गेल्या कित्येक दिवाळ्या अशाच गेल्या. दिव्यांविना. तो लखलखाट. तो झगमगाट. त्या दिव्यांनी येणारा थाट. सारे सारे नुरले होते. नुसते पद असून काय उपयोग? पदाची गंमत असते ते मिरविण्यात. अन्यथा ते बिनझुलीच्या नंदीबैलासारखेच. झूल नसेल तर बैल आणि नंदीबैल सारखाच. तेव्हा दिवे हवेच. लाल दिवे, निळे दिवे, अंबर दिवे, काही स्थिर, काही फिरते दिवे. लोकसेवक, अधिकारी, पदाधिकारी या लोकशाहीतील सूर्याकरिता दिवे हवेतच. पण संसदेवर हल्ला झाला नि सारेच दीप मंदावले. मंदावले नव्हे, विझलेच. सर्वोच्च न्यायालयाने र्निबधच घातले त्यांवर. दहशतवादी हल्ल्यात त्या दहशतवाद्यांनी लाल दिव्याची गाडी वापरली म्हणून सर्वाच्याच दिवे लावण्यावर र्निबध लावायचे? निदान महापौरांना तरी वगळायचे त्यातून. प्रथम नागरिक असतो तो शहराचा. समस्त शहरवासीयांचे भूषण, आदर्श. आता काय आब नि रुबाब राहणार त्या पदाचा, त्या अधिकाराचा? गेली कित्येक वर्षे ही काळोखी वेदना मनात घेऊनच वावरत होती समस्त जनता. अखेर तिलाही भावना असतेच ना. तिलाही वाटत असतेच ना, की सारेच असतात समान, परंतु काही जण असतात समानातलेही समान. तेच असतात जनतेचे पोशिंदे. त्यांच्यामुळेच चालत असतो राष्ट्रगाडा. त्यांच्यामुळेच उजळत असतात अवघी गगने. त्यांनी बिनदिव्याच्या गाडीतून फिरावे तुच्छ करदात्याप्रमाणे? परंतु सर्व जनता जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण शिद्दतीने इच्छिते, तेव्हा सर्व कायनात ती पूर्ण करण्याची कोशीश करते असा इतिहासच आहे. या वेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. जनतेची मनोकामना पूर्ण झाली. दिवे लावण्याचे हे काम करण्यासाठी खुद्द दिवाकरच पुढे आले. राज्याचे परिवहनमंत्री ते. त्यांनी ऐन दीपोत्सवाच्या तोंडावर जनतेस ही खूशखबर दिली. ती ऐकून अनेकांच्या मनात लक्षलक्ष दिवे लागले. चिनी नव्हे, शुद्ध देशी. काहींना तर यातून बोनस मिळाल्याचाच आनंद झाला. स्वाभाविकच होते ते. शासनाचे सचिव, पोलीस महासंचालक, पालिका आयुक्त वगैरे अधिकाऱ्यांना फिरते दिवे लाभलेच. पण जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचीही त्यात वर्णी लागली. महापौरांना तर पुन्हा लाल दिवा लाभला. तो फिरता नाही. फिरता दिवा आणि त्याबरोबर वाँव वाँव असा ध्वनी असे समीकरण जुळून आले असते तर महापौरांच्या पदाचा उजेड अधिक पडला असता. परंतु जनतेला ते पाहण्याचे सुख कोठून मिळणार? तूर्तास त्यांनी लोकशाहीस ललामभूत असलेली व्हीआयपी संस्कृतीची एक खूण पुन्हा उजळली यातच समाधान मानावे. आता काही नतद्रष्टांस हा उगवत्या दिवाकरांचा दीपोत्सव नाही पाहवत. ते विचारू लागले आहेत, गाडीच्या टपावर दिवे लागले रे म्हणून काय झाले? तमाच्या तळाशी दिवे लागले का ते आधी सांगा! हेच लोक उद्या आपल्या समानांहून समान लोकसेवकांना तुम्ही काय दिवे लावले असा प्रश्नही विचारतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.