प्रत्येक व्यक्तीला तिची ओळख आणि अस्मितेची भावना यांची जाणीव होण्यासाठी तिला ज्ञात असलेला इतिहास महत्त्वाची भूमिका बजावत असतो. वर्तमानातील व्यक्तित्वाचे आकलन होण्यामध्येदेखील इतिहासाच्या आकलनाचा मोठा वाटा असतो. व्यक्तीची स्वत:विषयीची कल्पना आणि तिची जीवनदृष्टी ही नेहमी गतकाळाबद्दलच्या ज्ञानामध्ये रुजलेली असते. त्यामुळे आपल्या आजच्या अस्मिता, ओळख, संस्कृती, विचार, मानस इत्यादींचे समर्थन करण्यासाठी इतिहासाचे विश्लेषणात्मक पुनर्लेखन वारंवार केले जाते. रोमिला थापर यांनी ‘द पास्ट अ‍ॅज प्रेझेंट’ या पुस्तकात इतिहासाद्वारे वर्तमानातील मानवी व्यक्तित्व व त्यांच्या जाणिवांना आकार देण्याची निरंतरपणे चालणारी ही प्रक्रिया स्पष्ट करून, वर्तमानाकडे जिवंत इतिहास म्हणून पाहिले आहे.
प्राचीन भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासलेखनामध्ये रोमिला थापर यांचे नाव अग्रेसर आहे. विशेषत: आंतरविद्याशाखीय संशोधनपद्धतीचा उपयोग करून गतकालातील मानवी जीवनाचे विविध पैलू आणि त्याचे वैविध्यपूर्ण अनुभवविश्व उलगडण्याचे थापर यांनी केलेले कार्य भारतीय इतिहासलेखनात अत्यंत मोलाचे मानले जाते. ‘द पास्ट अ‍ॅज प्रेझेंट’ या नव्या पुस्तकात त्यांनी सर्वप्रथम इतिहासविद्येशी संबंधित हिंदू, सिंधू सभ्यता, हडप्पा संस्कृती, प्राचीन आर्य अशा काही महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पुस्तकाच्या पहिल्या भागात इतिहासाचे एक ज्ञानशाखा म्हणून स्वरूप आणि सर्वसामान्यांचे त्याविषयीचे आकलन याविषयी विवेचन केले आहे; किंबहुना आपल्या गतकाळाबाबतचे ग्रह, पूर्वग्रह आणि काही विशेष बाबींबद्दलचे आग्रह तयार होण्यामागची कारणमीमांसा केली आहे, तर पुस्तकाच्या दुसऱ्या भागात भारतीय इतिहासाच्या आकलनाचा व धर्मकारणाचा संबंध स्पष्ट केला आहे. पुढे तिसऱ्या भागात प्राचीन भारताच्या इतिहासातील काही विवाद्य स्थळांविषयी चर्चा केली आहे. त्यानंतरच्या चौथ्या भागात स्त्रीजीवन, लिंगभाव व तत्संबंधी हिंसा व शोषण यांविषयीचे ऐतिहासिक अवलोकन मांडले आहे.
आधुनिक काळातील भारतात राष्ट्र, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद यांसारख्या विचारांच्या आगमनानंतर अस्मितावादी इतिहासलेखनाला सुरुवात झालेली दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात वासाहतिक साम्राज्यवादी परकीयांकडून व त्यास प्रतिक्रिया म्हणून एतद्देशीय राष्ट्रवाद्यांकडून इतिहासलेखन झाले. साम्राज्यवादी गटातल्या इतिहासकारांनी भारतीय जनमानसात काही एकांगी, साचेबद्ध कल्पना, समज रुजवले. अतिप्राचीन काळापासून भारतीय समाज एकजिनसी होता, भारतीय समाज म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्थेतील विभाजित समाज होय, भारतीय सांस्कृतिक विकासाच्या मुळाशी आर्य संस्कृती आहे, प्राचीन भारतीय काळ ‘हिंदू कालखंड’, तर मध्ययुगीन काळ ‘मुस्लीम कालखंड’ अशी इतिहासाची कालविभागणी होते इत्यादी समज उदाहरणादाखल सांगता येतील. आजही आपण कमी-अधिक प्रमाणात या कल्पनांच्या सावटाखालीच विचार करीत असतो. राष्ट्रवादी इतिहासकार व त्यानंतरचे मार्क्‍सवादी इतिहासकार यांनी इतिहासाची मांडणी करताना जाणता-अजाणता काही प्रमाणात याच समजुतींचा अंगीकार केला. त्यात प्राचीन भारताच्या इतिहासलेखनासाठी केवळ संस्कृत भाषेतील साहित्य हेच प्रमुख साधन आहे असे मानल्यामुळे भारताच्या बहुविध सांस्कृतिक वाटचालीचे वर्णन एकांगी झाले. संस्कृतीचे ब्राह्मण्यवादी रूप हेच एकमेव आदर्श आणि भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारे आहे असे बिंबवणे त्यामुळे सोपे झाले. भारताच्या सांस्कृतिक-सामाजिक व त्याचबरोबर राजकीय इतिहासाचा गांभीर्याने विचार केला तर लक्षात येते की, धर्मसंस्था व जातिव्यवस्था गतकालीन मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे सक्रिय होत्या. भारतीय समाज-समुदायांतील सत्तासंबंध व त्याचबरोबर हे सत्तासंबंध अबाधित राहावेत यासाठी कालौघात बदलत गेलेले नियंत्रण-तंत्र याची उकल करण्याची दृष्टी अनेक इतिहास संशोधकांकडे नसते, कारण ते वरील साचेबद्ध कल्पनांच्या प्रभावाखाली असतात.
प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात जातिसंस्थेच्या बाहेरील अनेक समाज-समुदायांचा इतिहासही सरसकट चातुर्वण्र्य चौकटीत बसवला गेला. यात त्यांचा खरा इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले, यामुळे त्यांच्या अस्मिता समूळ नाहीशा झाल्या. उदाहरणार्थ, महाभारतामध्ये एक हजाराहून अधिक वेगवेगळ्या समाज-समुदायांचे उल्लेख आढळतात. हे समाज-समुदाय तथाकथित आर्य संस्कृतीच्या परिघाबाहेर होते. परंतु नंतरच्या उत्तर-वैदिक साहित्यात असे आढळते की जाती-जातींमधील संकरातून जन्माला आलेल्या प्रजेला महाभारतातील या समाज-समुदायांची नावे देऊन नव्या जाती निर्माण करण्यात आल्या. आजच्या आदिवासी समुदायांप्रमाणेच या समुदायांचीदेखील आपापली संस्कृती व समाजरचना होत्या. पण आज नागरी समाजकेंद्रित विकासाच्या कल्पनेलाच मिळालेल्या महत्त्वामुळे या संस्कृतींचे वेगळेपण व त्यांचा इतिहास नाकारून त्यांना मागासलेले ठरवले जाते आणि त्यांतील पर्यायी समाजरचनांकडे दुर्लक्ष होते. परिणामी इतिहासाच्या प्रवाहातूनदेखील त्यांच्या संस्कृतीचे अस्तित्व पुसले जाते. मुख्य प्रवाहाबाहेरच्या समाजरचनांचे अस्तित्व मान्य करून इतिहासलेखन करण्याचे हे प्रारूप स्वीकारले, तर खऱ्या अर्थाने भारतीय बहुविध संस्कृतीच्या मुळांचा मागोवा घेता येईल, हे थापर यांच्या या पुस्तकातील विवेचनावरून स्पष्ट होते.
प्राचीन काळापासून आजतागायत शारीरिक श्रमजीवी वर्ग केवळ दलित-वंचित जातींतून आणि आदिवासी जनजातींमधूनच का यावा, याचे उत्तर आपल्या पूर्वग्रहदूषित ज्ञानव्यवहारामध्ये व एकांगी इतिहासलेखनामध्ये सापडेल. रोमिला थापर यांच्या मते, जातिसंस्थेबरोबरच धर्माचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. भारताच्या बहुविध संस्कृतीचा आविष्कार प्रत्येक कालखंडात आढळतो. प्राचीन काळात इ. स. पूर्व सहाव्या शतकात सनातनी वैदिक धर्माला आव्हान देण्यासाठी जैन, बौद्ध, आजीविक, चार्वाक यांसारखे तब्बल ६२ धर्मसंप्रदाय उदयाला आले. पुढे मध्ययुगात भक्तिचळवळ व त्याअनुषंगाने मानवता, भूतदया, समानता अशी समाजसुधारक तत्त्वे सर्वश्रुत आहेत. असे दिसते की, इतिहासाच्या ज्या ज्या टप्प्यावर तात्त्विक व्यवहाराच्या पातळीवर धर्मकारणात मोठय़ा प्रमाणात वाद-प्रतिवाद व तर्क-वितर्क होत होते, वैचारिक घुसळण होत होती, तेव्हा तेव्हा भारतीय समाजमानस त्याच्या उन्नत अवस्थेस पोहोचले. यावरून भारतीय समाजातील राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक अशा कोणत्याही स्वरूपाच्या इतिहासलेखनात धर्मकारण आणि जातिसंस्था यांच्या संदर्भातील आकलन आवश्यक ठरते हे स्पष्ट होते.
जसे मुख्य प्रवाही भारतीय इतिहासलेखन केवळ आर्य संस्कृतीकेंद्रीच केले गेले, तसेच ते लिंगभाव असमानता व पितृसत्ताक मनोवृत्तीमध्येही जखडले गेलेले आहे. आजच्या लिंगभावाधारित सत्तासंबंधांना पूरक असा इतिहास लिहिला गेला. गतकाळातील स्त्रीजीवन, स्त्रियांचे अनुभवविश्व व त्यांचा अवकाश यांची मुख्य प्रवाही इतिहास आकलनामध्ये अनुपस्थिती जाणवते. सामाजिक इतिहासलेखनामध्ये येणारे स्त्रीजीवनाविषयीचे उल्लेख ‘स्त्रीधर्म’, ‘स्त्रीस्वभाव’ व ‘स्त्रीव्यवहार’ अशा लिंगभावदूषित संकल्पनांच्या भोवतीच फिरत असतात. कुटुंब आणि स्त्रिया, धर्म आणि स्त्रिया, वैराग्य आणि स्त्रिया, जात आणि स्त्रिया, व्यापार-व्यवसाय आणि स्त्रिया, खासगी अवकाश आणि सार्वजनिक जीवन अशा अनेक दृष्टिकोनांतून प्रत्येक स्त्री-प्रतिमेचा अभ्यास होणे इतिहासलेखनात आवश्यक आहे. स्त्रियांचे अनुभवविश्व जातिनिहाय व वर्गनिहाय बदलत जाते व त्यानुसार त्यांच्या शोषणाचे स्वरूप व तंत्र बदलत जाते. सामाजिक इतिहास लिहिताना या स्त्री-प्रतिमांना वेगवेगळ्या स्वरूपांत पाहणे आवश्यक आहे. सतिप्रथा, जोहार, पडदाप्रथा, अग्निपरीक्षा, क्षात्रतेज, शुद्धी व विटाळ; त्याचबरोबर लग्नसंस्था, अस्पृश्यता, गुलामगिरी अशा अनेक सामाजिक प्रथा, संस्था आणि धारणा यांचा उलगडा होण्यासाठी व लिंगभावाधारित व्यक्तित्वाची जाण येण्यासाठी पठडीबद्ध ज्ञाननिर्मितीला आव्हान देण्याची गरज आहे.
भारताला इतिहासाची अखंड परंपरा आहे. प्राचीन काळापासून आजवरचे या इतिहासाच्या प्रवाहित्वाचा प्रत्येक पैलू आपली आजची गरज ठरवत असतो. भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे तत्त्व उजळण्यासाठी वेगवेगळ्या समाज-समुदायांचे वेगळेपणा व संवादीपणा अधोरेखित करणारा इतिहास लिहिला जाण्याची गरज आहे.   
  हे पुस्तक रोमिला थापर यांनी त्यांच्या परिचयाच्या काही अल्पवयीन मुलांना अर्पण केले आहे. पुढे मोठे झाल्यानंतर आपण नेमका कशाचा आणि कोणता वारसा जपावा याची निवड करताना या पुस्तकाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी अर्पणपत्रिकेत व्यक्त केली आहे. पुस्तकातून प्रकट झालेली भारतीय सर्वसमावेशक जीवनदृष्टी पाहता त्यांची ही अपेक्षा योग्यच वाटते.
द पास्ट अ‍ॅज प्रेझेंट – फोर्जिग कन्टेम्पररी आयडेंटिटीज थ्रू हिस्ट्री – रोमिला थापर,
अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने : ३४४, किंमत : ५९५ रुपये.
‘इतिहास माणसाला शहाणं करतो’ असे बेकन म्हणतो. भारताच्या इतिहासाकडे स्वच्छ नजरेने पाहिले तर त्यातून शहाणपणाचेच धडे अधिक प्रमाणात शिकायला मिळतात. त्या धडय़ांची उजळणी आणि त्यांची अनिवार्यता रोमिला थापर यांचे हे पुस्तक अधोरेखित करते.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..