उत्तर कोरिया. चीनचे मित्रराष्ट्र आणि धाकटय़ा जॉर्ज बुश यांच्या ‘अॅक्सिस ऑफ एव्हिल’मधला सर्वात महत्त्वाचा देश. त्या देशाचा सर्वसत्ताधीश, तेथील नागरिकांचा ‘उद्धारकर्ता’ हुकूमशहा किम जाँग उन सध्या कुठे आहे, हा सध्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. ३९ दिवस झाले. तो बेपत्ता आहे. १० ऑक्टोबरला कोरियन वर्कर्स पार्टीचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. त्याच्या आदल्या दिवशी उत्तर कोरियाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम झाला. हे दोन्ही राष्ट्रीय समारंभ, पण त्यांनाही हा राष्ट्राचा नेता अनुपस्थित होता. हा किम तसा माध्यमस्नेही नेता. त्याचा पिता किम जाँग इल याला माध्यमांमधून चमकण्याची आवड नव्हती. पण किम जाँग उन याला लोकांसमोर मिरवणे, मोठमोठय़ा बाता मारणे यात रस आहे. असे असतानाही त्याने हे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम टाळले. याचे कारण काय असावे याबाबत लोकांना उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे. त्याच्या या गायब होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. उत्तर कोरियातील अधिकृत प्रसारमाध्यमांनी ‘वैयक्तिक अस्वस्थता’ असे कारण दिले आहे. याचे अनेक अर्थ निघू शकतात. या देशाच्या विदेशी अभ्यासकांच्या मते ते पायाचे दुखणे, मधुमेह येथपासून अतिधूम्रपानाने झालेला एखादा आजार असे काहीही असू शकते. अलीकडे या ३२ वर्षीय नेत्याला एका जर्मन डॉक्टरने तपासले होते. त्याला हार्मोनच्या संदर्भातील गंभीर आजार आहे. त्याचे वजन बरेच वाढले आहे. त्यावर उपचार करण्यासाठी त्याने न सांगताच ही आजारपणाची रजा घेतली आहे. निकटच्या लोकांकडून सांगण्यात येणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे किम हे सैनिकांशी खेळताना पडले व गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर ते उपचार घेत आहेत. हे तसे अगदीच साधे कारण झाले. पण उत्तर कोरियासारख्या पोलादी पडद्याआडच्या देशांत असे साधेसरळ काहीही नसते. किम याच्या गायब होण्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असे म्हणणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. किम जाँग इल यांचा डिसेंबर २०११ मध्ये मृत्यू झाला. त्याआधीच त्याने देशाची सत्ता आपल्या या तरुण सुपुत्राकडे जाईल याची व्यवस्था केली होती. त्यानुसार चीनच्या आशीर्वादाने किम जाँग उन सत्ताधीश बनला. वारसाहक्काने आलेली ही घराण्याची हुकूमशाही टिकविणे हे त्याचे पहिले लक्ष्य होते. त्यासाठी त्याने सत्तेवर आल्या आल्या अनेकांचे बळी घेतले. जुनी फळी कापून काढली. शुद्धीकरण मोहिमेच्या नावाखाली आपल्या आत्याचा नवरा यांग साँग थेक याचा बळी घेतला. एका (दंत)कथेनुसार १२० भुकेल्या कुत्र्यांना त्याच्या अंगावर सोडण्यात आले होते. पण त्याची ही शुद्धीकरण मोहीमच आता उलटली असून, किम याच्याविरोधात राजकीय बंड झाले आहे. त्याला सध्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे खरे मानले तर हे बंड कोणी केले हा प्रश्न उरतोच. बंडाला एक चेहरा असावा लागतो. नेता असावा लागतो. तसा आजमितीला तरी उत्तर कोरियात नाही. त्यामुळे षड्यंत्र सिद्धांत-कारस्थानकथा किंवा कॉन्स्पिरसी थिअरी- या पलीकडे सध्या तरी या चच्रेला महत्त्व देता येत नाही. दक्षिण कोरिया हा उत्तर कोरियाचा हाडवैरी. तेथील राज्यकर्त्यांचेही हेच मत आहे. काही अभ्यासकांच्या मते हा सगळा किम जाँग उन याची प्रतिमा जपण्याचा प्रकार आहे. उत्तर कोरियातील नागरिक हे प्रत्यक्षाऐवजी प्रतिमेवरच अधिक प्रेम करतात. त्यांना नेता हवा तो शेजारी देशाला दम वगरे देणारा. त्याची छाती भक्कम पाहिजे आणि त्याच्या मनात राष्ट्राच्या उद्धाराची भावना पाहिजे. मग बाकी त्याने काहीही केले नाही तरी चालेल. आजारी नेता समोर आला तर त्याच्या प्रतिमेचे तुकडेच पडणार. केवळ या कारणासाठी किम लोकांच्या नजरेपासून दूर राहून उपचार घेत आहे. किम याच्या गायब होण्याचा अर्थ सध्या तरी एवढाच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
गेला किम कुणीकडे?
उत्तर कोरिया. चीनचे मित्रराष्ट्र आणि धाकटय़ा जॉर्ज बुश यांच्या ‘अॅक्सिस ऑफ एव्हिल’मधला सर्वात महत्त्वाचा देश. त्या देशाचा सर्वसत्ताधीश, तेथील नागरिकांचा ‘उद्धारकर्ता’ हुकूमशहा किम जाँग उन सध्या कुठे आहे,

First published on: 14-10-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is kim jong un