नावात काय असते?

विद्यापीठ ही शिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था. कुलगुरू हे त्या संस्थेचे प्रमुख.

विद्यापीठ ही शिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था. कुलगुरू हे त्या संस्थेचे प्रमुख. अर्थातच त्यांचा शिक्षणाशी संबंध असणे एवढी माफक आणि किमान अपेक्षा असण्यात गर ते काय! एकेकाळी गल्लोगल्ली धान्य दळून देणाऱ्या पिठाच्या गिरण्या असत. गेल्या २५ वर्षांत त्यांची जागा विद्यापीठ असे नाव धारण करणाऱ्या संस्थांनी घेतली आहे. नाही तरी पीठ दळून देणे काय आणि विद्यार्थ्यांच्या पदव्या छापणे काय, एकच! एका खोलीत सुरू होणाऱ्या अशा अनेक संस्थांची देशात काही कमी नाही. नाही म्हणायला अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशाच संस्था खऱ्या अर्थाने विद्यापीठे झाली. पण अलिगढमधल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठाची अवस्था जगावेगळीच. या विद्यापीठाला पोस्टाचा पत्ता नाही आणि त्याचे कुलगुरू श्यामसुंदर शर्मा हे औषधी चूर्ण विकण्याचा व्यवसाय करतात. अस्तित्वातच नसलेल्या या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान मंडळाने रद्दबातल ठरवले असले तरीही अशा शिक्षणसंस्थांची सगळीच दुकाने काही बंद होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात अशा अनेक संस्था आपल्या नावातच विद्यापीठ या शब्दाचा समावेश करून टाकत असल्याची भरपूर उदाहरणे आहेत. कुलगुरू या पदावरील व्यक्तीने नेमके काय करू नये, याचीही उदाहरणे काही कमी नाहीत. विद्यापीठ ही आपली खासगी मालमत्ता आहे, असे समजून तहहयात कुलगुरुपद मिरवण्याची हौस असणारे महाभाग याच महाराष्ट्रात सुखेनव कार्यरत असल्याचे दिसते. याच राज्यात एका नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरूंची शैक्षणिक पात्रताच संशयास्पद ठरल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. विद्यापीठीय राजकारणात डी.लिट. मिळवणाऱ्या काही कुलगुरूंना तर राजकीय पक्षांची जवळीक अधिक हवीहवीशी आणि भविष्यातील तरतुदींच्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. काहींना निवृत्तीनंतर काही मिळवायचे असते, तर काहींची थेट राजकारणातच उडी मारण्याची तयारी असते. शिक्षण सोडून बाकी सगळे करणारे असे कुलगुरू देशभरात अनेक ठिकाणी सापडतात. त्यांना या क्षेत्रात कोणी आणले आणि कुलगुरू कोणी केले, असले प्रश्न मूर्खपणाचे वाटावेत, असा सावळागोंधळ अलिगढमधल्या फसव्या मुक्त विद्यापीठाच्या रूपाने पुढे येऊ लागला आहे. नव्वदमध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठातील शिक्षण फक्त इयत्ता पाचवीपर्यंत होते. त्या काळी या शर्मा नावाच्या कुलगुरूस पोलिसांनी अटकही केली होती. मथुरेतल्या गुरुकुल विश्वविद्यालय या संस्थेत तर बारावीपर्यंतचेच शिक्षण दिले जाते. तरीही या संस्थेच्या प्रमुखास कुलगुरू असेच म्हणण्याची प्रथा होती. नावात काय असते, या प्रश्नाचे इतके सार्थ उत्तर फक्त शिक्षणक्षेत्रातच मिळू शकते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Netaji subhas open university

ताज्या बातम्या