एका इशाऱ्यानिशी रस्त्यावर उतरणाऱ्यांची किंवा रस्त्यावरून गायब होणाऱ्यांची फौज हाताशी असली की तिच्या बळावर कुणालाही कसेही वाकविता येते या समजुतीमुळे ज्यांनी आजवर केवळ मुजोरीच केली, त्यामध्ये मुंबईतील रिक्षाचालकांच्या संघटनेचे नेते शरद राव यांचा क्रमांक वरचा लागतो. पाठीशी असलेल्या संघटित शक्तीचे बळ वापरून जनतेला वेठीस धरण्याचे तंत्र अवलंबिणाऱ्यास ‘नेता’ म्हणावे की ‘म्होरक्या’, असा प्रश्न शरद रावांच्या अलीकडच्या अनेक कृतींमधून पडत गेला आहे. शरद रावांनी कामगारांची संघटना बांधून एक संघटित शक्ती आपल्या पाठीशी उभी केली. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे कामगारवर्ग झपाटय़ाने दुबळा होत चाललेला असतानादेखील कामगारांची शक्ती संघटित ठेवण्याचे अवघड काम शरद रावांनी केले, कारण त्या वेळी त्यांच्या पाठीशी जॉर्ज फर्नाडिस यांच्यासारख्या लढाऊ कामगार नेत्याची पुण्याई होती. पण बदलत्या काळाबरोबर ही संघटित शक्ती कामगार हिताकरिता वापरण्याऐवजी या शक्तीच्या पाठबळावर जनतेलाच वेठीला धरण्याचे उद्योग सुरू झाले. संघटनांच्या शक्तीचा वापर करून सामान्य जनतेला हैराण करण्याचे उद्योग होत असतील, तर अशा संघटनेला ‘संघटना’ न म्हणता ‘टोळी’ म्हणणे आणि नेत्याला ‘नेता’ न म्हणता ‘म्होरक्या’ म्हणणेच योग्य ठरेल. गुन्हेगारी विश्वातदेखील संघटित ताकद उभी केलेली असते. या ताकदीच्या जोरावरच टोळीचे म्होरके प्रतिपक्षाला किंवा सामान्य जनजीवनाला जेरीस आणत असतात. कामगार संघटनांचा वापर अशाच पद्धतीने होऊ लागला तर संघटित शक्तीच्या विधायक वापराच्या संकल्पनाच यापुढे मोडीत निघतील आणि कामगार संघटनांबद्दल सामान्य जनतेच्या मनात असलेल्या विश्वासाचेही तीनतेरा वाजतील. शेवटी कामगार हा समाजाचाच घटक असतो आणि त्यालादेखील कुटुंब असते. त्यामुळेच ज्या समाजाचा तो घटक असतो, त्या समाजालाच वेठीस धरून स्वहिताचे घोडे दामटण्याची कृती अंगाशी आल्याखेरीज राहत नाही, हे राव यांच्यासारख्या कधी काळी सुसंस्कृत असलेल्या नेत्याला समजावयास हवे. शरद राव हे समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते आहेत, असा अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेकांचा समज होता. तो त्या वेळी खराही होता. पण जी कृती समाजाचा विचार न करता आपल्या पदरी असलेल्या टोळीपुरताच विचार दामटते आणि अशा कृतीच्या सामाजिक परिणामांची तमादेखील बाळगत नाही, अशी कृती करणारा कुणीही समाजवादी विचारसरणीचा असूच शकत नाही. आज एकूणच कामगार विश्व अशक्त होत चालले असताना, या विश्वाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज कोणीही अमान्य करणार नाही; पण कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी, कामगारांची शक्ती आपल्या पाठीशी उभी करून मनमानी करणाऱ्यांना अखेर समाजाकडूनच शहाणपणा शिकण्याची वेळ येते. शरद राव यांच्यासारखा नेता संघटना टिकविण्यासाठी समाजाला वेठीस धरू पाहत असेल, तर समाजही संघटित होऊ शकतो, हे अलीकडे त्यांनी केलेल्या आंदोलनांच्या उपद्व्यापांवरील प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजाला दुर्लक्षित करून संघटना चालवायची की संघटनेला समाजासोबत ठेवायचे, याचा विचार त्यांना करावाच लागेल. न्यायालयाच्या कानपिचक्यांमुळे तरी त्यांना तशी गरज भासेल, असे समजावयास हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
अरे‘रावी’ला वेसणच हवी
एका इशाऱ्यानिशी रस्त्यावर उतरणाऱ्यांची किंवा रस्त्यावरून गायब होणाऱ्यांची फौज हाताशी असली की तिच्या बळावर कुणालाही कसेही वाकविता येते या समजुतीमुळे ज्यांनी आजवर केवळ मुजोरीच केली
First published on: 22-08-2013 at 01:02 IST
TOPICSशरद राव
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad rao calls off auto strike