शेतकऱ्यांच्या हक्कासाठी १९८०च्या दशकात रस्त्यावरची आंदोलने करून सरकारला हादरून सोडणारे, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र देणारे शरद जोशी यांना शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे पंचप्राण असे संबोधत. पण त्याच संघटनेत आई किंवा माउली म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाई, असे माजी             अध्यक्ष भास्करराव ऊर्फ भास्करभाऊ शंकरराव बोरावके यांचे नुकतेच वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीतील एक दुवा गेला. सहकाराच्या बालेकिल्ल्यात राहूनही           सभ्य, मितभाषी, प्रेमळ, संवेदनशील, संयमी भास्करभाऊंना राजकारणाची अन् सौदेबाजीची बाधा झालीच नाही. त्यामुळेच भाऊंच्या निधनाने चळवळीचे मोठे नुकसान तर झालेच पण कार्यकर्त्यांचा एक आधारवड हरपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरावके यांचे घराणे मूळचे पुणे जिल्ह्य़ातील सासवडचे. ब्रिटिशांनी गंगापूर व दारणा धरण बांधल्यावर ते नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव तालुक्यात आले. या कुटुंबाकडे ७०० एकर जमीन होती. सहकारी सोसायटी स्थापन करून एकत्रित कुटुंबातील शेतीचा कारभार चालविला जात होता. आधुनिक पद्धतीची शेती करण्यात त्यांचा नावलौकिक होता. मोसंबी, पेरू, डाळिंब अशा बागा त्यांच्याकडे होत्या. माजी पंतप्रधान पंडित नेहरू, मोरारजी देसाई आदींनी त्यांच्या शेतीला भेटी दिल्या. अशा संपन्न कुटुंबात जन्मलेले भाऊ, समाजवादी नेते गंगाधरमामा गवारे यांच्यामुळे सेवादलात लहानपणी आले. त्या संस्कारात व मुशीत ते वाढले. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, भाई वैद्य, सारे पाटील, मधु दंडवते, किशोर पवार यांच्यापासून सर्व समाजवादी नेत्यांशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या शंकरबागेत सेवा दलाच्या अनेक बठका झाल्या. सेवा दलाच्या विश्वस्त मंडळावर त्यांनी अनेक वर्षे काम केले. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगावला ते राहत. पण सहकाराच्या गोडीची नशा त्यांनी डोक्यात भिनू दिली नाही.

शेती पदवीधर असलेल्या भाऊंना शेतकऱ्यांची दैना जवळून अनुभवायला मिळाली. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची कोपरगावला १९८० मध्ये त्यांनी सभा ऐकली अन् पुढे त्यांनी संघटनेच्या कामात झोकून दिले. जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. नगर जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांशी त्यांनी नाते जोडले. कोपरगावला झालेल्या ऊस आंदोलनात त्यांना पहिली अटक झाली. त्यानंतर ते चंदिगड, निपाणीच्या आंदोलनातही सक्रिय होते. खऱ्या अर्थाने ते जोशी यांचे आधार होते. संघटनेला त्यांनी पूर्ण वेळ दिला. पदरमोड केली. त्यांच्याच गाडीतून राज्यभर शरद जोशी फिरले. त्यांच्या शंकरबागेत संघटनेच्या बठका होत. माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड, रामचंद्रबापू पाटील, रवी काशिकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह भाऊंना संघटनेत स्थान होते. त्यांचा नतिक प्रभाव नेहमी संघटनेत राहिला. पद, प्रतिष्ठा, सत्ता असे काहीच मिळवायचे नसल्याने भाऊ कार्यकर्त्यांसाठी आधार होते. जोशींना काही सांगता येण्यासारखे नसले, तर भाऊंकडे कार्यकत्रे रडगाणे गात. कार्यकर्त्यांना आईचे प्रेम दिल्याने त्यांना ‘माउली’ हे संबोधन मिळाले. जोशीही त्यांना कधी कधी तशीच हाक मारत. पण माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची काळजी भाऊ घेतील असे त्यांनी सांगितले होते. म्हणूनच जोशींनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात कन्यादान भाऊंना करायला लावले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हे नाते जपले. संघटनेच्या पलीकडे नेत्यांशी असलेले कौटुंबिक नाते त्या निमित्ताने बघायला मिळाले.

शरद जोशींनी खुल्या आर्थिक धोरणाचा पुरस्कार करताना कार्यकर्त्यांना आधी तयार केले. समाजवादी विचारसरणीच्या भाऊंनीही हा विचार स्वीकारला. राजकारण हा पिंड नसताना केवळ नेत्याच्या आदेशामुळे स्वतंत्र भारत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. ते चळवळीत झालेल्या चुका खुल्या मनाने मान्य करत. त्यात दुरुस्तीही करीत. सेवादलाशी असलेले नाते त्यांनी तोडले नाही. म्हणूनच शेतकरी संघटनेच्या अनेक संघटना झाल्या. तरीदेखील भाऊंकडे अखेपर्यंत आईच्या नात्यानेच पाहिले            गेले.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh bhaskarrao boravake
First published on: 20-10-2017 at 02:38 IST