‘‘लीना आणि माझं लग्न पारंपरिक पद्धतीने एकमेकांना बघून, बोलून झालं. म्हणजे अगदी वर-वधू पाहिजे, अशी जाहिरात पाहून. तेव्हा इंटरनेट नव्हतं, वर्तमानपत्र-मासिकामध्ये जाहिराती असायच्या. माझी आत्या तेव्हा निवृत्त झाली होती, तिला जाहिरातीमध्ये लीनाचं स्थळ दिसलं. ही मुलगी माझ्यासाठी योग्य आहे, असं तिला वाटलं. मग पुढची बोलणी झाली आणि आम्ही भेटलो. सुरुवातीच्या एक-दोन भेटी घरच्यांबरोबर झाल्या. त्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे भेटलो, एकमेकांना पसंत केल्यानंतर आता पुढे जायला हरकत नाही असं घरच्यांना सांगितलं. माझे आई-वडील मांसाहारी असले तरी मी पूर्णपणे शाकाहारी होतो. त्यामुळे मला मुलगीसुद्धा शाकाहारीच हवी होती. ही माझी प्रमुख अट होती. लीनाही शाकाहारीच होती. आम्हाला एकमेकांच्या बाकीच्या गोष्टी पटल्या होत्या. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला. मे १९८५मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो,’’ निखिल मोगरे आपल्या लग्नाबद्दल सांगत होते. ३२ वर्षांपूर्वी लीना पेंडसे आणि निखिल मोगरे यांच्या आयुष्याची गाठ मारली गेली ती आता व्यायामाच्या क्षेत्रामध्ये अधिक मजबूत झाली आहे.

लीनासाठी लग्न आणि करिअर या गोष्टी मागेपुढेच घडल्या. त्या सांगतात की, ‘‘निखिलची भेट झाली तेव्हा मी एसएनडीटीच्या जुहू कॅम्पसमधून ‘फूड सायन्स अ‍ॅण्ड न्यूट्रिशन’ या विषयात एमएस्सी करत होते. माझी आई गृहिणी होती, पण मी हे शिक्षण घ्यावं यासाठी ती आग्रही होती. पहिलं वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमचं लग्न झालं. उरलेलं शिक्षण मी लग्नानंतर पूर्ण केलं. आरोग्य हा माझ्या आवडीचा प्रांत होता. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे फिटनेसला महत्त्व होतं. आई योगासनं आणि व्यायाम करायची, माझे वडील आर्किटेक्ट होते, तेही फिटनेससाठी आग्रही होते. माझ्या सासऱ्यांना बॉडीबिल्डिंगचा छंद होता. माझ्या सासूबाई ओएनजीसीच्या उपसंचालक पदावरून निवृत्त झाल्या. त्यांनाही मी काही तरी करावं अशी अपेक्षा होती. मी स्वत: व्यायामाच्या क्षेत्रातच करिअर करायचं असं काही ठरवलं नव्हतं, पण मी घरी बसणार नव्हते हे नक्की होतं. मला डाएटिशियन व्हायचं होतं, त्याच विषयात मी शिक्षण घेतलं होतं. लग्नानंतर वर्षभर मी लेक्चरर म्हणून नोकरी केली. मला स्वत:ला एरोबिक्सची आवड होती. त्यामुळे मी एरोबिक्स शिकवायला सुरुवात केली. सकाळी आणि संध्याकाळी क्लासेस असायचे. मला माझ्या आवडीचं कामही करता येत होतं आणि मला कुटुंबासाठी आणि स्वत:साठी पुरेसा वेळही देता येत होता. तेव्हा मी पॉवर योगा, फिटनेस या विषयांवर लिहितही होते. आधी मी दुसऱ्यांकडे शिकवायला जायचे, नंतर मी स्वत:चं काम सुरू केलं. इतरांसाठी काम करून पैसे कमावण्यापेक्षा स्वत:साठीच काम करून पैसे का कमवू नयेत, असा साधा विचार होता. विठ्ठल कामत हे आमचे कौटुंबिक मित्र, त्यांनीही मला असाच सल्ल दिला. थोडक्यात, माझ्या छंदाचंच मी माझ्या व्यवसायात रूपांतर केलं. मी एअरोबिक्स इन्स्ट्रक्टर आणि पर्सनल ट्रेनर म्हणून स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. माझं लिखाण वाचूनच माधुरी दीक्षितनं मला संपर्क साधला. ती माझी पहिली क्लायंट होती. ही गोष्ट ‘हम आपके है कौन’च्या वेळची. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची पर्सनल ट्रेनर असणारी तेव्हा ती पहिली कलाकार होती.’’

माधुरीनंतर लीनाकडे अनेक ‘सेलेब्रिटी क्लायंट्स’ आले. त्यामध्ये कलाकार, मॉडेल, उद्योजक यांचा समावेश होता. त्या वेळेस निखिल स्वत:च्या कामात मग्न होते. लीनाकडे अनेक मोठमोठी माणसं फिटनेस कमावण्यासाठी आणि जपण्यासाठी येतात हे त्यांना माहिती होतं, ‘‘पण मी तोपर्यंत लीनाच्या कामासाठी तितकासा वेळ देऊ  शकत नव्हतो. मी मेकॅनिकल इंजिनीयर. दोन-तीन खासगी कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर १९९२मध्ये मी स्वत:चा संगणकाचा व्यवसाय सुरू केला. साधारण २००५ पर्यंत हे काम सुरू होतं. तेव्हा लीनाची पहिली जिम सुरू झाली होती. ती आधी खारला होती, नंतर जवळच वांद्रय़ाला आम्ही ती हलवली. ही जिम २४ तास सुरू असते. दुसरी ‘जिम’ शिवाजी पार्कला सुरू केली आणि तिसरी ठाण्याला. या दोन्ही ‘जिम’चं काम सकाळी ५ ते रात्री १२ चालतं. तेव्हा मी संध्याकाळी ५ वाजता ऑफिसमधून बाहेर पडायचो ते ‘जिम’वर जायचो आणि मग तिथे रात्री साडेनऊ-दहापर्यंत थांबायचो. मी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडलेलो असायचो. त्या काळात खूप मोठा दिवस असायचा माझ्यासाठी. १२ तासांपेक्षा जास्त वेळ मी घराबाहेर असायचो. ही ओढाताण वाढायला लागली, तसा मी संगणकाचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण वेळ लीनाबरोबर काम करायला सुरुवात केली.’’

‘‘निखिलनं आणि मी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. तो आर्थिक व्यवहार, व्यवस्थापन, नियोजन, प्रकल्पांची आखणी करून ते मार्गी लावणं, एचआर, मेन्टेनन्स या कामात निपुण आहे. मी विक्री, मार्केटिंग, व्यवसायाचा विस्तार, ब्रॅण्डिंग या गोष्टी सांभाळते. आमची कामं एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे कामं व्यवस्थित होतात. अर्थात वादावादीही होते. आमची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्याला सगळ्या गोष्टी परिपूर्ण लागतात, माझं तसं नाही. वादाशिवाय प्रगती होत नाही, प्रत्येक व्यवसायाला हा नियम लागू होतो. पण फक्त वाद घालून उपयोग नसतो, निर्णय घ्यावेच लागतात. तसे ते आम्ही घेतो आणि मग त्याच्या अंमलबजावणीसाठी झोकून देऊन काम करतो. यामुळे आमच्या क्लायंटना कधी समस्या येत नाहीत.’’ लीना मोगरेंच्या फिटनेस सेंटरनी स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. अनेक नामांकित व्यक्ती त्यांच्यासोबत काम करतात. या ग्लॅमरशी निखिलनी कसं जुळवून घेतलं? ‘‘मला ग्लॅमर नवं नव्हतं. मी स्वत: क्रिकेट खेळायचो आणि अंपायरिंगची परीक्षाही पास झालो आहे. १९८० मध्ये मी ही परीक्षा पास झालो तेव्हा मी सर्वात तरुण अंपायरपैकी एक होतो. ही परीक्षा कठीण असते. उत्तीर्ण होण्यासाठी ८० टक्के गुणांची आवश्यकता असते. अनेक जणांना ३-४ वेळा ही परीक्षा द्यावी लागते. पण मी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो होतो. मी स्वत: वयाच्या ४७व्या वर्षांपर्यंत खेळत होतो. मुंबईमध्ये ट्रेडर्स असोसिएशनच्या टीम खेळतात, त्यामध्ये मी खेळायचो. या खेळाचा दर्जा पुष्कळ चांगला असायचा, कारण आमच्यापैकी अनेक जण विद्यापीठ पातळीला वगैरे खेळलेले असायचे. लीनाबरोबर काम सुरू केल्यानंतर मी क्रिकेट खेळणं थांबवलं. या सर्व गोष्टींमुळे मला क्रिकेटशी संबंधित ग्लॅमरचा चांगला अनुभव होता. युवराज सिंग, झहीर खान, रोहित शर्मा असे अनेक नावाजलेले क्रिकेटपटू माझ्या जिममध्ये नियमितपणे यायचे, येतात. मुंबईची अख्खी टीम माझ्या जिममध्ये यायची. इतर खेळांमधले खेळाडूही नियमितपणे येतात. क्रिकेटचं ग्लॅमर जवळून पाहिलेलं असल्यामुळे मला इतर सेलेब्रिटींच्या ग्लॅमरशी जुळवून घेण्याचा प्रश्न आला नाही. उलट त्यामुळे जबाबदारीची जाणीव जास्त असते. आम्ही आमच्याकडे शिस्तीचे नियम अगदी कडक ठेवले आहेत. त्यामध्ये मग कोणालाच सवलत नसते. एकदा एका मोठय़ा फिल्म स्टारने रात्री आमच्या जिममध्ये येऊन, पोषाखाचे नियम न पाळता वर्कआऊट करण्याचा आग्रह धरला होता. पण आमचे इन्स्ट्रक्टर त्याला बधले नाहीत.’’

शिस्तीचा आग्रह धरल्यामुळे एका १५ वर्षांच्या मुलाचे प्राण वाचल्याची आठवण निखिल सांगतात. ‘‘साधारण २०१०ची गोष्ट आहे. दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या. आमच्याकडे एक मुलगा आला होता. त्याचं वजन जास्त होतं आणि कॉलेज सुरू व्हायच्या आधी त्याला वजन कमी करायचं होतं. आमच्या नियमांप्रमाणे त्याची ट्रेडमिलवर टेस्ट घेतली, तेव्हा तो फिट नव्हताच, उलट त्याला वैद्यकीय त्रास असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही त्याच्या पालकांना बोलावून घेतलं. त्याचे पालक त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेव्हा त्याच्या हृदयात दोष असल्याचं तपासण्यांमधून उघड झालं. डॉक्टरांनी त्याला ‘शस्त्रक्रिया झाल्याशिवाय बुद्धीबळ किंवा कॅरम यांच्याशिवाय कोणताही खेळ खेळायचा नाही,’ असं बजावलं. त्या दिवशी त्याची आमच्याकडे पूर्वचाचणी नीट झाली नसती तर व्यायाम करतानाच त्याच्या जिवावर बेतू शकलं असतं. असे अनुभव येतात तेव्हा कठोर शिस्त राखल्याचं समाधान मिळतं. हल्ली तरुण मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या मोठय़ा प्रमाणात आढळतात. २०१३मध्ये माझ्या एका वर्गमित्राच्या मुलाला हृदयविकाराचा हलका धक्का बसल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. त्याची उंची होती ६ फूट ३ इंच आणि वजन होतं १४५ किलो. डॉक्टरांनी त्याला धोक्याचा इशारा दिला, ‘वजन कमी केलं नाही तर पुढच्या वेळी डिस्चार्ज मिळणार नाही.’ त्यानंतर तो नियमितपणे जिममध्ये यायला लागला. त्याला त्याच्या व्यायामाबरोबरच आहारही ठरवून दिला. आता तो निरोगी जीवनशैलीने जगतोय. अशी उदाहरणं खूप समाधानकारक असतात. मग क्लायंट नामांकित असो किंवा सामान्य. आमच्यासाठी त्याचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो.’’

फिटनेसच्या करियरवर लक्ष केंद्रित करताना लीना आणि निखिल यांना घराकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागत होती. १९८९ मध्ये मुलगा अर्जुनचा जन्म झाला. दोघेही बाहेर असताना त्याला कसा वेळ दिला? ‘‘अर्जुन आणि घर याला आम्ही दोघांनीही महत्त्व दिलं. निखिलच्या आई आमच्यासोबत असायच्या. त्यांचा खूप आधार होता मला. दिवसा तर मुलगा शाळेतच असायचा. पण संध्याकाळी तो घरी आल्यानंतर आजी त्याच्यासोबत असायची. आणि आमच्यापैकी कोणी तरी एक वेळ काढून लवकर घरी जायचो. त्यामुळे त्याला एकटं कधी वाटलं नाही. आपले आई-बाबा दोघेही बाहेर काम करतात, हे त्याला माहिती होतं आणि त्याची कधी तक्रार नव्हती. शिवाय हे फिल्ड असं आहे की, थोडं नियोजन करून तुम्हाला स्वत:साठी काही वेळ काढता येतो. त्यामुळे घराच्या आघाडीवर ओढाताण कधीच झाली नाही. तो स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा मुलगा म्हणून वाढला. आता तो फिल्ममेकर आहे. त्यानं स्वत:चं ‘गणेशा प्रॉडक्शन’ सुरू केलं आहे. आता तो त्याच्या कामात व्यग्र असतो.’’

‘‘एरवी कुटुंबामध्ये लग्न, सण समारंभ यांना आम्ही महत्त्व देतो. भाऊबीज आणि गणपती हे सण आमच्याकडे विशेष मोठे असतात. त्यासाठी सर्व कुटुंबीय एकत्र जमतो. कारण फिट राहा आणि सुखी राहा, हा साधा मंत्र आम्ही अमलात आणतो मग तो शारीरिक फिटनेससाठी असो की नातेसंबंध जपण्यासाठी.’’

निमा पाटील

nima_patil@hotmail.com