गतवर्षीच्या कॉमिक्स मालिकेमध्ये डॉक्टर ऑक्टोपसमुळे गतप्राण अवस्थेत लोटलेला स्पायडरमॅन लवकरच कॉमिक्स मालिकेत जिवंत होणार असून, आपल्या धडाडीच्या कामगिऱ्या पार पाडण्यासाठी चित्र-शब्दांच्या नवकल्पनांचा आधार घेणार आहे. अमेरिकेला आपल्यासारखी मिथकांची श्रीमंती नाही. पण या मिथकांची गरज अमेरिकेने कॉमिक्स, चित्रपट आणि गेम्समधील सुपरहीरोंतून नुसती भागविलीच नाही, तर सुपरहीरो संकल्पनांना जगण्याचा महत्त्वाचा भाग बनविले. अशा आद्य सुपरहीरोंपैकी एक म्हणजे स्पायडरमॅन ऊर्फ पीटर पार्कर. चुलत्यांकडे राहणारा अनाथ पीटर एका कोळियाच्या दंशाने अचाट शक्तीसंपृक्त होतो आणि भोवती घडणाऱ्या घटना त्याला परमोच्च शक्तीने येणाऱ्या जबाबदारीचे भान देतात, हे कथानक १९६२च्या पहिल्या मालिकेत होते. स्पायडरमॅन चित्रमालिकेच्या स्टॅन ली या जनकाला त्याकडून फार मोठय़ा अपेक्षा नव्हत्या. बकी अॅण्ड रॉबिन, कॅप्टन अमेरिका या सुपरहीरोंच्या आणि डीसी कॉमिक्सच्या खलनायकी अतिमानवांच्या तुलनेत लाजाळू, नकारात्मक भावना, एकलकोंडेपणा आणि असमर्थता यांची लागण असलेला पीटर पार्कर लोकप्रिय होण्याची शक्यताही कणभर नव्हती. पण नेमका १९६०च्या दशकात समृद्धतेसोबत अतिव्यक्तिवाद, कुटुंबविघटन यांच्या कचाटय़ात अडकलेल्या नवपिढीने पार्करला आपला केला. तो टीव्ही मालिकांचा आधार घेऊन नुसता विस्तारतच राहिला. पुढे कैक सुपरहीरो तयार झाले आणि अल्पकाळाची मौज करून पडद्या किंवा कॉमिक्सआड गेले. स्पायडरमॅन मात्र याला अपवाद ठरला याचे प्रमुख कारण अमेरिकी समाजमनाची नस या सुपरहीरोला उभा करणाऱ्यांना परिचित झाली आहे. अमेरिकी समाजावर येणाऱ्या समस्यांचे, अडचणींचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रूप या सुपरहीरोच्या मालिकांतून पाहायला मिळाले. संकटांवर उतारा शोधण्याचे कसब स्पायडरमॅनने त्याच्या चाहत्यांना दाखवून दिले. टीव्हीचे जागतिकीकरण झाल्यानंतर त्याच्या मालिका सर्वच देशांतील आबालवृद्धांची गरज भागविणाऱ्या बनल्या. आज हॉलीवूडची व्यावसायिक स्टुडियो यंत्रणा आणि तिला समांतर असलेली इंडिपेंडण्ट दिग्दर्शकांची चुळबुळ सुपरहीरो संकल्पनांना अधिकाधिक उपयोजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. किक अॅस मालिका, डिफेण्डोरसारख्या छोटय़ा चित्रपटांच्या मोठय़ा यशाने पारंपरिक लोकप्रिय सुपरहीरो अस्तंगत होण्याच्या भीतीकाळातही स्पायडरमॅनचे जीर्णोद्धारी अवतारात प्रगटणे थांबलेले नाही. या वर्षीचा एप्रिल-मेचा सुटीकाळ नव्या कॉमिक्स मालिकेच्या आणि त्यानंतर लगेचच दाखल होणाऱ्या ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या मोहिनीने व्यापलेला असेल, हे भाकीत कुणी (सुपरहीरोही) बदलू शकणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
स्पायडरमॅन
गतवर्षीच्या कॉमिक्स मालिकेमध्ये डॉक्टर ऑक्टोपसमुळे गतप्राण अवस्थेत लोटलेला स्पायडरमॅन लवकरच कॉमिक्स मालिकेत जिवंत होणार असून,

First published on: 14-01-2014 at 05:50 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh spiderman