मराठीच्या विविध प्रादेशिक बोली आहेत. साठोत्तरी साहित्यात जेव्हा दलित आणि ग्रामीण प्रवाह समाविष्ट होऊ लागले, तेव्हापासून साहजिकच लेखनातही बोलींचा वापर होऊ लागला. त्याची ही काही उदाहरणे आहेत. ‘रिठावर दिवा न लावणे’ या वाक्प्रचारातील ‘रीठ’ म्हणजे ‘ओसाड जागा’ आणि ‘रिठावर दिवा न लावणे’ म्हणजे ‘नि:संतान होणे, घर पडून तेथे रीठ होणे’ म्हणजेच सत्यानाश होणे. उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीत संवादासाठी वऱ्हाडी बोली वापरली आहे. त्यातील कौतिक ही निरक्षर स्त्री संसारासाठी जिद्दीने संघर्ष करत असते. तिला फसवणाऱ्या सावकाराच्या जावयाला ती एकदा म्हणते, ‘तुझ्याई रिठावर दिवा लावाले मानूस नाई राओ!’ तिच्या मनातला राग आणि दु:ख हा भावोद्रेक जणू एखाद्या शापवाणीसारखा या वाक्प्रचारातून व्यक्त झाला आहे.

‘जीव धुकुडपुकुड करणे’ म्हणजे घाबरणे, काळजी वाटणे. प्र. ई. सोनकांबळे ‘आठवणींचे पक्षी’ या पुस्तकात मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळची स्वत:ची अवस्था सांगतात, ती अशी : ‘मनात सारखं धुकुडपुकुड चालू होतं की नापास  झालो तर लोक काय म्हणतील!’ –  येथे त्या वयातील मानसिक ताण  वाक्प्रचारातून व्यक्त होतानाच उलटसुलट विचारांची लयही पकडली जाते!

‘भारूड लावणे’ म्हणजे लांबलचक, कंटाळवाणी गोष्ट सांगणे. उत्तम बंडू तुपे यांचे ‘काटय़ावरची पोटं’ हे  आत्मकथन आहे. त्यात सतत उपदेश करणाऱ्या आईच्या बोलण्याचा कधी तरी येणारा कंटाळा व्यक्त करताना ते लिहितात : ‘वाटायचं, काय हे भारूड लावलंय!’ या वाक्प्रचारातून लेखकाच्या भावस्थितीचे दर्शन प्रांजळपणे झाले आहे.

‘जीव टांगणीला लागणे’, म्हणजे  हुरहुर लागणे. रा. रं. बोराडे यांच्या ‘धुणं’ या ग्रामीण कथेतला एक प्रसंग!  बायकांच्या गप्पा चालू असताना त्यातल्या एकीची कथनशैली दुसरीने या वाक्प्रचारातून कशी मार्मिकपणे वर्णन केली आहे; पाहा : ‘लोकांचा जीव अदोगर टांगून टाकील, आन मग कापसातनं सरकी काढीत बसल्यावानी सारं सांगत बसेल!’ 

असे हे वाक्प्रचार लेखन प्रवाही तर ठेवतातच, शिवाय अर्थवाहीसुद्धा करतात.

– डॉ. नीलिमा गुंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nmgundi@gmail.com