मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील अनेक घडामोडींना नवनवे राजकीय संदर्भ प्राप्त झाल्यामुळे, अलीकडे कोणत्याही गोष्टीचा संदर्भ मोदी सरकारशी लावला जात आहे. यातील राजकारणाचा भाग बाजूला ठेवला, तर अनेक गोष्टींमध्ये केवळ चच्रेपुरता मसालाच असतो. सामान्य माणसाला राजकारणाशी फारसे देणेघेणे नसले तरी ज्या गोष्टींचे राजकारण केले जाते, केवळ करमणूक म्हणून त्याकडे पाहून पाठ फिरविता येत नसल्याने त्याची चर्चा होणे स्वाभाविकच असते. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे सदस्य राहुल गांधी यांचा अज्ञातवास ही तसे पाहता संपूर्ण व्यक्तिगत बाब असली तरी ते लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या गैरहजेरीची बाब सामान्यांमध्ये चच्रेचा विषय ठरलीच. आता त्यांच्याच संदर्भातील एका नव्या वादाला राजकीय तोंड फुटले आहे; पण वादाचा हा नवा मुद्दा पूर्णत: खासगी होऊ शकत नाही. राहुल गांधींच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, रंगरूपाचे तपशील असलेले सारे रकाने कागदावर भरून घेण्याचा दिल्ली पोलिसांचा खाक्या राजकीयदृष्टय़ा वादग्रस्त ठरला आहे. ही मोदी सरकारची हेरगिरी असल्याचा काँग्रेसचा आरोप हा राजकारणाचा भाग म्हणून बाजूला ठेवला, तरी दिल्ली पोलिसांनी चालविलेल्या या चौकशीतून नेमके काय साधले जाणार? हा पोकळ प्रश्नदेखील शिल्लक राहतोच. राहुल गांधी यांच्याविषयीच्या माहितीचे रकाने भरलेला कागद पोलीस दप्तरात फाइलबंद करून ठेवण्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये कोणती भर पडणार आहे, हे गूढच आहे. कधी कधी पोलिसी खाक्या सामान्यांना अनाकलनीय ठरतो, याचे नामी उदाहरण म्हणून या प्रकरणाची नोंद मात्र होणार आहे. अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांची वैयक्तिक माहिती पोलीस दप्तरी नोंदविण्याची पद्धत नवी नाही, अन्य नेत्यांकडेही अशा माहितीबाबत विचारणा करण्यात आली होती, असा खुलासा करून दिल्ली पोलीस आयुक्तांनी पोलीस व्यवस्थेचे हसे करून घेतले आहे. मुळात, राहुल गांधी हे संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांच्याविषयीची सारी माहिती संसदेच्या दप्तरी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, संसदेचे सदस्य असलेल्या कोणाही व्यक्तीची माहिती गोळा करण्यासाठी संशयास्पद रीत वापरणे हाच मुळात संशयास्पद प्रकार आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेसाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, नाक-डोळे, रंग-रूप, केस आणि पेहरावाबाबतच्या कागदावरच्या वर्णनाचा आधार घेतल्याखेरीज ओळखच पटू नये अशा व्यक्तींमध्ये राहुल गांधींचा समावेश नाही. देशातला प्रत्येक माणूस पोलिसी वर्णनाचा तो कागद हाती नसतानाही सहज ओळखू शकेल, एवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व आज देशात परिचित असताना, केवळ सुरक्षिततेचा बागुलबुवा उभा करून केवळ कागदी रकाने भरलेल्या फायली फुगविण्याचा पोलिसी प्रकार हास्यास्पद ठरणार आहे. दिल्ली पोलिसांना आता त्यांच्या या कृत्याचा जाब राज्यसभेच्या हक्कभंग समितीसमोर द्यावा लागणार आहे. राहुल गांधी काही दिवसांकरिता सुट्टीवर आहेत, याची साऱ्या देशाला माहिती असताना, दिल्ली पोलिसांना ही माहिती नसावी, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. म्हणूनच, त्यांच्या गरहजेरीत त्यांच्या कार्यालयातील व्यक्तींकडे त्यांच्या रंगरूपाविषयी, येण्याजाण्याच्या वेळांबाबत, सहकाऱ्यांबाबत माहिती घेण्याची कोणती घाई पोलिसांना झाली होती, याचे उत्तर या चौकशीतून पुढे येईलच, पण पोलिसांच्या आततायी कारवाईपुढे मात्र प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. या प्रकारामुळे दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे, राहुल गांधींचा गूढ अज्ञातवास पुन्हा चच्रेत आला आणि मोदी सरकार पुन्हा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले. यातून काय निष्पन्न होणार याच्याशी सामान्य माणसाला देणेघेणे नसले, तरी उत्तराबाबत उत्सुकता असणारच!