मंत्रालय.. हा एक शब्द नाही तर चार अक्षरी मंत्र आहे कोटय़वधी लोकांसाठी. हजारो राजकारणी, लाखो कार्यकर्ते, हजारो कोटी रुपयांच्या विविध सरकारी योजनांचे कोटय़वधी लाभार्थी यांच्या विविध आशा-आकांक्षांना अर्थ मिळतो तो याच वास्तूत. म्हणजे एका अर्थाने राज्यातील कोटय़वधींचे उदरभरण या वास्तूशी निगडित आहे आणि या वास्तूमधील कारभार चालतो मंत्री, शेकडो बडे अधिकारी व हजारो अधिकारी-कर्मचारी यांच्या आधारे. मंत्रालयात या हजारो कर्मचाऱ्यांचा सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, नाश्ता पुरवण्यासाठी मंत्रालयात उपाहारगृह आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या उपाहारगृहातील चूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड पेटत असते. पण या करोनाने त्यास जरा विश्रांती दिली. तरी गेल्या काही महिन्यांपासून मंत्री-सचिवांची कार्यालये गजबजू लागली. करोनाच्या संकटातून राज्याला सोडवण्यासाठी, राज्याचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपल्या विभागाला काय काय करता येईल यासाठीच्या बैठकांना जोर आला. मंत्री-सचिव, बडे अधिकारी सारेच राज्याच्या तिजोरीचे आणि आपल्या विभागावर अवलंबून असलेल्या मायबाप जनतेचे उदर कसे भरायचे याची चिंता करू लागले. मंत्रालयात होणाऱ्या मंत्र्यांच्या-सचिवांच्या बैठका म्हणजे चहा-कॉफी आणि अल्पोपाहार असा खासा बेत. अवघ्या राज्याचा गाडा हाकायचा, त्यासाठी चिंतन करायचे, धोरणे ठरवायची तर ऊर्जाही लागणारच. ती अल्पोपाहाराशिवाय शक्यच नाही. उदरभरण झाले तर कल्पना सुचणार आणि मग धोरण-योजनांची अंमलबजावणी होणार. तशात सध्या करोनामुळे जास्तच चिंतन करावे लागते. त्यामुळे बैठकांचा झपाटा वाढला. अल्पोपाहारही वाढला. म्हटले आहे ना आधी पोटोबा मग विठोबा. या सर्व घाईगडबडीत चहा-अल्पोपाहाराचे पैसे द्यायचे राहिले तर जणू काही जगच बुडाले अशी हाकाटी सुरू झाली. वरच्या खिशातून खालच्या खिशात असा साधा व्यवहार असताना, आधी उपाहारगृहाची उधारी चुकती करा नाही तर चहा-नाश्ता मिळणार नाही, असा फतवा सामान्य प्रशासन विभागाने काढला. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री. ते असतात वर्षां किंवा सह्य़ाद्रीवर. त्यामुळे आपल्या फतव्याचा त्रास आपल्या साहेबांच्या बैठकांमधील अल्पोपाहार व्यवस्थेला आणि नंतर आपल्याला होणार नाही याची चांगली गोळाबेरीज करूनच कोणा मुरब्बी अधिकाऱ्याने हा फतवा काढला. तिकडे राज्याचे उत्पन्न कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना लक्ष्मी जिथे पाणी भरते असे म्हणतात त्या मंत्रालयातील मंत्रीदालने-सचिव दालनांतील बैठकांमध्ये उधारीवर उदरभरण सुरू आहे, हे चित्रच खास व्यंगचित्रकाराला खाद्य पुरवणारे. पण या फतव्यामुळे अर्थविभागाची मात्र चांगलीच सोय झाली. दादा मनोमन खूश झाले. बघा राज्य किती अडचणीत आहे, मंत्रालयातही उधारी सुरू झाली, असे चित्र राज्यातील जनतेसमोर गेले म्हणजे उगाच निधीसाठीची तीन पक्षांतील मारामारी थोडी तरी कमी करता येईल, असा हिशेब त्यांनी मनाशी केला. कोणी अमक्यासाठी पैसे द्या, तमक्या योजनेला निधी द्या असे म्हणण्याचा अवकाश.. अरे बाबा, आमच्या चहा-नाश्त्याला पैसे नाहीत, मंत्री-सचिव कार्यालय उधारीवर चाललेय आणि तुम्हाला कुठले पैसे द्यायचे.. असे खास ठेवणीतल्या सुरात दरडावल्यावर कोणाची हिंमत पुन्हा निधी मागायची! बुडत्याला काडीचा तसा हा उधारीचा आधार मस्तच, हा विचार मनात येऊन दादा मिशीतल्या मिशीत हसले.