स्वत:चा मुलगा गौतम मतिमंद असल्याचे समजल्यावर पेशाने शिक्षिका असणाऱ्या रजनीताई लिमये अक्षरश: हादरल्या. त्यातून कसेबसे सावरत वास्तव स्वीकारत त्या झपाटून कामाला लागल्या. विशेष मुलांची गरज लक्षात घेऊन ४० वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात अशा मुलांसाठी पहिली शाळा अर्थात प्रबोधिनी विद्या मंदिर सुरू केले. नाशिक शहरात चार मुलांना घेऊन भाडेतत्त्वावरील लहानशा जागेत सुरू झालेल्या प्रबोधिनीच्या कार्याचा विस्तार आज मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी तीन शाळा तसेच १८ वर्षांनंतर शालेय वयोगट संपुष्टात आल्यावर प्रौढ व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळादेखील सुरू करण्यात आली आहे. मानसिक अपंग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रामार्फत त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पदविका अभ्यासक्रमही संस्थेने सुरू केला.

खरे तर मतिमंद मुले जितक्या लवकर शाळेत येतील, तितके त्यांच्या फायद्याचे असते. त्यांना चांगले वळण लावणे आणि वर्तन समस्या कमी करणे या दोन्ही गोष्टी सुकर होतात; परंतु पालकांना ही बाब उमगत नाही. यामुळे अशी मुले उशिराने म्हणजे वयाने बरीच मोठी झाल्यावर विशेष शाळेकडे वळतात. शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि पालकांचा सहभाग यांची साथ मिळाल्यास मतिमंद मुलांच्या अनेक उणिवांवर मात करता येते, यावर रजनीताईंचा ठाम विश्वास होता. दैनंदिन व्यवहारात या मुलांना इतरांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या त्या गोष्टी विशेष अभ्यासक्रमात स्वावलंबन कौशल्ये म्हणून शिकविल्या जातात.  या विषयावर सातत्याने प्रबोधनात्मक लेखन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग, चर्चात्मक कार्यक्रम आदी माध्यमांतून जनजागृतीचे काम त्या अव्याहतपणे करीत राहिल्या. प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापिका असणाऱ्या रजनीताईंनी संस्थेत अध्यक्षा, कार्यवाहिका, प्रशिक्षण केंद्राच्या समन्वयक आदी पदे भूषविली.  त्यांची ‘गोडुली गाणी (बालकांची गाणी)’, ‘जागर’ अशी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हिरकणी, पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना, आदर्श शिक्षिका राष्ट्रीय, दलित मित्र, श्यामची आई आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळेने शेकडो मतिमंद प्रौढ व्यक्तींना वेगवेगळ्या वस्तुनिर्मितीत पारंगत केले. या ठिकाणी काम करण्यास शिकलेली ५० हून अधिक मुले बाहेर काम करून अर्थार्जन करीत आहेत. त्यांच्या निधनाने विशेष मुलांना स्वावलंबी बनवणारा आधारवड कोसळला आहे.