scorecardresearch

रक्तदानातून रक्ताचा सातत्याने पुरवठा व्हायला हवा..

कालच झालेल्या राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त रक्तदानाबाबत जनजागृतीचे महत्त्व मांडणारा लेख-

रक्तदानातून रक्ताचा सातत्याने पुरवठा व्हायला हवा..
रक्तदानातून रक्ताचा सातत्याने पुरवठा व्हायला हवा..

डॉ. शंकर मुगावे

आज देशभरात ‘जागतिक रक्तदान दिन’ साजरा करण्यात येत आहे. रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्यासोबतच त्याच्या विविध आजारांच्या आणि रक्तदात्याच्या रक्त गोठण्याच्या आजाराच्या समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते.

भारतीय वैद्यकीय संक्रमण क्षेत्रात डॉ. जी.जे. जॉली यांचा रक्तपेढीमध्ये उत्कृष्ट व्यावसायिक सेवा, संशोधन आणि शिक्षण विकसित करण्यात सिंहाचा वाटा आहे. भारतातील रक्त संक्रमण सेवा त्यांच्या नावानेच आणि त्यांच्या संशोधन कार्यानेच आजतागायत चालू आहे. याप्रमाणेच भारतीय राष्ट्रीय रक्त धोरण ठरविण्यात आले आहे. म्हणूनच राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संगठन या विभागाअंतर्गत डॉ. जी.जे. जॉली यांचा जन्मदिवस १ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय रक्तदान दिवस’ म्हणून देशभर साजरा केला जातो.

हेही वाचा- पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार वादग्रस्त ठरले, कारण…

मानवी रक्त शुद्ध ठेवून ते वाढवण्यासाठी सर्वात मुख्य उपाय म्हणजे नियमित व्यायाम – प्राणायाम बरोबरच रक्तदान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तदान हे एक परम कर्तव्य आणि सामाजिक बांधीलकी समजून प्रत्येकाने ऐच्छिक रक्तदान करावे. मानवी शरीरातील रक्त हा द्रव पदार्थ अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे सुदृढ माणसाच्या शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असते. मानवाला नियमित हालचालींसाठी तीन लिटर रक्त लागते तर तीन लिटर रक्त प्रत्येक सक्षम आणि सदृढ व्यक्तीच्या शरीरात राखीव असते. यातूनच व्यक्ती रक्तदान करताना ३५० मिली. दान करतो. रक्त हा मानवी शरीरातील परमेश्वरी घटक आहे. एकाच्या रक्तदानातून दोन ते तीन रुग्णांचा जीव वाचवू शकतो. रक्तदानाद्वारे दिलेले रक्त कोणत्याही प्रकारचा थकवा न येता आठ ते चोवीस तासात मानवी शरीर भरून काढते.

प्रत्येक सुदृढ व्यक्तीला वर्षातून चार वेळेस म्हणजेच तीन महिन्याला एकदा रक्तदान करता येते. यासाठी तुमचे वय १८ ते ६५ वर्षापर्यंत आणि वजन ४५ ते ५० किलोच्या वर आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रामच्यावर असावे लागते. रक्तदानापूर्वी रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि नंतरच योग्यता पाहून रक्त घेतले जाते. रक्तदान केल्याचे आत्मिक समाधान मिळते. तसेच, रक्तदात्याला निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदतच होते.

हेही वाचा- ..अजूनही सोन्यावरच भरवसा

भारतात स्त्रियांचा व मुलींचा रक्तदानातील सहभाग केवळ सात टक्केच असल्याचे आढळून आले आहे. कारण त्यांच्या आहाराचे योग्य व नियमित नियोजन नसल्यामुळे जास्तीत जास्त स्त्रिया व मुली या ॲनेमिक असल्याचे दिसून आले आहे. रक्त हा मानवी जीवनाचा प्राण आहे.

रक्त सतत शुद्ध ठेवण्यासाठी वा वाढवण्यासाठी सुदृढ आणि निरोगी व्यक्तीने रक्तदान करणे आवश्यक आहे. गरजू माणसासाठी रक्त हा जीवन प्रवाह असतो. रक्त पुरवठ्याची सामाजिक गरज जशी वाढत चालली तशी रक्तदात्याची प्रबोधन करण्याची आणि जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदान करून घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर झालेल्या सामाजिक बदलामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रातील नेत्रदीपक प्रगतीमुळे अवघड वाटणाऱ्या शस्त्रक्रिया सोप्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे रक्ताची जास्त गरज भासत आहे. त्यातल्या त्यात थॅलेसेमियाच्या विकारात रक्त तयार करण्याची शारीरिक क्षमताच नष्ट झालेली असते. अशावेळी सतत त्या रुग्णांना रक्त संक्रमण द्यावे लागते.

रक्तटंचाईवेळी शिबिरातून आणि गरजेच्या वेळी रक्तदान करणे योग्य आहे, पण सध्या सणासुदीच्या आणि विशेष दिवस साजरे करण्यासाठी अनेकवेळा रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात घेण्यात येताना दिसत आहेत. यामुळे कधी कधी रक्त संकलन मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. यासाठी रक्तपेढी आणि रक्तदान शिबिर आयोजकांबरोबरच नियमित रक्तदात्यांनी याबाबत जागरूक होऊन रक्तदान केले पाहिजे.

हेही वाचा- सरकारने कशाला पेलायला हवा विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाचा भार?

रक्तदान चळवळीत देशात महाराष्ट्र सर्वात अधिक प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई याची स्थापना २२ जानेवारी १९९७ रोजी झाली. यानंतरच खऱ्या अर्थाने राज्यात रक्तक्रांतीला सुरुवात झाली. गेल्या पंचवीस वर्षात योजनाबद्ध प्रयत्न करून रक्तदानाबाबत महाराष्ट्र राज्याने रक्तक्रांती घडवली आहे. केंद्रीय धोरणानुसार “शंभर टक्के” ऐच्छिक रक्तदान ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. भारतात आजमितीस एकूण ३०२३ नोंदणीकृत रक्तपेढ्या अंतर्गत ११.४५ मिलियन रक्त पिशव्या गोळा झाले. भारतात प्रत्येक वर्षाला १ कोटी ब्लड युनिटची गरज भासते. यामध्ये ८५ टक्के रक्त संकलन ऐच्छिक रक्तदान स्वरूपात होते. महाराष्ट्रात ३५ जिल्ह्यांतून ३५० रक्तपेढ्या अंतर्गत सन २०१९ मध्ये १७ लाख २३ हजार ३६३ एवढे युनिट्स रक्त संकलित झाले, यामध्ये ९७.५४ टक्के रक्त संकलन ऐच्छिक स्वरूपात होते. तर सन २०२० मध्ये करोना महामारीच्या संकटामुळे १५ लाख ४५ हजार ८२६, तर सन २०२१ मध्ये १६ लाख ७३ हजार ३७३ एवढे रक्त संकलन झाले आहे. यामध्ये ९९.०७ टक्के रक्त संकलन ऐच्छिक स्वरूपात झाले आहे. करोना संसर्गाचा रक्त संकलनाला फटका बसल्याने सन २०२० मध्ये १ लाख ७७ हजार ५३७ एवढे रक्त संकलन घटले होते. नवीन रक्तदात्यांसोबतच नियमित रक्तदाते वाढविणे ही काळाची गरज आहे. यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

लेखक रक्तपेढी समुपदेशन तज्ज्ञ तसेच विभागीय रक्तपेढी समन्वयक असून पुणे येथे कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या