‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’ या विश्वगुरूंच्या आवाहनानंतर हर्षोल्हासित झालेली ‘बाहुबली’ची टीम हैदराबादला दिग्दर्शक राजमौली यांच्या घरी तातडीने जमली. जगभर लोकप्रिय झालेल्या या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी योग्य कथानक सुचत नाही म्हणून आजवर चिंतेत पडलेल्या मौलींना तर आनंदाचे भरते आले होते. पुन्हा हजार कोटीचा गल्ला त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागला. मग त्यांच्यासह बाहुबली साकारणारा प्रभास, कटप्पा साकारणारा सत्याराज व शिवगामीदेवीची भूमिका करणारी अनुष्का शेट्टी यांच्यात कथानकाविषयी सखोल मंथन सुरू झाले. पहिल्या भागात आपण बाहुबलीला ठार मारले पण खुद्द विश्वगुरूंचीच इच्छा असल्याने त्याला जिवंत करावे लागेल असे एकाने सुचवताच सत्याराज थोडा नाराज झालेला दिसला. ते लक्षात येताच प्रभासने त्याची समजूत काढली. हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत ५० कोटी बाहुबली देशात तयार झालेले असतील व ते सर्व थिएटरमध्येच चित्रपट बघतील असा युक्तिवाद त्याने करताच मौलींचे डोळे चमकले. सत्ता राखण्यासाठी सर्वकाही असाच आपल्या दोन्ही भागाच्या कथानकाचा आशय होता. आता नव्याने मांडणी करताना सत्ता राखण्यात करोनाने निर्माण केलेले अडथळे व त्यावर केलेली मात अशा आशयाभोवती कथानक फिरवावे लागेल असे मौलींनी सांगताच प्रभासने त्याला दुजोरा देत हेच विश्वगुरूंना अपेक्षित असणार, अशी पुस्ती जोडली. ‘तिसऱ्या भागाचा शेवट करताना मी बाहुबलीला मारणार नाही ’असे सत्याराजने मध्येच सांगताच सारे चमकले. ‘विश्वगुरूंनी ज्याचे नाव घेतले तो अमर असतो’असे कारण त्याने समोर करताच सर्वांनी माना डोलावल्या. करोना हा आधुनिक विषाणू असल्याने या सिनेमात ऐतिहासिक संदर्भ नसतील, म्हणजेच नव्याने वेशभूषा डिझाईन करावी लागेल अशी शंका अनुष्का शेट्टीने काढली. यावर काही काळ कुणी बोलले नाही. अखेर मौलींनी हा विषय आयटी सेलसोबतच्या चर्चेतून सोडवू असे सांगताच सारे सुखावले. ‘शिवगामीदेवीचा मुलगा भल्लालदेव व नवरा बिजालादेवला बाहुबलीचे कल्याणकारी राज्य बघवत नाही. ते दोघे चीनला जाऊन अत्तराच्या कुपीत विषाणू आणतात. ते अत्तर बाहुबलीच्या हातावर लावताच तो आजारी पडतो. मग प्रजा आजारी पडते. शेवटी वडाच्या झाडाखाली झोपून, प्राणवायू मिळवून बाहुबली बरा होतो. मग तो आयुर्वेदाचा आधार घेऊन भारतीय लस तयार करतो. त्याद्वारे राज्य करोनामुक्त केल्यावर विषाणूच्या उगमाचा शोध घेऊन त्या दोघांना ठार करतो असे कथानक ठेवू.’ मौलींनी हे सांगताच सत्याराजचा चेहरा पडला. हे लक्षात येताच बाहुबलीचा सेनापती म्हणून तू त्या दोघांना ठार मार अशी दुरुस्ती मौलींनी सुचवताच तो आनंदतो. विश्वगुरूंनी बोलताना ‘बाहू’वर जोर दिलाय तेव्हा त्यावरही विचार करावा लागेल असे प्रभास म्हणताच मौली हसतात. सिनेमातल्या शेवटच्या युद्धात ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले त्यांनाच सहभागी करून घेतले असे दाखवू व त्यांचे बाहू तांत्रिक इफेक्टने जरा फुगलेले दाखवू, अशी कल्पना अनुष्काने मांडताच साऱ्यानी टाळ्या वाजवल्या. अनुष्काने विचारले, बाहुबलीची पत्नी देवसेनेचे काय? ‘तिला लशीच्या प्रचारासाठी फिरणारी राणी दाखवू’असे प्रभासने सुचवताच मौलींचा त्यावर आक्षेप : विश्वगुरूंची भावना लक्षात घेता हे पात्र पुरुषच हवे. त्यासाठी बाहुबलीचा मुलगा महेंद्र आहेच. यावर साऱ्याचे मतैक्य होते. पण सिनेमातल्या प्रमाणपत्रावर छायाचित्र कुणाचे छापायचे असा प्रश्न मौली उपस्थित करत असतानाच त्यांना दिल्लीच्या चाणक्य मंडळातून फोन येतो. ‘कथानक तयार झाले असेल तर ते तातडीने मंजुरीसाठी पाठवा. विश्वगुरूंचा निरोप आहे.’
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2021 रोजी प्रकाशित
बाहुबली-भाग ३
सत्ता राखण्यासाठी सर्वकाही असाच आपल्या दोन्ही भागाच्या कथानकाचा आशय होता.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-07-2021 at 00:06 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccination corona infection bahubali part 3 akp