फ्लोरिडातील एका कृष्णवर्णी तरुणाची हत्या गौरवर्णी सुरक्षा रक्षकाने केल्यानंतर अमेरिकेतील वर्णसंघर्षांने पुन्हा उचल खाल्ली. त्या सुरक्षा रक्षकाच्या निर्दोष सुटकेने त्यात अधिकच भर पडली. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारने या प्रकरणी पुन्हा खटला दाखल केला तरी देशोदेशी घडते त्याप्रमाणे बेमौत मरणाऱ्यांबाबत जे होते तेच होईल.
अमेरिका सध्या दुभंगलेली आहे. न्यायालयाच्या एका निकालामुळे कृष्णवर्णीय आणि इतरांमधील न बुजलेली दरी पुन्हा एकदा उघड झाली असून अध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचे आवाहन करावे लागले आहे. या अशांततेच्या मुळाशी आहे १७ वर्षीय ट्रेव्हर मार्टिन या कृष्णवर्णीय तरुणाची हत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तो मारला गेला. फ्लोरिडा येथील एका निवासी संकुलात त्याची सुरक्षा रक्षकाशी झटापट झाली आणि त्यानंतर गोळीबारात मार्टिन मारला गेला. एरवी अन्य कोणत्याही गुन्ह्य़ाप्रमाणे याचीही नोंद झाली असती आणि कायद्यानुसार जे काही व्हायचे ते झाल्यावर विषय मिटला असता. परंतु याबाबत तसे झाले नाही. कारण सुरक्षा रक्षक जॉर्ज झिमरमन याचा वर्ण. जॉर्ज हा गोरा आहे. केवळ संशयाने त्याने मार्टिन याची हत्या केली असा प्रचार होत गेला आणि वातावरण तापले. जॉर्ज याचे म्हणणे असे होते की निवासी संकुलात घुसल्यावर मार्टिन याने सुरक्षा नियम पाळण्यास नकार दिला आणि हल्ला केला. अशा परिस्थितीत आपणास जीव वाचवण्यासाठी गोळीबार करावा लागला, असे जॉर्ज याचे म्हणणे. या प्रकरणी चौकशी सुरू झाल्यावर स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज याच्या बाजूने पक्षपात केला अशी टीका स्थानिक कृष्णवर्णीयांनी केल्यावर चौकशी अधिकारी बदलला गेला. परंतु नंतरच्या चौकशी अधिकाऱ्यानेही काही वेगळे केले असे नाही. यामुळे गौर आणि कृष्णवर्णीयांत मोठाच तणाव निर्माण झाला. मार्टिन हा केवळ वर्णाने काळा आहे म्हणून त्याला गुन्हेगार समजले गेले आणि त्या संशयातूनच त्याची हत्या झाली असे निदर्शकांचे म्हणणे होते. त्यांची मागणी होती की जॉर्ज याच्यावर सदोष मनुष्यवधाचा वा खुनाचा गुन्हा दाखल केला जावा. तसे झाले नाही. त्यामुळे संतापून वर्णविद्वेषाविरोधात लढणाऱ्या आणि मानवी हक्क आयोग आदी संघटनांनी स्थानिक पोलिसांविरोधात जाहीर भूमिका घ्यायला सुरुवात केली. या हत्येस जबाबदार असणाऱ्यावर वर्णविद्वेषाचाही गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी होती. या संपूर्ण प्रकरणात जॉर्ज याची भाषा काय होती, हाही मुद्दा उपस्थित झाला. आपल्याकडून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यावर जॉर्ज याने स्थानिक पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली आणि स्वत:स पोलिसांस सादर केले. पोलिसांना हत्येची माहिती देणारा दूरध्वनी करताना जॉर्ज याने कृष्णवर्णीयांचा अपमान होईल असे काही वर्णवाचक शब्द उच्चारले होते का, असाही प्रश्न उपस्थित झाला. परंतु तसे काही घडलेले नव्हते. जॉर्ज याने कोणतीही अपमानास्पद भाषा वापरली नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु जॉर्जने ही हत्या वर्णसंघर्षांतूनच केली, असे त्याच्या विरोधकांचे ठाम म्हणणे होते आणि त्यावरून समाजात दोन तट पडल्याने दोन्ही बाजू अहमहमिकेने निदर्शने करीत होत्या. या प्रकरणात हवा बरीच तापली. तिची दखल घेत अध्यक्ष ओबामा यांनीही भाष्य केल्याने ही दुफळी अधिकच वाढली. माझा मुलगा मोठा झाल्यावर मार्टिनसारखाच दिसला असता, अशा आशयाचे विधान ओबामा यांनी केल्याने हा प्रश्न अधिकच तापला. ओबामा हे स्वत: आफ्रिकी अमेरिकन असल्याने वर्णावरील विखारी संघर्षांत ते काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी सूचक पण सावध विधान केले. त्यातून ना जॉर्ज समर्थकांना आधार मिळाला ना मार्टिन याच्या पाठीराख्यांना. तेव्हा आता न्यायालय काय भूमिका घेते त्यावरच या प्रश्नावरील जनआंदोलनाची दिशा ठरणार होती. अखेर न्यायालयाचा या संदर्भातला निर्णय आला आणि त्यातून जॉर्ज याला पूर्णत: निदरेष सोडण्यात आले. न्यायालयाचे म्हणणे असे की जॉर्ज यास स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला हे सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा आहे. त्याच्या तोंडाला झालेल्या जखमा आणि डोक्यास मागील बाजूस पडलेली खोक यावरून हेच सिद्ध होते, असे न्यायालयाचे म्हणणे. पण तेही आता मार्टिन समर्थकांनी फेटाळले आहे. यात पहिला हल्ला कोणी केला हे अजिबात स्पष्ट होत नाही तेव्हा त्याच्या स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला या दाव्यात काहीही तथ्य नाही, असे त्यांचे म्हणणे. या घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आला नाही. फ्लोरिडातील या वसाहतीत उच्चभ्रूंची निवासस्थाने आहेत आणि योगायोग असा की त्यात जवळपास सर्वच गोरे आहेत. तेव्हा अशा उच्चभ्रूंच्या वसाहतीत एक आफ्रिकी व्यक्ती अनाहूतपणे शिरली म्हणूनच त्याची हत्या झाली या मार्टिन समर्थकांच्या दाव्यास देशभरातून प्रतिसाद मिळाला आणि आता यापुढे आपली तरुण मुले सुरक्षित राहू शकणार नाहीत, असे आक्रंदन कृष्णवर्णीय मातांनी सुरू केले.
न्यायालयाने जॉर्ज यास निदरेष सोडताना स्थानिक कायद्याचा आधार घेतला. अमेरिकेत कित्येक राज्यांत मुक्त बंदूक परवाना धोरण आहे. त्यामुळे कोणासही शस्त्रे सहज मिळू शकतात. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे अनेक पाहण्यांतून आढळून आले. दुर्दैवी बाब ही की यात पकडले गेलेले बहुसंख्य गुन्हेगार हे कृष्णवर्णीय होते वा असतात. अनेक मोठय़ा शहरांच्या वेशीवर कृष्णवर्णीय गरिबांच्या वस्त्या अमेरिकेत आढळतात आणि त्यातलेच बेरोजगार मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगारीच्या चक्रात अडकतात. तेव्हा अशांना प्रतिकार करता यावा म्हणून अनेक राज्यांनी कायदा केला असून त्यानुसार कोणाही नागरिकास स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याचा अधिकार आहे आणि या गोळीबारात एखाद्याचे प्राण गेले तरी तो करणाऱ्यास खुनाच्या आरोपास तोंड द्यावे लागत नाही. जॉर्ज यास याचाच फायदा मिळाला आणि त्यामुळे न्यायालयाने त्यास दोषमुक्त केले. परंतु त्यामुळे दोन वर्णीयांतील दरी अमेरिकेत अधिकच रुंदावलेली असून न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर भाष्य करताना अध्यक्ष ओबामा यांना बरीच कसरत करावी लागली. या निर्णयावर टोकाची भावना व्यक्त करण्याचा मोह उभय समाजातील मंडळींनी टाळावा असे ओबामा यांनी सुचवले. त्यांच्यावर तशी वेळ आली कारण मार्टिन याच्या समर्थनार्थ कृष्णवर्णीय मोठय़ा संख्येने बाहेर पडताना दिसल्यावर गौरवर्णीयांनी आपली ताकद जॉर्ज याच्या मागे उभी केली. परिणामी दोन्ही गटांतील तणाव आणखीनच वाढला. याची दखल घेत अमेरिकी सरकारनेच आता जॉर्ज याच्यावर पुन्हा नव्याने खटला दाखल करता येईल किंवा काय हे तपासण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
तज्ज्ञांच्या मते जॉर्ज याच्यावर पुन्हा खटला भरता येणार नाही. आणि भरला तरी त्यात जॉर्जचा गुन्हा तर सिद्ध करताच येणार नाही. याचे कारण असे की जॉर्ज यास दोषी ठरवायचे असेल तर तो वर्णविद्वेषाने भारलेला होता असे मार्टिनच्या समर्थकांना सिद्ध करावे लागेल. ते शक्य नाही. कारण जॉर्ज यास आफ्रिकींचा तिटकारा होता हे सूचित करता येईल, असा एकही पुरावा नाही. या संदर्भात ज्येष्ठ सरकारी वकील काय म्हणाले ते नोंद घेण्यासारखे आहे. ‘जॉर्ज उघडपणे वर्णविद्वेषी नाही, हे नक्कीच. परंतु मनाच्या तळाशी लपून राहिलेल्या वर्णविद्वेषी वृत्ती या कृतीमागे नाहीत, असेही म्हणता येणार नाही. पण मनाच्या तळाचे काही कायद्याच्या कचाटय़ात पकडता येत नाही.’
जे काही झाले ते सूचक आहे आणि यातील नावे आणि प्रांत बदलल्यास ही घटना सहज भारतीय वाटेल. भारतात असे अनेक मारुती कांबळे बेमौत मेले आहेत. महासत्तेतील या मारुती कांबळेचे काय होते हे पाहायचे.