तंत्रज्ञानाची जोड मिळाली व जमीनधारणा पुरेशी असली, तर शेती लाभदायक ठरू शकते. विशेषकरून जनुक संस्कारित तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या पिकांनी ही नवी क्रांती घडवून आणली. या तंत्रज्ञानात भारतामध्ये संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. गुरिंदरजित रंधावा. त्या सध्या राष्ट्रीय जनुकीय पीक संसाधन विभागात (दिल्ली) विभागप्रमुख आहेत. त्यांना यंदा आयसीएआरचा ‘पंजाबराव देशमुख उत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गुरिंदरजित या चार बहिणींपैकी मोठय़ा. कपुरथळा जिल्ह्यात, बियास नदीकाठी त्यांचे बालपण गेले. मुलींच्या सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी लुधियानाच्या पंजाब कृषी विद्यापीठातून एमएस्सी केले. चंडीगड येथून त्यांनी एम. फिल. पदवी घेतली. ब्रिटनमधील रेणवीय जनुकशास्त्र विभागाच्या त्या राष्ट्रकुल फेलो आहेत. रंधावा यांनी ३५ वर्षांत आदर्शवत संशोधन केले असून त्यांचे किमान ८० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांना भारत सरकारने तीन पेटंट मंजूर केली आहेत. शेती असो की उद्योग; किफायतशीर तंत्रज्ञान हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. कारण शेवटी खर्चाचा संबंध प्रत्येक बाबतीत महत्त्वाचा ठरतो. रंधावा यांनी जनुकीय तंत्रज्ञानाची किफायत वाढवणारे प्रयोग यशस्वी केले असून त्यात जीएमओ स्क्रीनिंग मॅट्रिक्सचा समावेश आहे. जनुकीय पिके, जनुकीय साधने या क्षेत्रात काम करतानाच त्यांनी पिकांच्या रोगनिदानाचे तंत्रही विकसित केले आहे. डीएनए आधारित १५ पिकांसाठी रोगनिदान प्रणाली विकसित करण्यात त्यांना यश मिळाले असून हे तंत्रज्ञान त्यांनी व्यावसायिकरीत्या उपलब्ध करून दिल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांनी सातत्याने केलेले संशोधन हे कृषी क्षेत्रात मोलाची भर टाकणारे ठरले. देशपातळीवर जीएमओ प्रयोगशाळा उभारण्यातही त्यांनी मोठा वाटा उचलला. एकूण ३२ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना अलीकडे जो पुरस्कार मिळाला तो त्यांच्या संशोधनातील दूरदृष्टीसाठी आहे. त्यांच्या या पुरस्काराने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेल्या कामाला दाद मिळाली आहे यात शंका नाही. जनुकीय पिके सुरक्षित आहेत व बीटी वांग्याचे व्यावसायिकीकरण करायला हरकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.