एके काळी मध्य प्रदेश सरकारला प्रचंड महसूल देणारा बस्तर जिल्हा (आता छत्तीसगडमधील) नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला बनला आहे. या ठिकाणीच असलेल्या अबुझमाड येथे नक्षलींच्या वार्षिक बठकांचे आयोजन होते. माओवाद्यांनी बस्तरची निवड का व कशी केली.. काय आहे ही नक्षलवादी चळवळ, कसे चालते या चळवळीचे कार्य, कोठून येतो त्यांना पसा?
‘गरिबांना, भूमिहीनांना, आदिवासींना जमीन कसायला दिली नाही तर अल्पावधीतच रक्तरंजित क्रांती होईल. हे घडू द्यायचे नसेल तर शेतकऱ्यांचे, गरिबांचे, शोषितांचे हित जपणाऱ्या काँग्रेसलाच निवडून द्या..’
१९७८ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत करीमनगर जिल्ह्यातील जगतियाल येथे प्रचारसभेत इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर टीका करताना क्रांतीची ही भीती बोलून दाखवली होती. इंदिरा गांधींच्या झंझावाती प्रचारामुळे आंध्रमध्ये काँग्रेसला सत्ता तर मिळाली, मात्र इतर अनेक वचनांप्रमाणे जमीन वाटपाच्या याही वचनाचा काँग्रेस सरकारला सोयीस्कर विसर पडला आणि ‘गरिबी हटाओ’ची घोषणा ही निव्वळ घोषणाच राहिली.
आता या घटनेचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे बस्तर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी झालेले हत्याकांड. नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षालाच लक्ष्य करत राज्याचे नेतृत्वच संपवून टाकले. या घटनेनंतर सध्या सुरू असलेल्या प्रतिक्षिप्त क्रियांच्या कल्लोळात इतिहास विसरून चालता कामा नये.
६०च्या दशकाच्या उत्तरार्धात पश्चिम बंगालमधील नक्षलबाडीत चारू मुजुमदार यांनी सुरू केलेल्या जमीनदारांविरोधातील आंदोलनाने पेट घेतला होता. या आंदोलनालाच पुढे ‘नक्षलवाद’ असे संबोधले जाऊ लागले. नक्षलवादाच्या या ठिणगीने ७०च्या दशकात आंध्र प्रदेशात वणव्याचे रूप घेतले होते. व्यवसायाने शिक्षक असलेल्या कोंडापल्ली सीतारामय्या यांनी या वणव्याचे नेतृत्व स्वीकारत आदिलाबाद, वारंगळ, तेलंगणा परिसरात चळवळीला आकार दिला. तिलाच पुढे माओवादाचे अधिष्ठान देण्यात आले आणि आज या चळवळीने उग्र रूप धारण केले आहे. ‘रिव्हॉल्यूशन इज नॉट अ डिनर पार्टी, इट सीक्स सॅक्रिफाइस..’ हा माओ झेडुंग यांचा आवडता युक्तिवाद. तो शिरसावंद्य मानूनच नक्षलवाद्यांनी चळवळ सुरू ठेवली आहे. मात्र, चळवळीचा आवाका वाढल्यानंतर आणि पोलीस-प्रशासनाच्या कारवायांनंतर नक्षलवाद्यांना जंगलांचा आसरा घ्यावा लागला. ‘सेफ झोन’च्या शोधार्थ कोंडापल्ली सीतारामय्या यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पाच गट स्थापन करून त्यांना गोदावरीच्या तटावरील जंगलांत पाठवले. या परिसराला दंडकारण्य असे संबोधले जाते. बस्तर, आदिलाबाद, वारंगळ या जिल्ह्यांच्या सीमारेषेला लागून असलेल्या या दंडकारण्यातूनच आज नक्षलवाद्यांच्या कारवायांचे संचालन केले जाते. बस्तर हा जिल्हा त्याचा केंद्रिबदू..
सध्या छत्तीसगढमध्ये असलेल्या या जिल्ह्याच्या चतुसीमा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांना भिडल्या आहेत. चार हजार चौरस किमी परिसरात पसरलेल्या बस्तरच्या जंगलातून एकेकाळी मध्य प्रदेश सरकारला दरवर्षी तब्बल २५० कोटींचा महसूल प्राप्त व्हायचा. २३६ गाव-पाडे या परिसरात असून ७६ विविध प्रकारच्या वनसंपत्ती या ठिकाणी आढळतात. मात्र, वनखात्यातील अधिकारी, जमीनदार, कॉर्पोरेट्स यांनी केलेली येथील वनसंपत्तीची आणि आदिवासींची लुटालूट आणि त्यानंतर माओवाद्यांनी येथे टाकलेला डेरा यानंतर आता हे जंगल फक्त माओवाद्यांचे केंद्रस्थान म्हणूनच ओळखले जाते.
बस्तर आणि एकूणच नक्षलवादी चळवळीच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याविषयी जाणून घ्यायची इच्छा असलेल्यांसाठी राहुल पंडिता यांचे ‘हॅलो बस्तर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज माओइस्ट मूव्हमेंट’ हे पुस्तक उपयुक्त आहे.  बस्तरच्या जंगलातील आदिवासींचे जिणे कसे होते. राज्यकत्रे, जमीनदार, वनखात्यातील अधिकारी यांनी बस्तरच्या आदिवासींचे कसे शोषण केले. या ठिकाणी दंडभेद नीती अवलंबून माओवाद्यांनी बस्तरच्या जंगलातच असलेल्या अबुझमाडला आपला बालेकिल्ला कसा बनवला याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात लेखिकेने केले आहे.
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती व मालोजूला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी (२४ नोव्हेंबर २०११ रोजी किशनजी यांचा सुरक्षा दलांच्या चकमकीत मृत्यू झाला) यांच्या मुलाखतीतून नक्षलवाद्यांची विचारसरणी हळूहळू उलगडत जाते. मुंबईच्या वरळी सी फेस या उच्चभ्रू वस्तीत तब्बल चार हजार स्क्वेअर फुटांच्या मॅन्शनमध्ये राहूनही गरिबांविषयी कळवळा असलेले कोबाद घांदी नक्षलवादी का बनले, नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) या सशस्त्र संघटनेचे चालणारे कार्य, त्यांना मिळणारे प्रशिक्षण, माओवादी कम्युनिस्ट पाटीर्ची रचना, त्यांच्या परिषदा, क्रांतीची विचारधारा, अविकसित भागांत नक्षलवाद्यांना असलेले पाठबळ, नक्षलवादी नेत्यांच्या झालेल्या हत्या, पोलीस-प्रशासनाच्या क्रौर्यामुळे घडलेली हत्याकांडे याचा तपशील अस्वस्थ करणारा आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, बेंगळुरू अशा अनेक मेगासिटींमध्ये वाढलेले बकालीकरण, झोपडपट्टय़ा, असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये वाढत असलेला असंतोष, एकीकडे प्रचंड श्रीमंती आणि दुसरीकडे प्रचंड गरिबी असे असताना सरकारची बेफिकिरी, या सर्वावर उपाय म्हणून माओवाद कसा उपयुक्त आहे, याची महती पटवून देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आखलेला अर्बन अजेंडा, हा या पुस्तकाचा ‘कोअर एरिया’ म्हणावा लागेल. एकीकडे सीमेपलीकडील दहशतवाद सातत्याने डोके वर काढत असताना देशांतर्गत परिस्थितीच कशी नक्षलवाद फोफावण्यासाठी पोषक आहे, हे सर्व थोपवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याचाही विचार लेखिकेने केला आहे. माओवाद्यांच्या कोअर एरियात जाऊन, त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती घेऊन या चळवळीच्या दोन्ही बाजूंवर झगझगीत प्रकाश टाकण्याचा हा अलीकडच्या काळातील कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचे स्वरूप समजून घेण्यासाठी तसेच अभ्यासासाठीही ‘हॅलो बस्तर..’ नक्कीच उपयुक्त आहे.
हॅलो बस्तर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज माओइस्ट मूव्हमेंट : राहुल पंडिता,
प्रकाशक : ट्रँक्विबार,
पाने : २१६, किंमत : २५० रुपये.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष