बी. जे. अर्थात भिकाजीराव जिजाबा खताळ-पाटील यांच्या निधनाने जुन्या पिढीतील काँग्रेसी-विचारांचा खंदा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला. शंभरी पार केलेले खताळ-पाटील हे शेवटपर्यंत सक्रिय होते. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आणि पुढे आठ वर्षांत सात पुस्तके लिहिली. नगर जिल्ह्य़ाच्या राजकारणावर सुरुवातीच्या काळात डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचा पगडा होता. तर सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील, बी. जे. खताळ-पाटील हे काँग्रेसचा पगडा असलेले नेते होते. त्यात नामवंत वकील म्हणून खताळ यांचा नावलौकिक होता. १९५२ च्या सुमारास न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु संगमनेर या मूळ गावातून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी सूचना काँग्रेस पक्षाने केल्याने त्यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीला सामोरे गेले. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागली होती. खताळ-पाटीलही चळवळीच्या बाजूने होते. परंतु काँग्रेस त्यास अनुकूल नव्हती. परिणामी १९५७ सालची विधानसभेची निवडणूक लढविण्याचे त्यांनी टाळले होते. निवडून येण्याची खात्री असतानाही केवळ आपल्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिले. अखेर १९६२ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आणि नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. आणीबाणीनंतरचा १९७८ सालचा अपवाद वगळता, १९६२ ते १९८५ पर्यंत ते आमदार होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या सरकारपासून ते पुढे अनेक वर्षे त्यांनी मंत्रिपद भूषविले. मंत्रिपदी असताना त्यांनी फायलींवर लिहिलेल्या अभ्यासपूर्ण शेऱ्यांची चर्चा होत असे. पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन, विधि आणि न्याय अशी खाती त्यांनी भूषविली. त्यांच्या कार्यकाळात दूधगंगा, वेदगंगा, चांदोली, धोम, चासकमान, अप्पर वर्धा, विष्णुपुरी अशा विविध धरणांची कामे मार्गी लागली. अलीकडे नेत्यांना खुर्चीचा मोह आवरत नाही, कितीही वय झाले तरीही सत्तेची ऊब हवी असते. खताळ-पाटील यांनी १९८० च्या निवडणुकीत ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असल्याचे जाहीर केले आणि त्याप्रमाणे वयाच्या ६५ व्या वर्षी- १९८५ मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करली. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी व्यायाम, चिंतन, विपश्यना, योगासने यांवर भर दिला होता. आपल्या तत्त्वांशी अखेपर्यंत ते प्रामाणिक राहिले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2019 रोजी प्रकाशित
बी. जे. खताळ-पाटील
वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आणि पुढे आठ वर्षांत सात पुस्तके लिहिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-09-2019 at 00:08 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B j khatal patil profile abn