२०५. अगर्वता आणि दास्य

श्रीनारदभक्तिसूत्रांमध्ये भक्ती कोणत्या साधनांनी सिद्ध होते, हे सांगितलं आहे. त्यातलं ३६वं सूत्र आहे, ‘‘अव्यावृत्त भजनात्।।’’

श्रीनारदभक्तिसूत्रांमध्ये भक्ती कोणत्या साधनांनी सिद्ध होते, हे सांगितलं आहे. त्यातलं ३६वं सूत्र आहे, ‘‘अव्यावृत्त भजनात्।।’’ म्हणजे अखंड भजनानं हे भक्तिसाधन सिद्ध होतं. या सूत्राचं विवरण करताना श्री. म. वि. केळकर यांनी म्हटलं आहे की, ‘‘भज् हा धातु सेवा या अर्थाने वापरतात. भगवंताच्या अखंड सेवेमध्ये साधकाने राहावे. भगवंताशी प्रेमपूर्वक अखंड सेवा केली म्हणजे भक्ती सिद्ध होऊन भगवंताची प्राप्ती होते. मूर्तीची पूजा करताना बाह्य़ उपचारांना महत्त्व असतेच, पण त्याहीपेक्षा ते उपचार करताना भक्ताचे अंतरंग त्यात लीन होणे महत्त्वाचे असते’’ (श्रीनारदभक्तिसूत्रे विवरण, त्रिदल प्रकाशन, पृ. ११८वरील नोंद). अव्यावृत्त म्हणजे अखंड आणि भजनाचा व्यापक अर्थ ऐक्यभावानं होणारी सेवा, हा धरला तर मग ‘अव्यावृत्त भजनात्’ चा अर्थ अखंड ऐक्यभावानं सेवारत होणं, हा आहे! स्वामी स्वरूपानंद यांनीही परमशिष्य अमलानंद यांना ‘जे ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंटा। तो स्वाधीन करी सुभटा। वोळगोनी।।’ या ओव्यांबाबत बोलताना, ‘सेवा म्हणजे भजनच,’ हा अर्थ सांगितला होता. स्वामी म्हणाले होते की, ‘‘ सेवा म्हणजे भजनच. गुरुकृपा म्हणजे सोऽहं बोधच. हा बोध झाला, सारखे भजन झाले की सर्वच संकल्प विकल्प नाहीसे होतात. सर्व स्वस्वरूपच दिसू लागते. सोऽहं बोधाने ज्ञानप्राप्ती होते’’ (स्वामी म्हणे अमलानंद, पृ. १६). म्हणजे ही सेवा कशी हवी? तर अव्यावृत्त, अर्थात सर्व संकल्प-विकल्पांनी मुक्त! अखंड आणि ऐक्यभावानं परिपूर्ण. म्हणून दुसरीच ओवी सांगते, तरी तनुमनु जीवें। चरणासी लागावें। आणि अगर्वता करावें। दास्य सकळ।। तन, मन आणि जीव हे तिन्ही जेव्हा त्यांना समर्पित होईल, तेव्हाच अगर्वता येईल. ‘तन, मन, धन’ हा क्रम आपल्याला माहीत आहे. इथे ‘तन, मन आणि जीव’ हा क्रम आला आहे. कारण ‘धन’ या शब्दात केवळ भौतिक संपदाच येते, ‘जीव’ शब्दात ही भौतिक संपदा येतेच, पण आपलं संपूर्ण अस्तित्व, आपली संपूर्ण ओळख, अर्थात आपला ‘मी’पणाही येतो! तेव्हा शारीरिक कष्टांची पर्वा न करता, मनाच्या आवडी-निवडींची पर्वा न करता आणि माझं समस्त अस्तित्व, माझा ‘मी’पणाही विसरून त्यांच्या सेवेत मी रत असेन तर मग त्यात गर्व येईलच कुठून? जिथे ‘मी’पणा आहे तिथे गर्व आहे, जिथे ‘मी’पणा नाही तिथे गर्वही नाही. अगर्वता असेल तरच ही सेवा खऱ्या अर्थानं सेवा होईल, नाहीतर ते सेवेचं ढोंग होईल! आपण मात्र ‘सेवा’ म्हणून तेवढंच करू इच्छितो ज्यानं आपल्या शरीर व मनाला फारशी झळ लागणार नाही आणि सद्गुरूंशी आपली जवळीक आहे, असं भासवत दुसऱ्यावर छापही पाडता येईल! एकदा स्वामी स्वरूपानंद शिष्योत्तमाला म्हणाले होते की, ‘‘गुरुसेवा याचा अर्थ केवळ शारीरिक सेवा असाच नव्हे. काल तुम्ही माझ्या खडावा घेऊन पुढे आलात. असे नको. शिष्याचा भाव असावा पण गुरूने शिष्यांची सेवाही विशेष कारण नसताना घेऊ नये. या सर्व भावनाच असतात आणि आपल्याला तर भावातीत व्हावयाचे आहे!’’ या वाक्यांत सर्वासाठीच मोठा बोध आहे, तो पाहू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swaroop chintan slavery