श्रीसद्गुरूंच्या सहवासानं मनाला मोठी शांती मिळते. निर्भयता येते आणि इथेच मोठा धोका उद्भवतो. काय असतो हा धोका? तर सद्गुरू जो बोध करतात तो मनावर बिंबवून आचरणात आणण्यासाठी आहे, ही जाणीव तीव्र होत नाही. उलट आयतं ज्ञान दुसऱ्याला सांगत सुटण्याची ऊर्मी वाढत जाते. त्यांच्या सहवासानं लोकांचा मानही आयता मिळू लागतो. मग सेवेत अंगचोरपणा येऊ लागतो. काही न करता ‘आनंदा’त राहायची इच्छा बळावू लागते. आपण कुणी तरी झालो, असा भ्रमही उत्पन्न झाला असतो. अशा निसरडय़ा कडय़ावर पोहोचल्यावर पुढेही जाता येत नाही आणि मागेही फिरता येत नाही! अशा साधकाला माउली सांगत आहेत की, ‘‘बाबा रे, सर्व क्षमतांनी युक्त असा माणसाचा देह तुला लाभला आहे. तो परमात्मप्राप्तीसाठीच लाभला आहे. मोक्षसुख प्राप्त करून घेण्यासाठीच लाभला आहे. आता आधी माणसाचा जन्म मिळणं हीच परमेश्वराची मोठी कृपा आहे. तो जन्म लाभूनही सर्व क्षमतांनी परिपूर्ण असा देह लाभणं ही त्याहून अधिक मोठी कृपा आहे. तो लाभल्यावरही परमात्मा भेटावा, साक्षात्कार व्हावा, असा विचार मनात येणं हीदेखील त्याचीच मोठी कृपा. असा विचार मनात आल्यानंतर आत्मशक्ती जागी करणारा खरा सद्गुरू जीवनात येणं, ही तर परमेश्वराचीच  कृपा! आता सद्गुरू जीवनात आले, त्यांचा सहवासही लाभला. मग परमात्मप्राप्ती, मोक्षसुखाची प्राप्ती किती सोपी झाली! त्यासाठी प्रयत्न मात्र मी केले पाहिजेत. सर्व अनुकूलता लाभूनही परमप्राप्तीसाठी जे जे काही केलं पाहिजे त्या कर्माचा जो कंटाळा करतो तो अडाणीच आहे!’’ परिस पां सव्यसाची। मूर्ति लाहोनि देहाची। खंती करिती कर्माची। ते गांवढे गा! मागे मीराबाईंचं भजन सांगितलं होतं ना? नाही ऐसो जनम् बारम्बार। का जाणुं कछुं पुण्य प्रगटे। भा मानुसा अवतार।। सर्वसाधारणपणे या भजनाचा लोक असा अर्थ घेतात की, काय पुण्य केलं होतं कुणास ठाऊक म्हणून माणसाचा हा जन्म लाभला. असा योग वारंवार मिळत नाही. या भजनाचा खरा अर्थ असा आहे की, मला माणसाचा जन्म मिळाला आणि त्याच वेळी श्रीसद्गुरूही मनुष्य रूपात अवतरित झाले, असा जन्म वारंवार मिळत नाही! तेव्हा ‘मूर्ति लाहोनि देहाची’ म्हणजे सद्गुरूही मनुष्य देहात साकारले! आता किती सोप्पं झालं! दगडाच्या मूर्तीला पूजा पोहोचली का? समजत नाही. खाऊ-पिऊ घालण्याचं सुख नाही. आपल्या शंकेला, प्रार्थनेला प्रतिसाद नाही. या देहधारी सद्गुरूमूर्तीला मात्र खरी पूजा पोहोचते,  खरी प्रार्थना पोहोचते. मग अशा वेळी आळसानं मी परमप्राप्तीसाठी जे केलंच पाहिजे त्या कर्तव्यकर्माचा कंटाळा केला, तर माझ्यासारखा हतभागी मीच! मग अशा साधकाचं असं कोणतं कर्म माउलींना अभिप्रेत आहे, जे त्याच्या परमप्राप्तीसाठी आवश्यक आहे? त्यासाठी माउलीच नव्हेत तर स्वामी स्वरूपानंद यांच्या नाथसंप्रदायाचा उगम ज्या ज्ञानप्रवाहात झाला त्याकडे वळावंच लागेल. तो प्रश्न आणि त्याचं उत्तर म्हणजेच ‘गुरुगीता’! पार्वतीमाता भगवान शंकरांना विचारत आहे, ‘‘केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत।’’ असा कोणता मार्ग आहे, असा कोणता उपाय आहे की ज्यायोगे देह लाभलेला माणूस ब्रह्ममय होईल? या प्रश्नाच्या उत्तरातच नाथसंप्रदायाचा उगम आहे.