गिर्यारोहणात माणसाच्या शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी लागते. पण या साहसी खेळाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी त्याहीपलीकडे जाऊन एक दूरदृष्टी ठेवून उपक्रमांची आखणी करणारे नेतृत्व गरजेचे असते. अशा नेतृत्वामुळे त्या क्षेत्राला दिशा मिळते, तो जनमानसापर्यंत पोहोचतो. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील असे नेतृत्व म्हणजे हृषीकेश यादव.
अशा नेतृत्वाला केवळ शारीरिक-मानसिक कसोटीच्या पलीकडे जाऊन अनेक क्षमतांची गरज असते. १९७४ मध्ये हृषीकेश यादव यांची डोंगरभटकंती सुरू झाली ती पुणे युथ होस्टेलबरोबर. १९८२ साली मुंबईत आल्यावर त्यांनी यंग झिंगारो ट्रेकर्स या संस्थेची स्थापना केली आणि अनेक उपक्रमांची सुरुवात झाली, जे आजतागायत सुरू आहेत. अंध-अपंगांसाठी दर वर्षी १५ ऑगस्टचे ट्रेक आखले जाऊन लागले. त्याहीपुढे जाऊन त्यांना गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण देऊन त्यांना हिमशिखर आरोहणाचा आनंद मिळवून दिला. हृषीकेश यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे यंग झिंगारो ट्रेकर्सच्या माध्यमातून संपादित केलेले ‘सांगाती सह्य़ाद्रीचा’ आणि ‘सह्य़ाद्री कम्पॅनियन’ या पुस्तकांचे संपादन. तब्बल तीन वर्षे सह्य़ाद्रीच्या कानाकोपऱ्यात भटकून पन्नास डोंगरभटक्यांनी जमवलेली २२५ किल्ल्यांची माहिती, १०० हून अधिक सुळके आणि सह्य़ाद्रीतील लेणी, जैवविविधता यासंबंधी रंगीत छायाचित्रांनी सजलेल्या पुस्तकाची निर्मिती ही डोंगरभटक्यांबरोबरच सर्वसामान्यांसाठीदेखील फायद्याची ठरली. संस्थात्मक पातळीवर असा उपक्रम यशस्वी होऊ शकतो त्याची ही प्रचिती होती.
एव्हरेस्टवर आरोहण ही प्रत्येक गिर्यारोहकाची इच्छा असते. पण २५ वर्षांपूर्वी संस्थात्मक माध्यमातून ही मोहीम आखणे आणि यशस्वी करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे होते. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून आखलेल्या या मोहिमेचे आव्हान हृषीकेश यादव यांनी सक्षमपणे पेलले. आणि भारतातील पहिली नागरी एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करून महाराष्ट्राचे नाव देशभर केले. महाराष्ट्रातील गिर्यारोहक एकत्रित आलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणून ते गेली २० वर्षे कार्यभार सांभाळत आहेत. एव्हरेस्टनंतर हृषीकेश यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं ते युथ होस्टेल असोसिएशनवर. २००२ पासून त्यांनी युथ होस्टेल असोसिएशनच्या नॅशनल अॅडव्हेंचर कमिटीच्या अध्यक्षपदावरून १२ वर्षे अनेक नवनवीन साहसी मोहिमांची आखणी करून, त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. मनाली ते लेह ह्य़ा मार्गावरील सायकल मोहिमा सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. हृषीकेश यांनी स्वत: प्रस्तरसुळक्यांवर, हिमशिखरांवर आरोहण करून विक्रम करण्यापेक्षा संस्थेच्या माध्यमातून हा खेळ कसा वाढेल यावर बहुतांश लक्ष केंद्रित केलं आहे. अर्थातच त्यांनी गिर्यारोहणाच्या सर्वागीण प्रसार-प्रचारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल १५ व्या गिरिमित्र संमेलनात आज त्यांना ‘गिरिमित्र जीवनगौरव’ सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.