चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात गस्त घातल्यानंतर या दोन देशांमधील पारंपरिक तणावाने टोक गाठले आहे. तैवानवर ताबा मिळवण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे, तर चीनपुढे झुकणार नाही, असा निर्धार तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी लष्कराच्या तुकडय़ाही तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. पूर्व आशियातील या घडामोडींची दखल घेताना वृत्तपत्रांनी चिंता व्यक्त केली आहे.

तैवानच्या हवाई क्षेत्रावरील चीनचे आक्रमण ही अमेरिकेच्या युद्धखेळांची आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांची परिणती असल्याची टीका ‘ब्रुकिंग्ज इन्स्टिटय़ूशन’मधील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक विल्यम गॅलस्टन यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये केली आहे. चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आलेख घसरल्यामुळे अशा लष्करी विजयातून चीनला काही मिळवण्यापेक्षा गमावण्यासारखेच अधिक आहे, असा युक्तिवाद केला जाऊ  शकतो, पण चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना, त्यांनी फैलावलेल्या राष्ट्रवादाच्या प्रवाहापासून मागे फिरणे कठीण होईल. त्यामुळे तैवानचे संरक्षण करण्यास सक्षम असलेली अमेरिका ही क्षय होत जाणारी लष्करी शक्ती नाही, हे अध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना पटवून देणे आवश्यक आहे, असा सल्लाही गॅलस्टन यांनी दिला आहे.

तैवानमध्ये अमेरिकी लष्कराच्या प्रशिक्षण कवायती सुरू आहेत. त्या अनुषंगाने अमेरिकेचे निवृत्त नौदल अधिकारी जेम्स स्टॅव्हरीडीस यांनी ‘ब्लुमबर्ग’मधील लेखात, अमेरिका तैवानला सुरक्षिततेची हमी देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे म्हटले आहे. अध्यक्ष बायडेन यांनी एक चीन धोरण पाळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्याबरोबरच स्टॅव्हरीडीस असेही सुचवतात की चीनला जोखमीची जाणीव करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठका आणि भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या प्रादेशिक सहकाऱ्यांच्या संकल्पांना बळकटी देणे आवश्यक आहे.

आमची इच्छाशक्ती, क्षमता आणि दृढनिश्चयाला कमी लेखू नये, असा इशारा जिनपिंग यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर युद्धात चीन तैवानला पराभूत करू शकेल की तोच नमते घेईल, असा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘द जेरुसलेम पोस्ट’मधील लेखात अमोझ असा-एल यांनी केला आहे. युद्धात प्रेरणा हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे चीनने तैवानवर युद्ध लादलेच तर चिनी सैन्य जिनपिंग यांचे ध्येय साध्य करण्यासाठी बलिदानास तयार होईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तैवानी मात्र त्यांची घरे, कुटुंबे, संस्कृतीसाठी लढतील, असेही या लेखात म्हटले आहे. छोटय़ा राष्ट्रांनी मोठय़ा लष्करी शक्तींना कसे नमवले याचे, अमेरिका-व्हिएतनाम, ब्रिटन-दक्षिण आफ्रिका, सोव्हिएट युनियन-अफगाणिस्तान आदी दाखलेही या लेखात दिले आहेत.

 चीनशी तैवानचे शांततापूर्ण एकीकरण घडवणे हा जिनपिंग यांच्या ‘चायना ड्रीम’चा एक भाग असला तरी ते वेगाने घडणे अशक्य असल्याचे पाकिस्तानच्या ‘डॉन’मधील लेखात माहिर अली यांनी स्पष्ट केले आहे. जिनपिंग तैवानला चीनशी जोडणे किती आवश्यक समजतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. परंतु आता अमेरिकी सैन्य तैवानमध्ये आहे आणि अमेरिकेची तटरक्षक जहाजे तैवानच्या सामुद्रधुनीवरून जात आहेत, या पार्श्वभूमीवर या लेखात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे अधिकारी ‘‘आम्ही बेटावरील सर्वाचा नाश करू’’ अशी धमकी अधूनमधून देतात. ‘तैपेई टाइम्स’ने चीनच्या या गुर्मीचा समाचार घेणारा, दोन्ही देशांची लष्करी ताकद आणि त्यांच्या मर्यादांचे विश्लेषण करणारा पीटर चेन या लष्करी तज्ज्ञाचा लेख प्रसिद्ध केला आहे. युद्धासाठी द्वेषमूलक वक्तव्यांपेक्षा अधिक अत्याधुनिक योजना आवश्यक असतात. तैवान कोणत्याही लष्करी आक्रमणासाठी सदैव सज्ज असतो, असे निरीक्षण त्यांनी या लेखात नोंदवले आहे. अन्य मार्ग बंद झाले आणि लष्करी कारवाईची वेळ आली तर अण्वस्त्रांच्या वापराद्वारे चीन आपले कमीत कमी सैनिक गमावून वेगाने तैवानवर ताबा मिळवेल, परंतु हत्याकांड घडवून तैवानी नागरिकांशिवाय एकीकरणाला अर्थ उरणार नाही, अशी टिप्पणीही येथे केली आहे.

तैवानशी अमेरिकेच्या तथाकथित घट्ट बांधिलकीला लोह-इच्छेने तोडण्याचा चीनचा निर्धार आहे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने संपादकीय लेखात दिला आहे. तैवान प्रश्नावर शांततापूर्ण तोडग्याचा प्रयत्न चीन सोडणार नाही, परंतु ‘दोन चीन’ किंवा ‘एक चीन आणि एक तैवान’ याऐवजी एकीकरणाचा शांततापूर्ण शेवट होणे आवश्यक आहे. ज्यांनी चीनचे विभाजन केले त्यांना कधीही त्यांच्या ध्येयासाठी शांततापूर्ण मार्ग सापडणार नाही, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.      

संकलन : सिद्धार्थ ताराबाई