|| मुकुंद संगोराम

अनादिकाळातला संगीताचा ‘शोध’ ते आजचे कलावंत, यांत प्रज्ञेचा धागा समान आहेच; पण या प्रज्ञेसोबत कलापरंपरेचे आकलन हाही महत्त्वाचा दुवा ठरतो…

गेल्या काही हजार वर्षांत माणसाने कलेच्या प्रांतात जी प्रचंड उलथापालथ घडवून आणली, ती त्याच्या प्रज्ञेच्या साह्याने. परंपरा निर्माण होण्यासाठी आधी ती निर्माण करावी लागते. त्या निर्माणासाठी आधी घडून गेलेल्याचा कोणताच आधार नसतो. तरीही प्रथमच काही नवे घडते. सगळ्या कलांच्या निर्मितीमागील प्रेरणांचा शोध अतिशय महत्त्वाचा अशासाठी, की त्यामुळे कलाविश्वातील घडामोडींमागील कारणपरंपरा समजणे शक्य होते. सहसा या अभ्यासात कलावंतांना रस असतोच असे नाही. ते नवनिर्मितीच्या ध्यासात असतात आणि त्यांच्यासाठी तेच सर्वस्व असते. ते योग्यच. मात्र अशा कारणांचा शोध घेणारे कलेच्या परिघावरील अभ्यासक, कलेच्या अंगणातील वस्तुजन्याचा शोध अधिक घेताना दिसतात. अन्य कलांच्या तुलनेत संगीताच्या बाबतीत तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. सात स्वर, बावीस श्रुती, एक अविनाशी स्वर आणि षड्ज पंचम या दोन स्वरांतील भावपूर्ण नाते ही भारतीय संगीताची बैठक. या एवढ्या सामग्रीवर गेली अनेक शतके प्रत्येक कलावंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्यात भर घालत आला. परिणामी संगीताला संपन्नतेची साय आली.

एक लेखकराव म्हणतात की, ते कोणतेही वृत्तपत्र वगैरे वाचत नाहीत, संगीतातील एका कलावंताचे म्हणणे असे की, त्याला इतर कुणाचेही संगीत ऐकण्याची गरज वाटत नाही. हे जर खरे असेल, तर त्या कलावंतांना आणि लेखकांना त्यांच्या कलाकृतीसाठीचे ‘मूलद्रव्य’, म्हणजे कच्चा माल, कुठे मिळत असेल? कलावंत जन्मावा लागतो, म्हणजे नेमके काय? एखाद्याला सगळे अवचित क्षणी आपोआप सुचते का? पुन:पुन्हा नवीन काही सुचत राहते का? या प्रश्नांना थेट भिडायची बहुतेकांची तयारी नसते.

कलेचे रसायन भवतालातून मिळते. ते सगळ्यांपर्यंतच पोहोचत असते. पण त्यातल्या फार थोड्यांना त्यातील नवनिर्मितीच्या खाणाखुणा दिसतात. त्या रसायनात काही तरी चमकदार सापडते. त्यावर काही प्रयोग करून पाहण्याची ऊर्मी अंतरी उमटते. त्यातून कलेच्या निर्मितीच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो. इथे प्रज्ञेचे कार्य सुरू होते. त्या प्रज्ञेच्या साह्याने कलेच्या बीजातून कोंब फुटू लागतो. नवसर्जनाचे हे सांगणे फार थोड्यांना कळते, म्हणूनच ते कलावंत होऊ शकतात. पण सगळ्या कला निर्जन बेटावर राहून निर्माण करता येतील का? ‘कलाकार जन्मावा लागतो,’ या भारतीय संस्कृतीतील शब्दप्रयोगाला पाश्चात्त्यांनी कधीच नाकारून टाकले आहे. कलांची निर्मिती आणि त्यांचे संवर्धन यासाठी सातत्यपूर्ण कष्टाची आणि प्रयत्नांची आवश्यकता असते आणि त्यातून भव्य कलाकृती उभ्या राहू शकतात, असे तेथील कलावंतांचे म्हणणे. ते खरे की खोटे या वादात अनेकदा अपवादात्मक घटनांची जंत्री दिली जाते. परंतु ते अपवादच असतात, हे मात्र लक्षात घेतले जात नाही.

नाद आणि ध्वनी यातील फरक लक्षात आल्यानंतरच आदिमकाळात स्वरयंत्रातून हवा तसा आवाज निर्माण करण्यासाठीचे कसब मेंदूच्या विकासामुळे साध्य झाले असावे. स्वरयंत्रावरील हे नियंत्रण भवतालातील नादांच्या अनुकरणातून आले असणे स्वाभाविक. निसर्गातील साऱ्या आवाजांमधून काहीच आवाज त्याला खुणावत असतील आणि त्यातूनच त्याच्या ठायी संगीत या एका अगदी भिन्न आणि वेगळ्याच जाणिवेचा उगम झाला असेल.

ज्या माणसाला ऐकू येणाऱ्या विविध आवाजांतून आवाज आणि नाद असे वर्गीकरण करता आले, तो माणूस संगीताचा खरा शोधक म्हटला पाहिजे. त्याने संगीताचा ‘शोध लावला’ असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण त्याच्या लेखी जे नादस्वरूप संगीत होते, ते निसर्गात आधीपासूनच होते. प्रश्न होता तो केवळ ते जाणवण्याचा. ही जाणीवजागृती मानवाला एका नव्या संस्कृतीच्या दिशेने नेणारी होती. त्याचे सारे जगणे अनेक अर्थांनी समृद्ध करणारी होती. कानांना ऐकू येणारा प्रत्येकच आवाज हा काही नादसदृश असेल असे नाही. कोणता आवाज नाद आहे, हे ओळखण्याची क्षमता त्या मानवामध्ये निर्माण होणे हीच खरी कळीची गोष्ट ठरली. नादाचा कानांना स्पर्श होणे आणि त्यातून एक सौंदर्यपूर्ण आनंद निर्माण होणे ही बाब मनुष्यप्राण्यालाच जाणवली असेल, असेही नाही. पृथ्वीवरील अनेक प्राणिमात्रांमध्ये नादाचा आनंद घेण्याची क्षमता असणे शक्य आहे. आपल्याला सौंदर्याची जी जाणीव आहे, तशीच प्राणिमात्रांमध्ये असेल, असे मात्र ठामपणे सांगणे शक्य नाही. त्यामुळे सौंदर्यनिर्मितीच्या पातळीवर मानवाचे वेगळेपण सतत जाणवत राहणारे आहे. एखादी गोष्ट एखाद्याला सुंदर वाटेल, म्हणून ती दुसऱ्याला तशीच आणि तेवढीच सुंदर वाटेल, असे नाही. मात्र पृथ्वीवर जन्मणाऱ्या प्रत्येक मानवाला येथील आगमनापासून काही गोष्टी आणि बाबी समानपणे पाहता येतात. ज्याला आपण त्रिकालाबाधित असे म्हणतो, ते चंद्र, सूर्य, तारे, तारका, आवाज, रंग, आकार, रूप याबाबत प्रत्येकाच्या जाणिवा वेगळ्या असतात, असे दिसून येत नाही. म्हणजे आपल्याला सूर्य जसा दिसतो, तसाच तो इतरांनाही दिसतो. आपल्याला एखादा आवाज जसा ऐकू येतो, तसाच तो इतरांनाही ऐकू येत असतो. प्रत्येकाच्या मेंदूतील प्रक्रिया तशीच असली, तरीही त्यात जेव्हा त्या त्या व्यक्तीची प्रज्ञा आणि प्रतिभा मिसळते, तेव्हा ती ती गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटू लागते, भासू लागते. प्रज्ञा अणि प्रतिभा मात्र सर्व मनुष्यप्राण्यांत एकसारख्या प्रमाणात असत नाही. ती प्रत्येकाच्या ठायी वेगवेगळ्या स्वरूपांत आणि प्रमाणात असते. संगीताबाबत जे जे बदल झाले, ते त्याच्या मूळ गाभ्याशी इमान राखून झाले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे ज्या आदिमानवाला आवाज आणि नाद यातील फरक लक्षात आला, त्याला संगीत या गोष्टीची पहिली जाणीव झाली. तेव्हापासून आजवरच्या काळात संगीतातील नाद हे गुणसूत्र बदललेले नाही. चित्रकलेचे मूळ द्रव्य जर रंग, रेषा, आकार, अवकाश असे असेल, तर संगीताचे प्रयोगसाहित्य पहिल्यापासून आजवर केवळ नाद एवढेच राहिले आहे. नादाच्या शोधानंतरचा सर्वांत मोठा शोध होता तो स्वरांचा. या अवकाशात भरून राहिलेल्या विविध पोतांच्या आणि दर्जाच्या नादांमधील विशिष्ट नाद प्रत्येक ठिकाणी पुन:पुन्हा प्रत्ययाला येण्यासाठी मानवाच्या मेंदूत असलेली अनन्यसाधारण प्रतिभा आणि प्रज्ञाच कारणीभूत ठरली.

स्वरांची निर्मिती हे संगीतातील सर्वांत पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर होते. स्वर स्वतंत्र असले, तरीही त्यांचा आपसात एक भावबंध असतो आणि त्यातूनच संगीताची निर्मिती होते, हे जाणवल्यानंतरच स्वरांच्या विविध प्रकारच्या मिश्रणांचा ध्यास सुरू झाला. भारतीयसंदर्भात, रागनिर्मितीची ही पहिली पायरी होती. संगीताला स्थिरता आणणारा रागनिर्मिती हा प्रकार होता. संगीतातील हा बदल संगीताच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असला, तरीही त्यामुळे रागमांडणीचे सूत्र निर्माण करण्याची आवश्यकता भासू लागली. केवळ स्वरांच्या साह्याने निर्माण होणाऱ्या रागाचा चेहरा ठरवणाऱ्या कुणा प्रतिभाशाली संगीतकाराने त्या स्वरसंबंधातील भावांचाही शोध घेतला. तेच अधिकृत समजून त्याचेच वळण बनले. त्याचे नियम झाले, कायदेही झाले. परंपरेने ते जसेच्या तसे टिकवण्याचा प्रयत्नही झाला. परंतु यातील काहीच लिखित नसल्याने ते एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यात काही गडबड, गोंधळ झाला नसेलच, असे नाही. एखाद्या रागातील विविध स्वरांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या स्वराकृती त्या रागाची ओळख करून घेण्यास आवश्यक होते. स्वरांमधून व्यक्त होणारे भाव आणि रागाच्या मांडणीत त्याचा होणारा आविष्कार यामुळे संगीताच्या निर्मितीला पोषक असे व्यासपीठ तयार झाले. रागसंगीत हा भारतीय साम्राज्याच्या विशाल पटावरील कलावंतांचा संगीताकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन होता.

निसर्गाचे सांगणे समजून घ्यायचे, तर त्यातील सगळ्या खाचाखोचा, सातत्याने होणारे बदल लक्षात घ्यायलाच हवेत. निसर्गातील सौंदर्य न्याहाळता येण्याची कलात्मक दृष्टी आणि त्याचा आविष्कार करताना, संगीतासारखी कला, एकट्याने, स्वतंत्रपणे निर्माण होणे अकल्पनीय. त्यासाठी भवताल हवा. त्यात निसर्गाप्रमाणेच, तेथे असणारे मानवी समूह, त्यांच्या जाणिवा, त्यांची कला रसग्रहणाची क्षमता, त्यांची बदलती अभिरुची या सगळ्याचा एकत्र विचार हवा. परंपरेतून नवतेचा शोध घेताना आणि त्यातून नव्या परंपरांची जोडणी करताना, अभ्यास, चिंतन आणि सौंदर्यदृष्टी हेच तर कलावंताकडे असलेले ‘गॉड पार्टिकल’ असते, हे विसरून चालणार नाही.

mukund.sangoram@expressindia.com