदारी असते, हे सर्वानाच माहीत आहे.. मग ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानासाठी बँकांचा इतिहास कशाला समजून घ्यायचा? ‘ब्लॉकचेन’ ज्यासाठी वापरले गेले त्या ‘बिटकॉइन’चा उगम बँकांची प्रतिक्रिया म्हणून झाला, हे लक्षात ठेवल्यास याचे उत्तर मनोमन उमगेल.. ‘बिटकॉइन’ नावाचे आभासी चलन हे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. म्हणूनच आपण या सदराचे नामकरण ‘साखळीचे स्वातंत्र्य’ असे केले आहे. कारण या नव्या ‘चेन’ वा ‘साखळी’मुळे काही गोष्टींमध्ये किंवा काही गोष्टींपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, असा त्यामागील अर्थ आहे. हे तंत्रज्ञान येण्यामागे ‘सायफरपंक’ (सायबर नव्हे, सायफरपंक) नावाच्या चळवळीचा हातभार लागला. या चळवळीतील काही मंडळींना एका प्राचीन यंत्रणेपासून सुटका हवी होती; ती यंत्रणा म्हणजे बँक.. किंवा पैसे छापण्याचा अधिकार राखून ठेवणारी केंद्रीय बँक. यासाठी काही संशोधकांनी अनेक प्रकारचे शोध लावले, आणि या शोधांच्या जोरावरच आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि ते वापरून बनवलेले ‘बिटकॉइन’ नावाचे आभासी चलन जगासमोर आणले गेले. ज्या पशाला किंवा चलनाला हे ‘बिटकॉइन’ बाजूला सारू पाहत आहे, ते चलन/पैसा म्हणजे काय, हे आपण मागील काही लेखांत समजून घेत आहोत. यात पैसा, चलन, यॅप बेटावरील दगडी पैसा ते इटलीच्या मार्को पोलोने पाहिलेला चीनमधील कागदी पैसा.. याबद्दल आपण जाणून घेतले. आपल्या लेखमालेचा प्रवास आता बँक आणि वित्तीय व्यवहारांवर नियंत्रण असलेल्या अनेक संस्थांपर्यंत येऊन पोहोचला आहे. म्हणून आपण बँकांचा इतिहाससुद्धा थोडक्यात समजून घेऊ या. त्यासाठी ‘बिटकॉइन’ची काही ठळक वैशिष्टय़े पाहू : (१) ‘बिटकॉइन’ वापरायला किंवा राखून ठेवायला कोणत्याही बँकांची गरज पडत नाही. (२) पशाची मालकी ही पूर्णपणे त्या व्यक्तींकडेच असावी, हा त्याच्या अनेक हेतूंपैकी एक आहे. (३) परंतु त्याच वेळी ज्या सुविधा आणि सुरक्षा एक बँक प्रदान करते आणि बँक जे मुख्य काम (पैशावर नियमन) करते, तेसुद्धा अविरत सुरू राहावे. मात्र हे समजून घेणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण बँक म्हणजे काय, हे समजून घेऊ. पशाचा आजवरचा इतिहास पाहता, एक आव्हान वेळोवेळी उभे ठाकलेले दिसते. ते म्हणजे, अशी यंत्रणा किंवा प्रणाली कशी बनवावी, की ज्यामुळे वस्तू आणि सेवा यांच्यामधील विनिमयाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येईल. मुख्य म्हणजे, हे व्यवस्थापन किंवा नियंत्रण करणारी संस्था गरजेपेक्षा जास्त शक्तिशाली होऊ नये किंवा ज्या विश्वासामुळे या संस्थांना आपण हे काम सोपविले आहे, त्या विश्वासाचा गैरवापर होऊ नये. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ हे काम पार पाडू शकेल की नाही, हे तर येणारा काळच सांगेल; पण आजपर्यंत हे काम सरकार किंवा बँक व्यवस्था करीत आहेत, त्यांच्याकडे पाहू या. बँकांच्या इतिहासात आपण कालानुक्रमे मागे गेलो, तर आशिया, इजिप्त, चीन, ग्रीस आणि इतर अनेक ठिकाणी ‘बँक’ या संस्था/ प्रणाली/ व्यवस्थेसारख्या काम करणाऱ्या अनेक संस्था दिसतील. परंतु आधुनिक बँकांची खरी जनक ही मध्यमयुगीन काळातील इटलीतील व्यापाऱ्यांची बँक आहे. बाराव्या शतकापासून इटलीमध्ये व्यापाराची खऱ्या अर्थाने भरभराट सुरू झाली. यामागे हिशेबाची दुहेरी नोंद पद्धत (डबल एण्ट्री अकाउंटिंग) कशी उपयोगी आली, याबद्दल आपण या लेखमालेतील ‘काळ्या दगडावरील रेघ’ (९ जानेवारी) या लेखात सविस्तर पाहिले आहे. पण तिथे व्यापारी व्यवहारांची नोंद कशी करावी आणि अनेक देशांतून येणाऱ्या नवीन चलनांना कसे वापरावे, असे अनेक मुद्देही उपस्थित झाले होते. व्यापार म्हटले की कर्ज किंवा गुंतवणूकसुद्धा आलीच; ती कशी करावी, हाही प्रश्न होता. हे सगळे सुरू असताना तिथे अनेक व्यापारी हे पशाच्या व्यवस्थापनात व्यग्र झाले. या पैसा-व्यवस्थापकांत ज्यू वा यहुदी लोक अग्रेसर होते. याचे मुख्य कारण हे की, इटलीचा तेव्हाचा मुख्य धर्म ख्रिस्ती होता. ख्रिस्ती धर्मानुसार व्याजावर पैसे कमावणे हा गुन्हा आहे (इस्लाम धर्मानुसारसुद्धा असेच आहे). पण ज्यू किंवा यहुदी लोकांना असे काही धर्माचे बंधन नव्हते. म्हणून ते व्यापार जिथे कुठे जास्त प्रमाणात होत असे तिथे हे आपापले बाक टाकून त्यावर बसून सगळे व्यवहार करायचे. हे इतके प्रसिद्ध होते की ‘बँक’ या शब्दाची उत्पत्तीसुद्धा इटालियन ‘बँको’ म्हणजे हे बसायचे बाक, यावरून झाली आहे. कोणतीही कंपनी जेव्हा बुडते तेव्हा आपण त्याला ‘बँकरप्ट’ होणे असे म्हणतो, त्याचा इटालियन अर्थसुद्धा ‘बाक तुटून जाणे’ असा आहे. ज्या व्यापाऱ्यांनी या बँकांच्या व्यवसायात उडी मारली ते अचानक फार मोठेसुद्धा झाले, इतके की राजा-महाराजांनासुद्धा कर्ज देऊ लागले. यामध्ये सर्वात प्रसिद्ध बँकिंग घराणे हे चौदाव्या शतकाच्या शेवटी प्रस्थापित झालेले मेडीचि घराणे. मेडीचि यांचा प्रभाव हा नुसता व्यापारापुरता मर्यादित नसून संपूर्ण इटलीच्या सांस्कृतिक, आर्थिक, वैज्ञानिक, अशा अनेक अंगांशी होता. गॅलेलियो या प्रसिद्ध शास्त्रज्ञालासुद्धा मेडीचि घराण्याचा पूर्ण पािठबा होता, इतके की गॅलिलियोने गुरूच्या चार चंद्रांचा शोध जेव्हा लावला तेव्हा या चंद्रांना त्याने ‘मेडीचिचे चंद्र’ असे अधिकृत नावसुद्धा बहाल केले. इटलीच्या फ्लोरेन्स शहरात या बँकांचा उगम झाला. जगातील सर्वात जुनी बँक जी आजसुद्धा कार्यरत आहे ती पंधराव्या शतकात स्थापित झालेली इटलीची बँकच आहे. पण या बँकांना राज्याशी नेहमी तडजोड करावी लागे, कारण त्याच्या पलीकडे जाऊन हे कोणतेही निर्णय घेऊ शकत होते, उलट त्यांना त्यांचे ऐकावे लागे. सतराव्या शतकात इंग्लंडचा राजा तिसरा विलियम याने ‘बँक ऑफ इंग्लंड’ ही रॉयल चार्टर (राजाज्ञा) लागू करून स्थापित केली. त्याचे मुख्य कारण हे होते की इंग्लंडच्या राजाला फ्रेंच साम्राज्याशी युद्ध करायचे होते आणि त्यासाठी त्याला फ्रेंचांसारखेच परिपूर्ण नौदल हवे होते. त्यासाठी लागणार पैसा हा राजकीय तिजोरीतसुद्धा नव्हता, म्हणून मग याच ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून राजाने १२ लाख पौंड उसने घेतले, आणि याच १२ लाखांचे बँकनोटसुद्धा छापले गेले, म्हणजे एकच पैसे दोन वेळा उसने दिले गेले. या बँकनोटला वैधता मिळावी म्हणून असेसुद्धा जाहीर करण्यात आले की तुम्ही आपले कर भरताना हे पैसे किंवा नाणे न देता या बँकनोटांनीसुद्धा भरू शकता. याने असे झाले की खासगी बँकनोटांना एक राजकीय आधार मिळाल्यामुळे ‘राष्ट्रीय मान्यता’ मिळाली. आणि, ज्याला ‘फ्रॅक्शनल रिझव्र्ह बँकिंग’ असे म्हटले जाते त्या पद्धतीचासुद्धा उगम झाला. ‘फ्रॅक्शनल रिझव्र्ह’ म्हणजे बँकेत ठेवलेल्या एकंदर पैशांपैकी रोख स्वरूपात थोडाच वाटा शाबूत ठेवून, बाकीचा ठेवरूप पैसा हा बँकांना इतर लोकांना कर्ज म्हणून वाटता येतो. पॉल विग्ना आणि मायकल केसी या लेखकांच्या शब्दात सांगायचे म्हणले तर इथेच बँकांना केंद्रीय दर्जा मिळाला आणि ‘पैसे छापण्याचा अधिकृत परवाना मिळाला’! पण काहींच्या मते या गोष्टीमुळे बँकांना आणि राज्याला तुमच्या पशावर नको तितका अधिकार आणि नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मिळाला. मुद्दामहून किंवा अनवधानाने चुकीचे निर्णय घेऊन बँकांनी आणि राज्यकर्त्यांनी अनेक वेळा आर्थिक मंदी आणली असे काहींचे मत बनले. आणि नेमके यालाच उत्तर देण्यासाठी ऐंशी आणि नव्वदीच्या काळात ‘सायफरपंक’ चळवळीचा उगम झाला, ज्यामधून पुढे बिटकॉइनची उत्पत्ती झाली. यापुढील दोन लेखांत आपण २००८ ची आर्थिक मंदी आणि त्यामागील बँकांची भूमिका, तसंच सायफरपंक चळवळीचा उगम आणि इतिहास यावर बोलू या. लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io