विज्ञानात अनेक वेळा असे घडते की, एखादी गोष्ट शोधून अगदी शंभर वर्षे उलटतात, पण त्याचा उपयोग नेमका कळत नसतो. असाच एक शोध १९३४ मध्ये कार्ल मेयर यांनी लावला, तो पदार्थ होता हायल्युरोनिक आम्ल (अॅसिड). त्यांनी या रासायनिक पदार्थाचे काही उपयोग शोधले, पण त्यात महत्त्वाची भर ज्यांनी घातली त्यांचे नाव आंद्रे ए. बॅलझ. या आम्लाचा उपयोग गुडघ्याच्या संधिवातावर होतो असे त्यांनी सांगितले. बॅलझ यांचे नुकतेच निधन झाले, पण संधिवात रुग्णांना त्यांचे स्मरण कायम राहील.
आंद्रे अॅलेक्झांडर बॅलझ यांचा जन्म हंगेरीत बुडापेस्ट येथे १० जानेवारी १९२० रोजी झाला. बुडापेस्ट विद्यापीठातून त्यांनी १९४२ मध्ये पदवी घेतली व नंतर १९५१ पर्यंत स्टॉकहोमच्या कॅरोलिन्स्का संस्थेत संशोधन केले. रेटिना फाऊंडेशनच्या स्थापनेसाठी त्यांना हार्वर्ड मेडिकल स्कूलने बोलावले होते. बोस्टन जैववैद्यक संशोधन संस्थेचे ते संस्थापक होते. कोलंबियात विद्यापीठातील अध्यापन त्यांनी १९८७ मध्ये थांबवले. त्यांनी ‘मॅट्रिक्स बायोलॉजी’ ही संस्था स्थापन केली होती. अमेरिकेतील न्यूजर्सी येथे सुसज्ज प्रयोगशाळेत त्यांची संशोधन कारकीर्द घडली. बॅलझ यांच्या संशोधनानुसार कोंबडय़ाचा जो लफ्फेदार तुरा असतो त्यात एक वंगणासारखा द्रवपदार्थ असतो, त्याचा वापर त्यांनी गुडघ्याच्या संधिवातासाठी केला होता. त्याचा वापर त्या काळात डोळ्याच्या शस्त्रक्रियेत त्वचेचे संरक्षण करण्यासाठीही केला जात होता. वैद्यकीय उपयोग शोधण्यास त्यांनी सत्तर वर्षे संशोधन केले होते. हायल्युरोनिक आम्ल गाईच्या डोळ्यातून मिळवावे लागते, त्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर शक्य नव्हता. बॅलझ यांनी हे आम्ल कोंबडय़ाच्या तुऱ्यातून मिळवले व जिथे कोंबडे मारले जातात त्या कत्तलखान्यातून त्यांचे तुरे जमा करून त्यांनी हे आम्ल शुद्ध स्वरूपात मिळवले. १९६०च्या सुमारास त्यांनी असा शोध लावला की, संधिवातावर या आम्लाचा वापर केला तर दुखणे बरे होते. संधिवात झालेल्या घोडय़ांच्या पायात हे आम्ल टोचण्यात आले त्यात त्यांना ही बाब प्रथम कळली. हायल्युरोनिक आम्ल म्हणजेच हायल्युरोनन किंवा हिलॉनचे त्यांनी पेटंट घेतले. १९७०च्या सुमारास हे औषध मग माणसांसाठी वापरणे सुरू झाले. पूर्वी डोळ्याची शस्त्रक्रिया करताना डोळ्याचा आकार विशिष्ट प्रमाणात राखताना हे औषध भिंगारोपण व मोतिबिंदू शस्त्रक्रियेत वापरले जात होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
आंद्रे अॅलेक्झांडर बॅलझ
विज्ञानात अनेक वेळा असे घडते की, एखादी गोष्ट शोधून अगदी शंभर वर्षे उलटतात
Written by रत्नाकर पवार

First published on: 05-09-2015 at 04:30 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Endre a balazs profile