– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

गीता प्रवचनांमधे दुसऱ्या अध्यायाची समाप्ती करताना विनोबांनी कर्मफलत्यागाच्या सिद्धांताची उकल केली आहे. या सिद्धांतासाठी त्यांनी पुंडलिकाचे उदाहरण समोर ठेवले आहे. स्थितप्रज्ञाचा आदर्श सांगतानाही ते

पुंडलिकाचे स्मरण करतात. पुंडलिकाच्या संपूर्ण कृतीचे वर्णन करताना विनोबांनी एक संकल्पना वापरली आहे. ‘हि-सिद्धांत’ असे नामकरण त्यांनी केले आहे.

पुंडलिकाने आई-वडिलांची केलेली सेवा पाहून देवाने त्याला दर्शन दिले. आता देव दिसल्यावर भक्ताला आणखी काय हवे? तथापि देवाच्या नादी लागून आपले सेवाकार्य खंडित होऊ नये म्हणून पुंडलिक दक्ष होता. त्याच्या दृष्टीने आई-वडिलांची सेवा हेच ईश्वर दर्शन होते. त्याच्या सेवेला आसक्तीचा स्पर्श नव्हता. आई-वडील सोडावेत आणि देव दर्शन घ्यावे अशी त्याची इच्छा नव्हती.

पुंडलिकाचे म्हणजेच स्थितप्रज्ञाचे आणि कर्मफलत्यागी भक्ताचे तत्त्वज्ञान सांगताना विनोबा म्हणतात, ‘देवाची मूर्ती समोर उभी राहिली, तोच का तेवढा परमेश्वर? ते रूप दिसण्यापूर्वी सृष्टी का मढे होती? पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, तू माझ्या भेटीसाठी आला आहेस हे मी ओळखले. पण मी हि-सिद्धांत मानणारा आहे. तूच देव हे मी कबूल करीत नाही. तूहि देव आहेस आणि हे आई-बापहि मला देव आहेत. यांच्या सेवेत असताना मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाही याबद्दल तू मला क्षमा कर.’

पुंडलिकाचे हे तत्त्वज्ञान कुणाचा अनादर करत नाही आणि स्वत:चे मतही सोडत नाही. कर्मफलत्यागाच्या भक्कम भूमिकेमुळे अशी मजल गाठता येते. ही भूमिका ठाम असणाऱ्या

व्यक्तीची ‘कर्म-समाधि’ खोल, वृत्ती व्यापक, सम आणि उदार असते. माझेच मत खरे, त्याहून

वेगळे मत नाही अशी त्याची धारणा नसते. ‘हेही आहे आणि तेही आहे पण माझ्यासाठी

हेच खरे’ अशी नम्र आणि निश्चयी भूमिका घेत तो जगतो.

साम्ययोग, या तत्त्वाचा अंगीकार करतो. कुणालाही विरोध नाही तरीही माझे कर्तव्य माझ्यासाठी योग्य आहे, अशी विनोबांची भूमिका आहे.

गीतेच्या तत्त्वज्ञानात त्यांना समन्वयाची भूमिका दिसली. तिचे त्यांनी दुहेरी ग्रहण केले. त्यामुळे पूर्वसुरींच्या गीतार्थाचा समन्वय आणि साम्ययोगाची कालसुसंगत मांडणी असे दुहेरी कार्य त्यांनी केले. साम्ययोगाला समन्वय, साम्य आणि समत्व अशी परिमाणे असल्यामुळे हे दर्शन कोणत्याही काळात विहार करू शकते.

विनोबा पूर्वसुरींना शरण होते. त्यांच्या साहित्यातून त्याची प्रचीती मिळते तथापि ते सर्वार्थाने आधुनिक होते. केवळ व्यावहारिक समस्यांना त्यांनी हात घातला म्हणून ते आधुनिक नव्हते तर संपूर्ण धर्म परंपरेची ते उलट तपासणी करत होते. विज्ञान आणि धर्माची सांगड घालू पाहात होते. ही शंकराचार्य आणि ज्ञानदेवांची परंपरा. या तात्त्विक भूमिकेतही प्रखर ज्ञाननिष्ठा आहे. साम्ययोग या परंपरेची कालसंगत फेरमांडणी करतो.

तुम्ही करता तोहि गीतार्थ आणि माझ्यासमोर आला तोहि गीतार्थ. परंतु माझ्यासाठी हाच गीतार्थ, ही विनोबांच्या गीतार्थाची म्हणजे साम्ययोगाची पूर्वपीठिका आहे.