दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

मिरज शहरातील तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा उत्तर-पेशवाईपासूनची. या व्यवसायात आजही येथील कुशल कारागीर आहेत; पण अनेक तरुणांना परंपरागत व्यवसाय सोडून बाहेरची वाट धरावी लागते आहे. हाही काळ सरेल, अशी उमेद आजही या व्यवसायात टिकून राहिलेल्या तरुणांकडे आहे..

मिरज आणि संगीत हे समीकरण आज देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नोंदले गेले आहे. संगीताला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून देण्याचे काम संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब, पं. विष्णू दिगंबर पलुसकर, प्रो. बी. आर. देवधर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, निळकंठ बुवा, जंगम, महादेव बुवा गोखले आदींनी केले; पण या कलाकारांची परंपरा आज मिरजेत कितपत टिकली आहे यापेक्षा या कलाकारांनी मिरजेत तयार केल्या जाणाऱ्या तंतुवाद्यांचा प्रसार देशविदेशात केला असल्याने या कारागिरीची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. बदलत्या काळात आलेल्या इलेक्ट्रानिक वाद्यांच्या झंझावातातही मिरजेतील वाद्यनिर्मितीची कला हिकमतीने पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला नव्याने होऊ घातलेली मिरजेची संगीत क्लस्टर योजना सहायभूत ठरण्याची चिन्हे असली तरी या व्यवसायात व्यावसायिकतेचा अभाव हाच मोठा अडसर ठरत आहे.

मानवी मनाला मोहून टाकणारे संगीत म्हणजे काय, असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न कोणत्याही पुस्तकी ज्ञानातून मिळणे अशक्यच आहे. कारण संगीत अनुभूतीविना निष्फळ आहे. कानावर स्वर पडला, की त्याची तार मानवाच्या अंत:करणापर्यंत भिडते.  ‘जो जो जे वांछिल ते ते लाहो प्राणीजात’ या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओवीनुसार संगीत कोणाला कसे हवे तसे मिळविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्यातील गोडी ही अभिजात हवी, ही सार्वत्रिक इच्छा असतेच.

संगीत म्हणजे काय? तर हवेचे कंपन निर्माण करून त्यातून जो स्वर बाहेर पडतो ते संगीत असते. मानवी बोलणेसुद्धा ध्वनीतून उत्पन्न केले जाते, तसेच संगीतही हवेच्या कंपनातून निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीतून बाहेर पडत असते. ही  कंपनसंख्या सेकंदाला सोळा ते आठ हजारांपर्यंत निर्माण करता येऊ शकते. या कंपनामध्ये निर्माण केला जाणारा नाद आणि तो नाद लयबद्ध रीतीने तयार केला तर त्यातून संगीत तयार होते. हे संगीत कर्णमधुर श्रवणीय करण्याची कला ही प्रत्येकाच्या हातोटीवर आणि रियाजावर अवलंबून असते.

मानवी कंठातून निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनी लहरींना साथ करण्याचे काम या स्वरांना सूर देण्याचे काम करण्यासाठी वाद्यांची निर्मिती झाली. यापैकी महत्त्वाची वाद्य्ो म्हणजे तंतुवाद्य. यामध्ये तानपुरा म्हणजेच तंबोरा, सतार, सारंगी, दिलरुबा, रुद्रवीणा, ताऊस, भजनी वीणा. या तंतुवाद्यांचा वापर प्रत्येक गायक आपल्या साथीला करीत असतात. याची निर्मिती करण्याची परंपरा मिरजेत झाली त्याला आता दोन-पावणेदोन शतकांचा कालावधी झाला.

पेशवाईच्या काळात उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये पारंगत असलेले कलाकार या भागात येत होते. येथे मिळणारा राजाश्रय या कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करीत होता. मात्र साथीला असलेली वाद्य्ो नादुरुस्त झाली तर ती दुरुस्त कुठे करायची याची विवंचना होती. याच काळात, मिरज शहरात हत्यारांना धार लावणारे शिकलगार लोक होते. पेशवाईच्या याच अखेरच्या कालखंडात इंग्रजांचा अंमल सर्वदूर पसरत होता. यामुळे तलवारी, बर्ची, भाले ही हत्यारे इतिहासजमा होत आली होती. साहजिकच धार लावण्याच्या उद्योगाला उतरती कळा आली होती. मात्र अशा स्थितीत मिरजेतील हरहुन्नरी शिकलगार म्हणून असलेले फरीदसाहेब यांनी उत्तर भारतातून आलेल्या कलाकारांची वाद्य्ो दुरुस्त करण्याचा विडा उचलला. यातूनच फरीदसाहेब यांच्यासोबत असलेल्या मोहद्दीनसाहेब शिकलगार या तरुणानेही त्या काळात अशीच वाद्य्ो तयार करण्याचे निश्चित केले. यातूनच मिरजेत तंतुवाद्यनिर्मितीची कला विकसित होत गेली. आजच्या घडीलाही याच घराण्यातील काही तरुण तंतुवाद्यनिर्मितीची कला जोपासत आहेत. शिकलगार खानदानातील सातवी पिढी सतारमेकर या नावाने हा व्यवसाय जोपासत आहेत.

तंतुवाद्यनिर्मिती ही कोणत्याही पुस्तकातून शिकण्याची कला निश्चितच नाही. अन्य हस्तकलांचे प्रशिक्षण देणारी विद्यालये आहेत; मात्र वाद्यनिर्मितीचा कोणताही अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला नाही. यामुळे ज्याला या व्यवसायाची आवड आहे तोच या व्यवसायात आज आहे. एके काळी देशभर मिरजेतील तंतुवाद्ये प्रसिद्ध होती. त्या काळात शेकडय़ाने तरुण या व्यवसायाच्या रोजगारात होते. मात्र ‘इलेक्ट्रॉनिक’ वाद्ये आल्यानंतर या व्यवसायावर संक्रांत आली आणि हातातोंडाची गाठ पडेल की नाही याचीच शाश्वती या व्यवसायात उरली नसल्याने मोठा वर्ग अन्य व्यवसायांकडे वळला.

गायकाला साथीला असणारी तंतुवाद्ये ही चार ते साडेचार फुटांपर्यंतच्या परिघाची असतात. यासाठी लागणारे भोपळे हे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला परिसरातच पिकतात. या भोपळ्यांपासून सतार, तंबोऱ्यासारखी वाद्ये तयार केली जातात. या वाद्यावर दांडीसाठी लाल देवदारचे लाकूड वापरण्यात येते. भोपळ्याचा नैसर्गिक पोकळपणा तारांच्या मदतीने स्वरनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. यावर जितके नक्षीकाम नाजूक तेवढा त्याला सुरेखपणा येतो. लाकडी पानावर अगोदर हस्तिदंती नक्षीकाम केले जात होते. आता यासाठी फायबरचा वापर करण्यात येत असला तरी त्यासाठी हस्तकलाच महत्त्वाची आहे. भोपळा आणि दांडी यामध्ये जोडकाम करीत असताना त्यातून स्वर फुटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, तरच त्यातून बाहेर पडणारा स्वर सुरेल असतो.. अन्यथा सारेच मुसळ केरात जाण्याचा धोकाही तितकाच ठरलेला. तयार झालेल्या वाद्याचे पॉलिश आणि रंगरंगोटीही आकर्षक असणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात भोपळ्यावर काम करणारे, रंगकाम करणारे, पॉलिश करणारे, जोडकाम करणारे या एकेका कौशल्यासाठी वेगवेगळे कारागीर तयार झाले आहेत. त्यांची त्यात हातोटी असल्याने एक प्रकारचा सफाईदारपणा या कामामध्ये आला आहे.

मात्र इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा प्रसार १५ वर्षांपूर्वी झाला आणि या नैसर्गिक तंतुवाद्याला उतरती कळा आली असे या व्यवसायातील तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मोहसीन मिरजकर सांगतात. बाजारातच मागणी रोडावल्याने या धंद्यातून अनेक तरुण बाहेर अन्य धंद्यांत स्थिरावले, तर उत्पन्नही तुटपुंजे असल्याने काही तरुण अन्य मार्गावर गेले. एके काळी या धंद्यात रंगकामासाठी महिलांचाही सहभाग होता, मात्र इलेक्ट्रॉनिक वाद्ये आल्याने हा वर्ग यातून बाजूला गेला. आज या व्यवसायात एकही महिला नाही.

काळानुरूप इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्याच्या वापरातील मर्यादा लक्षात आल्या. या दरम्यान, यात ‘घडीचा तंबोरा’ तयार करण्याचा प्रयोगही केला गेला. मात्र तो अल्पकाळच टिकला. डिजिटल वाद्यांमध्ये भरण्यात आलेले स्वर हे कृत्रिम असल्याने यामध्ये सर्जनशीलतेचा अभाव पुन्हा दिसू लागला. बंदिशीसारखी नजाकत यामध्ये नसल्याने गेल्या चार-पाच वर्षांत पुन्हा मिरजेत तयार होत असलेल्या असली तंतुवाद्यांना देशी बाजारपेठेबरोबरच परदेशी बाजारपेठ खुणावू लागली आहे.

अभिजात कला म्हणून भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक पातळीवर ओळख लाभली असून यातून श्रवणसुखाचा आनंद अवर्णनीय असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र अनेक शिकाऊ कलाकारांना तानपुरा बाळगण्याऐवजी स्वस्त, कुठेही घेऊन जाता येण्यासारखे असे ‘इन्स्टंट’ उपकरणच हवे असल्याने ते इलेक्ट्रॉनिककडे वळत आहेत. ही ओढही तात्कालिक असल्याची जाणीव झाल्यानंतर तरुण वर्ग पुन्हा पारंपरिक तंतुवाद्याकडे वळेल आणि या कारागिरीला पुन्हा वैभव प्राप्त होईल असा विश्वास शिवाजी विद्यापीठातील संगीत शिक्षिका रश्मी फलटणकर व्यक्त करतात.

मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीची कला विकसित व्हावी, बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने क्लस्टर योजनाही आणली असून यासाठी  मिरज म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स हब या नावाने ही योजना अमलात येऊ घातली आहे. यासाठी २२ हजार चौरस फुटांचा भूखंडही मिळाला असून या ठिकाणी इमारत उभारणी सध्या सुरू आहे. या ठिकाणी वाद्यांचे प्रदर्शन, संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र आणि विक्री केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नव्या पिढीतील तरुण मिरजेतील तंतुवाद्याला असलेली मागणी लक्षात घेऊन आधुनिक संपर्क साधनांचा वापर आता करू लागले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ईमेलने ग्राहकांशी संपर्क साधणे, संकेतस्थळ विकसित करून या तंतुवाद्याचा इतिहास, नजाकत आणि वैशिष्टय़े जगभरातील संगीतप्रेमींना करून या माध्यमातून ग्राहक वर्ग आपणाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने नव्याने येणाऱ्या कारागिरांना भविष्यात संधी असल्याचे मोहसीन सतारमेकर सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संधी वाढवता येतील, पण सध्या तरी त्या कमी आहेत, अशी या व्यवसायातील तरुणांची स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठीच तर, वाद्यपरंपरेच्या तारा आधुनिकेशी जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत!