02 July 2020

News Flash

जातिव्यवस्था आली कोठून?

जातिव्यवस्था ही मूलत: टोळीव्यवस्थेतून रूपांतरित झालेली व्यवस्था आहे.

पूर्वीची टोळीव्यवस्था आजच्या जातिव्यवस्थेची मातृसंस्था ठरते. जातिव्यवस्था एकटय़ा ब्राह्मणांनी निर्माण केली असती तर इतरांनी केव्हाच नष्ट करून टाकली असती. आजही जातिअंत करणे म्हणजे बेटीबंदी तोडणे होय असे समीकरण बनले आहे व येथे या गाभ्याच्या मुद्दय़ापुरताच विचार केला आहे..गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे चातुर्वण्र्य -गुणकर्मनिष्ठ असो की जन्मनिष्ठ- संपूर्ण भारतभर कधीही अस्तित्वात नव्हते. त्यामुळे वर्गीकरणासाठी मांडलेल्या काल्पनिक व्यवस्थेपासून वास्तविक जातिव्यवस्था निर्माण होणे शक्य नव्हते. मग जातिव्यवस्था आली कोठून?

जातिव्यवस्थेची लक्षणे अनेक आहेत. बेटीबंदी, रोटीबंदी, व्यवसायबंदी, स्पृशताबंदी, श्रेष्ठकनिष्ठता ही त्यापैकी काही. यातील मूलभूत लक्षण म्हणजे बेटीबंदी. ही सारीच लक्षणे जन्माधारित आहेत व त्या सर्वाचा मूलाधार बेटीबंदी हा होय. बेटीबंदी तोडली की जातिव्यवस्थेची सारीच लक्षणे नाहीशी होतात व म्हणून ती व्यवस्था नष्ट करायची तर बेटीबंदीच तोडली पाहिजे, असे म्हटले जाते ते यासाठीच. आज बेटीबंदी वगळता उरलेली लक्षणे व्यवहारत: कोलमडून पडली आहेत व जातिअंत करणे म्हणजे बेटीबंदी तोडणे होय असे समीकरण बनले आहे व मी येथे या गाभ्याच्या मुद्दय़ापुरताच विचार करणार आहे.

‘जात’ म्हणजे तरी काय? रक्तसंबंधाने जोडला गेलेला समूह म्हणजे जात. यात दोन गट येतात. एक – ज्यांचे नजीकचे पूर्वज एकच आहेत अशा एकाच रक्ताने जोडलेला भावकीचा गट. ते एका कुळाचे वा गोत्राचे मानले जातात. बाप, भाऊ, काका, चुलतकाका अशी नाती यात मोडतात. हे सपिंड असल्यामुळे त्यांच्यात विवाह होऊ शकत नाही. हिंदू कायद्यातही या गटास ‘सपिंड व विवाहासाठी प्रतिबंधित गट’ असे म्हटले आहे. दुसरा गट सोयऱ्यांचा होय. यात सासरा, मामा, मेहुणा, त्यांची भावकी अशी नाती मोडतात. हा विवाह-अनुज्ञेय नात्यांचा गट होय. विवाह जुळविण्यापूर्वी भावकीच्या व सोयऱ्यांच्या नात्यांची खात्री करून घेतली जाते. यासाठी दोन्ही कुटुंबांचा इतिहास पाहिला जातो. गोत्र, कुल तपासले जाते. त्या कुटुंबाचे सोयरे व भावकी कोठवर आहेत? त्यांच्या पूर्वजांत विवाह होत होते की नाही? ते पूर्वीचे सोयरे आहेत की नाही? याचा शोध घेतला जातो. असा शोध लागत नसेल तर तो आपल्या जातीचा नाही म्हणून विवाह जुळत नाही. तेव्हा जात म्हणजे विवाह प्रतिबंधित भावकी व विवाह-अनुज्ञेय सोयरे यांचा समूह होय; एक आंतर्विवाही गट होय. अनेक समाजशास्त्रज्ञांनी अशीच व्याख्या केली आहे व ती वस्तुनिष्ठ आहे.

अशा अंतर्विवाही गटांची म्हणजे जातींची संख्या किती असावी? भारतात चार हजार जाती आहेत ही एक मोघम बोलण्याची पद्धत आहे. जातींच्या वेगवेगळ्या नावांवरून तिची संख्या मोजली जाते. परंतु दोन किंवा अधिक जातींचे नाव एकच असले तरी वरील अर्थाने ती जात एकच असेल असे नाही. एकाच नावाच्या विविध जाती वेगवेगळ्या प्रदेशात आढळून आल्या आहेत. जातीबाहेर लग्न करणे या कसोटीनुसार जात व पोटजात असा भेद करता येत नाही. एका जातीतून अनेक कारणांनी दुसरी जात निर्माण झाली तरी स्वतंत्र आंतर्विवाही गट म्हणून स्वतंत्र जात बनते. तसेच अनेक जातींना मिळून एका नावाने ओळखले जात असते. उदा.- ब्राह्मण, मराठा किंवा महार ही नावे कोणत्या एका आंतर्विवाही जातीची नव्हेत. त्या प्रत्येक नावात अनेक आंतर्विवाही जाती आहेत. वस्तुत: हे जातिपुंज वा जातिसमूह होत. डॉ. श्री. व्यं. केतकरांनी ब्राह्मणांच्या जाती ८०० असल्याचे म्हटले आहे. डॉ. गो. स. घुर्ये यांनी १९११च्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये ब्राह्मणांच्या ९३ जाती असल्याचे नोंदविले आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतात ब्राह्मणांच्या १८८६ जाती असल्याचे म्हटले आहे. त्यातील १२१० जातींची नावेही दिली आहेत. संजय सोनवणी यांनी ब्राह्मणात ५५० जाती असल्याचे म्हटले आहे. डॉ. केतकरांनी (१९०९) म्हटले होते की, हिंदू समाजात अशा काही जाती आहेत की, ज्या १५ कुटुंबांपलीकडे विवाह करू शकत नाहीत. आपली संख्या अधिक दिसावी म्हणून अनेक जाती जातिसमूहाचे नाव सांगतात, पण त्यांच्या खऱ्या जाती विवाहाच्या वेळेस कळतात. थोडक्यात जात म्हणजे नात्यागोत्यांच्या कुटुंबांचा मोठा समूह असतो. जात म्हणजे विस्तारित कुटुंब होय, ही डॉ. इरावती कर्वे यांनी केलेली व्याख्या अगदी वस्तुनिष्ठ आहे.

मनुस्मृतीच्याच नव्हे तर आर्याच्या आधीपासून भारतात शेकडो जाती अस्तित्वात होत्या. या जाती कशा निर्माण झाल्या याचे स्पष्टीकरण देणारा पहिला धर्मग्रंथ मनुस्मृती होय. चार वर्णाच्या संकरातून जाती निर्माण झाल्या, असे मनुस्मृती सांगते. वरच्या वर्णाचा पुरुष व खालच्या वर्णाची स्त्री हा अनुलोम विवाह. खालच्या वर्णाचा पुरुष व वरच्या वर्णाची स्त्री हा प्रतिलोम विवाह. अशा विवाहांतून निर्माण झालेली प्रजा म्हणजे विविध संकर जाती. अशा संकर जातींचा मूळ चार वर्णाशी व अन्य संकर जातींच्या झालेल्या साखळी विवाहांतून निर्माण झालेल्या आणखी जाती म्हणजे सर्व जातीविश्व. अशी ही मनुस्मृतीने जातीची लावलेली उपपत्ती म्हणजे केवळ कल्पनाविलास व भाकडकथा नसून सर्वच जातींची बदनामी होय. जशी वर्णोत्पत्ती काल्पनिक तशीच ही जात्युत्पत्तीही काल्पनिक. आधीच अस्तित्वात असलेल्या जाती कशा जन्मल्या हे ईश्वराच्या नावे सांगता येईना म्हणून वर्णसंकराचा हा भ्रामक धर्मसिद्धांत मांडण्यात आला. चारशिवाय पाचवा वर्ण नाही असे जाहीर करून देशात आणखी असलेल्या जातींना अस्पृश्य जाती मानण्याची सोय करून ठेवण्यात आली.

जातिव्यवस्था ही मूलत: टोळीव्यवस्थेतून रूपांतरित झालेली व्यवस्था आहे. आंतर्विवाही गट हे तिचे मुख्य लक्षण टोळीव्यवस्थेचे होय. भारतीयच नव्हे तर सर्वच मानवी संस्कृतीचा आरंभ टोळी-अवस्थेतून झाला आहे. ‘एक टोळी- एक रक्त’ हाच नियम होता. विवाह आपल्याच टोळीत होत असत. टोळीचीच जमात वा जात बनत असे. क्रमाने कित्येक जमाती भटक्या अवस्थेतून स्थिर झाल्या; काही भटक्या वा वन्य जमातीच राहिल्या. स्थिर अवस्थेतील जमातींनी एकत्र येऊन ग्रामीण समाज बनविला. मात्र असे करताना स्वजमातीतच विवाह करण्याची मूळ पद्धत त्यांनी सोडून दिली नाही. जमातीचे रूपांतर जातीत झाले. ही प्रक्रिया अनेक समाजशास्त्रज्ञांनी मान्य केली आहे. जातिव्यवस्थेबरोबर ग्रामव्यवस्थाही तयार झाली. व्यवसायांची विभागणी झाली. व्यवसायानुसारही काही जाती बनल्या. आणखी अनेक कारणांतून अनेक जाती जन्माला येऊ लागल्या. पण सामान्यपणे घडलेली गोष्ट म्हणजे नवी जात बनताना आंतर्विवाहाचा गाभा मात्र कायम राहिला. या दृष्टीने पूर्वीची टोळीव्यवस्था आजच्या जातिव्यवस्थेची मातृसंस्था ठरते. ती ब्राह्मणांनी निर्मिली नाही. तिचे धार्मिक समर्थन करण्याचे व स्वत:साठी अधिकाधिक उपयोग करण्याचे त्यांनी काम केले. ती एकटय़ा ब्राह्मणांनी निर्माण केली असती तर इतरांनी केव्हाच नष्ट करून टाकली असती.

स्थिरावस्था प्राप्त झाल्यावर गावाच्या गरजा गावातच भागविल्या जाव्यात, या दृष्टीने गाव स्वयंपूर्ण बनविण्यात आले. यासाठी ग्रामव्यवस्था व जातिव्यवस्था यांची गुंफण घालण्यात आली. गावगाडा व जातगाडा एकरूप बनून तो ग्रामीण जीवनगाडा बनला. आरंभीच्या काळात मोठी शहरे नव्हती, गावेच होती. गावातील प्रत्येक जातीला जातपुढारी असे. गावाचे व जातीचे नियम गाववाले व जातवाले बनवीत. गावासाठी ग्रामसभा वा ग्रामपंचायत असे. गावातील वाद-विवाद मिटविण्याचे व न्यायदानाचे कामही ती ग्रामसभा करी. प्रत्येक जातीची स्वतंत्र जातपंचायत असे. जातीचे नियमन करणे, जातीच्या अंतर्गत न्यायदान करणे अशी कामे जातपंचायत करी. जात म्हणजे जणू एक स्वायत्त संस्थान व गाव म्हणजे स्वायत्त संघसंस्थान असे. प्रदेशाचा जो राजा असे तो करवसुली व कायदा-सुव्यवस्था यापलीकडे गावाच्या व जातीच्या कारभारात लक्ष घालीत नसे. त्यामुळे राजा कोण आला नि गेला याचे गावाला व जातीला काही सोयरसुतक नसे. शतकानुशतके मुस्लिमांसहित अनेक राजवटी आल्या नि गेल्या; पण गावगाडा व जातगाडा तसाच चालू राहिला. आरंभीला सर्वत्र जगात अशीच टोळीव्यवस्था होती, परंतु नंतर तेथे उदयास आलेल्या (ख्रिस्ती, इस्लाम) धर्मानी समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिल्याने टोळीव्यवस्थेचे जातिव्यवस्थेत रूपांतर झाले नाही. तेथील राजवटींनीही हेच काम पुढे नेले. भारतात मात्र धर्मानी वा राज्यकर्त्यांनी ती नष्ट करण्याचे प्रयत्न केले नाहीत; तिला तसेच राहू देण्याची स्वायत्तता दिली. एवढेच नाही तर त्या धुरिणांनी स्वत:च्या लाभासाठी तिचा वापर केला. हा गावगाडा आम्ही स्वत: अनुभवला आहे. त्रिं. ना. अत्रे यांच्या ‘गावगाडा’ (१९१५) पुस्तकात त्याचे प्रतिबिंब पाहता येईल. गावगाडा ब्राह्मणांनी निर्माण केला नाही. काही गावांत तर ब्राह्मणाचे एकही घर दिसणार नाही.

जातिव्यवस्थेचे उगमस्थान शोधायचे असेल तर ग्रामव्यवस्थेचा वा नागरजीवनाचा भाग न बनता रानावनात भटक्या, अर्धभटक्या व वन्यजमातींचा अभ्यास करावा लागेल. यांनाच आदिवासी म्हटले जाते. त्यांच्यात जातिव्यवस्था अधिक घट्ट दिसून येते. त्यांच्यात बेटीव्यवहार होत नाहीत. त्यांचे स्वत:चे सामाजिक नीतिनियम व विवाहांचे प्रकार वेगवेगळे आहेत. सहपालन विवाह, हठागमन विवाह, सेवाविवाह, राक्षसविवाह असे विवाह प्रकार त्यांच्यात आजही रूढ आहेत. त्यांची प्रत्येक जात स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानते. प्रत्येकाला जातीचा अभिमान आहे. त्यांच्यात प्रबल जातपंचायती आहेत. आमचा कोणताही वाद सरकारच्या न्यायालयात जात नाही असे ते अभिमानाने सांगतात. ब्रिटिशांनी त्यांच्यातील अनेक जाती ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केल्या होत्या. आदिवासी जमाती म्हणजे एक स्वायत्त शासनच असते. आदिवासी जमातीकडे पाहिले म्हणजे जातिव्यवस्था कोठून आली असावी याचे उत्तर मिळते. ज्यांच्याकडे स्थिर व नागरी समाजाकडून उपदेश वा शिकवण द्यायला कुणी गेला नाही व ज्यांना शतकानुशतके दूरच ठेवले गेले, त्यांच्यात जातिव्यवस्था अधिक घट्ट का आहे? तेव्हा आंतर्विवाह गट हा आपल्या आद्यपूर्वजांकडून आलेला वारसा आहे.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2016 4:24 am

Web Title: origin of caste system
Next Stories
1 चातुर्वर्ण्य कधी अस्तित्वात असेल काय?
2 क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त
3 संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान
Just Now!
X