scorecardresearch

साम्ययोग : सर्वोदयाची कामगिरी

गांधीजींच्या शब्दात सांगायचे तर ‘त्या शेवटच्या माणसासाठी.’ प्रत्येक व्यक्तीचे दु:ख दूर करणे हा सर्वोदयाचा मंत्र आहे.

acharya vinoba bhave thoughts
( प्रतिनिधिक छायाचित्र )

अतुल सुलाखे

विनोबांनी सांगितल्याप्रमाणे, ‘अधिकातल्या अधिकांचे भले झाले की समाजव्यवस्था सुयोग्य होईल हे तत्त्व सर्वोदयाला अमान्य आहे’. सर्वोदयाचे तत्त्व ‘सर्वभूतहिते रता:’ आहे. गांधीजींच्या शब्दात सांगायचे तर ‘त्या शेवटच्या माणसासाठी.’ प्रत्येक व्यक्तीचे दु:ख दूर करणे हा सर्वोदयाचा मंत्र आहे. या दृष्टीने विकासाची योजना आखली पाहिजे.

हे चित्र प्रत्यक्षात दिसत नाही कारण आपण पाश्चिमात्यांचे समाजशास्त्र आणि राजनीतीशास्त्र यांचा स्वीकार केला आहे. त्यातून जगभरात बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असे चित्र उभे राहिले आहे. विनोबांच्या मते या नव्या जाती आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून संपूर्ण समाजाच्या विकासाची एकच योजना निर्माण करता येत नाही.

पाश्चिमात्यांच्या समाज आणि राजनीती-शास्त्रांच्या स्वीकाराचा हा दुष्परिणाम कशामुळे? ती चिंतन पद्धती मूलत: सदोष आहे. समाजाला सेवा अर्पण करण्याऐवजी तिच्यामध्ये (व्यक्तीला महत्त्व देऊन) समाजावर वजन टाकले जाते. ही चिंतन पद्धती कर्तव्याऐवजी (व्यक्तीच्या) हक्काची भाषा बोलते. भारतीय परंपरेमध्ये हक्कासाठी कोणताही शब्द नाही. आपल्याकडे हक्कासाठी अधिकार हा शब्द आहे. तथापि अधिकार म्हणजे कर्तव्य असे आपल्याकडे मानले जाते. ‘मनुष्यधिकारं कर्म’ ही भारतातील परंपरा आहे. तिचा विसर पडल्यामुळे परस्परविरोधी हितसंबंध तयार झाले आहेत. हा पाश्चिमात्य विचारांचा स्वीकार केल्याचा दुष्परिणाम आहे. सर्व समाज हे एक कुटुंब आहे ही भावनाच आपण विसरलो आहोत. जात, वर्ग, गुरू-शिष्य आदींचे परस्परविरोधी हितसंबंध निर्माण झाले आहेत.

‘सर्वाचे हित समाजाची सेवा करण्यात आहे’ असे या विवेचनाचे मुख्य सूत्र आहे. गांधी-विनोबांचा सर्वोदय विचार केवळ परंपरानिष्ठ असता तर त्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले असते. तात्त्विक भूमिका नेहमीच उदात्त असतात. माणसे त्यांचे मनापासून आचरण करतात का हा खरा प्रश्न असतो. तथापि सर्वोदय विचाराने कृतीच्या पातळीवर एवढे काम केले की त्या विचारसरणीच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह लावणे सोपे नाही.

अहिंसा, सत्याग्रह, आश्रमीय जीवन आदींबाबत गांधीजींनी लक्षणीय प्रयोग केले. जगाला त्यामुळे नवी दिशा मिळाली. विनोबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे तीन ‘स्वतंत्र विचारधारा’ निर्माण झाल्या. रामकृष्ण परमहंसांचा सर्वधर्म समन्वय, अरिवदांची मनाच्या पलीकडे जाण्याची शिकवण आणि गांधीजींची अहिंसा. या स्वतंत्र विचारांनी भारतीय स्वातंत्र्याचा पाया घातला आहे.

विनोबांनी, हे स्वातंत्र्य सामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचेल यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. कायद्याने नव्हे तर करुणेने सामाजिक प्रश्न सोडवले पाहिजेत या व्यापक भूमिकेचा पाठपुरावा केला. भूदान त्याचे उदाहरण होते. गांधीजींची अहिंसा आणि विनोबांचे भूदान हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रयोग होते. किमान पाच दशके या प्रयोगांनी समाजाची धारणा केली. या प्रयोगांची चेष्टा करणे फार सुलभ आहे. तथापि त्यांचा भारतीयांना मोठा लाभ झाला. स्थिर सरकार, बळकट लोकशाही, हिंसेच्या प्रभावापासून मुक्त समाज हे सर्वोदयाचे आपल्यावर झालेले उपकार आहेत. ते विसरण्याची दुर्बुद्धी आपल्याला होऊ नये.

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave and his mission zws

ताज्या बातम्या