‘जो उत्तम श्रेय जाणू इच्छितो त्याने शिकले पाहिजे. कुठे? गुरूजवळ. गुरू कसा असावा? शाब्दे परे च निष्णातम्। वेद, उपनिषद, बायबल, कुराण, जपुजी आदि जे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत त्यात तो प्रवीण असला पाहिजे. ब्रह्मणि-ब्रह्मणि ब्रह्मविद्येचा त्याला साक्षात्कार झालेला असला पाहिजे. उपशमाश्रयम् – तो शांतीचे घर असला पाहिजे. हे तीन गुण ज्याच्यात असतील, तोच चांगला गुरू होईल.’

    -विनोबा, भागवत धर्म सार

गीताईच्या ध्यानाचा विचार करताना भागवत धर्म सार या ग्रंथातील विनोबांचे वरील विवेचन स्मरते.

गीता आणि गीताईच्या ध्यानाच्या श्लोकांमधे श्रीकृष्ण आणि महर्षी व्यास यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. तिथे भक्तिभावाचे दर्शन होते. विनोबा त्या भक्तीला, ज्ञान आणि कालोचिततेच्या अंगाने पाहतात.

ते अर्जुनाऐवजी ‘भक्त’ शब्द वापरतात. त्यामुळे परमेश्वराशी सख्य राखणारी कोणीही व्यक्ती अर्जुनाच्या जागी पाहता येते. अर्जुन म्हणजे सरळ मनाचा आणि ऋजु बुद्धीचा. हे गुण असणाऱ्या व्यक्तीसाठी गीता आहे.

अशा अर्जुनाला कृष्ण उपदेश करतो आहे. कृष्ण म्हणजे कोण याची अत्यंत सहज सोपी मांडणी गीता प्रवचनांमधे आली आहे. गीतेचा कृष्ण कुणी ऐतिहासिक व्यक्ती नाही. गीतेचा वक्ता, श्रोता आणि ग्रथनकर्ता हे तिघेही कृष्ण आहेत आणि तिघांची ओळखही तशीच आहे. श्रीकृष्ण, अर्जुन आणि व्यासांना ‘कृष्ण’ असे नाव आहे. विनोबांची ही भूमिका कृष्ण तत्त्वाचे अनोखे दर्शन घडवणारी आहे.

यानंतर गीतेच्या उपदेश येतो. विनोबा त्यासाठी प्रतिबोध असा शब्द वापरतात. प्रतिबोध म्हणजे नुसताच उपदेश नव्हे. त्याला जीवनानुभवाची जोड नसेल तर तो प्रतिबोध होत नाही. हा आचरण युक्त उपदेश कुठे सुरू आहे तर ‘समरी’ म्हणजे जेव्हा धर्म संकट उभे राहते बुद्धीला निर्णय घेता येत नाही तो समर प्रसंगच म्हणायचा.

मूळ श्लोकातील नारायण शब्द विनोबांनी तसाच कायम ठेवला आहे. त्यात नर-समूहाची देवता आणि मानवाचा अंतर्यामी अशी भर घातली आहे. नाममालेवरील प्रवचनांमधे नारायण ही संकल्पना विनोबांनी नेमकेपणाने सांगितली आहे. सृष्टीचा नेता माणूस आणि मानवी समूहाचे नेतृत्व नारायणाकडे. तो प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असतोच. नारायणाचा आणखी एक विशेष आहे. तो ‘श्रीवर’ आहे. श्री म्हणजे ज्ञान, ऐश्वर्य, पावित्र्य असणारी कांती आणि अशा कांतीने युक्त म्हणजे श्रीवर.

हा नारायण जो उपदेश करतो आहे, तो शब्दात मावणारा नाही, म्हणून गीतेचे तत्त्वज्ञान ‘मुक्त’ या शब्दात मांडले आहे. ज्ञानदेवांनी ज्या तत्त्वाला नित्यनूतन म्हटले त्याचेच वर्णन विनोबा मुक्त असे करतात.

महर्षी व्यासांनी ही ‘मुक्ता’ शब्दांच्या कक्षेत कशी आणली, गीतेतील वेदांत-विद्या कशी आहे, विनोबांनी गीताईची रचना करताना मूळ गीतेच्या चौकटीत काही बदल केले आहेत का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गीताई माउली माझी असे सांगणारे विनोबा ध्यानाच्या श्लोकातही तीच मातृभक्ती दाखवतात का या प्रश्नांची उत्तरे पुढच्या लेखात.

– अतुल सुलाखे

 jayjagat24@gmail.com