विश्वाच्या अस्तित्वाबद्दल किंवा त्याच्या निर्मितीबद्दल आजचे शास्त्रज्ञ एका वेगळ्या पातळीवरून चर्चा करू लागले आहेत. एक काळ असा होता की जेव्हा पृथ्वी हे विश्वाचे केंद्र मानले जायचे आणि ग्रह तारे हे सर्व खगोल पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहेत असे सांगितले जायचे. आज शास्त्रज्ञ सांगतात की विश्वाला केंद्र स्थान नाही आणि त्याचे नुसतेच प्रसरण होत आहे असे नाही तर दर क्षणाला त्याच्या पसरण्याची गती वाढत आहे.
पण हे सर्व वाचताना किंवा ऐकताना असंही वाटत की हे सर्व कशावरून खरं असेल. तर विज्ञानाची प्रगती ही असेच स्वतला प्रश्न विचारून होत असते.
प्लेटोचा शिष्य आणि अ‍ॅलेक्झांडरचा गुरू अ‍ॅरिस्टॉटल एक महान दार्शनिक होता यात वादच नाही.  त्याचा जन्म इ.पू ३८४ यावर्षी झाला आणि ६२ व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याने अनेक विषयांवर लिखाण केले. त्याच्या लिखाणाचा प्रभाव जवळ जवळ २० शतके राहिला. युरोपमध्ये एक काळ असा होता की कुठल्याही शास्त्रीय विवादाचा निष्कर्ष अ‍ॅरिस्टॉटलच्या लिखाणात लागायचा. जर अ‍ॅरिस्टॉटल असे म्हणत असेल तर तेच बरोबर.  आणि तिथे सर्व तर्काचा अंत होत असे.
एखाद्या विधानाला प्रयोग करून त्याच्या खऱ्याखोटय़ाची शहानिशा करायची सोय नव्हती. किंवा तसे करणे हे मान्य नव्हते. बाण पुढे का जातो यावर अ‍ॅरिस्टॉटलचा युक्तिवाद असा होता की धनुष्यातून ताणलेल्या बाणाला सोडल्यावर बाणाच्या मागच्या टोकावर एक प्रकारची निर्वात पोकळी तयार होते जी बाणाला पुढे जाण्यास मदत करते. तर यावर  गॅलिलियोने असा तर्क केला की, जर आपण बाणाला नेहमीसारखे आडवे न धरता त्याला उभा धरला तर तो जास्त दूर जायला पाहिजे कारण आता पूर्ण बाणाच्या मागे अशी निर्वात पोकळी तयार होईल.
जरी काही शास्त्रज्ञ जाहीरपणे अ‍ॅरिस्टॉटलच्या विरूद्ध जाण्यास तयार नसले तरी अनेक बाबी त्यांना पटत नव्हत्या. पण हा एक फार नाजूक विषय होता. कारण अ‍ॅरिस्टॉटलच्या मताप्रमाणे पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे. तसं बघितलं तर पृथ्वीवरून बघताना ग्रह सूर्याभोवती फिरले काय किंवा पृथ्वी भोवती. याने सर्वसामान्यावर काहीच परिणाम होण्याचे कारण नव्हते.
सोळाव्या शतकातील पोप आणि त्याच्या बरोबर इतर धर्मगुरूंना श्रेष्ठ स्थान होते. आणि अ‍ॅरिस्टॉटलच्या मतांनी (अगदीच फक्त काहीच) खोटं ठरवणं म्हणजे त्यांच्या अधिकाराला आव्हान देण्यासारख होतं. पण त्याच बरोबर युरोपमध्ये जन्म घेतला होता फलज्योतिषाने. त्यात ग्रहांच्या स्थितीवरून भविष्य सांगितले जात असे,  त्यासाठी येत्या काही वर्षांत कुठला ग्रह कुठे असेल हे अचूक माहिती असणे गरजेचे होते. आणि त्यासाठी लागणारी जटिल गणिते ‘कंप्युटर्स’ करत. ते गणितात अत्यंत पारंगत असत आणि मोठमोठय़ा शास्त्रज्ञांची गणिते किंवा समीकरणे हे सोडवून देत असत.
ग्रहांच्या बाबतीत कितीही अचूक गणित मांडण्याचा प्रयत्न केला तरी अचूक उत्तर मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळतच नव्हतं. शास्त्रज्ञांनी गणिताच्या अनेक जटील अशा क्लृप्त्या केल्या पण ग्रहांच्या भविष्यातील  स्थितीचे अचूक भाकित करण्यात त्यांना यश येत नव्हते. आणि जर एखाद्या समीकरणातून काही विशिष्ट कालावधीसाठी त्याना यश आले तर याच गणितामुळे  मागील निरीक्षणांची उत्तरे मिळत नव्हती.   
तेव्हा कोपíनकसला ग्रहांचे गणित सोडवण्याकरता ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत असा विचार करून गणित सोडवण्यात यश आले. मुख्य म्हणजे हे गणित सोडवणे सुद्धा तुलनेने खूप सोपे झाले होते. पण यात त्याला दोन अडथळ्यांना सामोरं जाव लागत होतं. एक म्हणजे सूर्यकेंद्रित विश्वाच्या कल्पनेला पुढे आणणं अत्यंत धोकादायक आहे हे त्याला माहीत होतं. त्यावरून त्याला स्वतचे प्राणदेखील गमवावे लागले असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ग्रहांच्या भविष्यातील स्थितींचे भाकित करण्यासाठी कोपíनकसचे गणित सोपे असले तरी त्यामुळे अचूक भाकित करण्यात त्याला यश मिळत नव्हते. या काळापर्यंत  दुर्बणिीचा शोध लागला नसला तरी ग्रहांच्या स्थितींची त्या काळाच्या तुलनेत निरीक्षणे घेण्यास वेधसाधने होती.
आणखी एक बाब म्हणजे कोपíनकसच्या कल्पनेच्या विरोधात एक तर्क असा ही होता की जर बुध आणि शुक्र हे ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आतून सूर्याची परिक्रमा करत असतील तर आपल्याला या ग्रहांच्या कलाही दिसल्या पाहिजेत. त्या दिसत नव्हत्या. खरंतर ग्रहांचे आकारच आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. पण तरीही हा तर्क मात्र बरोबर होता.
त्या नंतर १६०९ मध्ये दुर्बणिीचा शोध लागला. आणि दुर्बणि वापरून गॅलिलिओ गॅलिलीने अवकाशाचा वेध घेण्यास सुरुवात केली. जानेवारी १६१० मध्ये त्याने गुरूच्या उपग्रहांचा शोध लावला. आणि असाही तर्क केला की जसे गुरूचे उपग्रह त्याच्या भोवती फिरत आहेत तसेच इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात.
आणि मग या प्रकरणाचा एक मोठा पुरावा मिळाला. सप्टेंबर १६१० मध्ये शुक्राचे निरीक्षण करताना त्याला शुक्राच्या कला दिसल्या. हा सूर्यकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेस एक मोठा पुरावा होता. पण गॅलिलिओने ते लगेच जाहीर केले नाही. त्याने आपला शोध एका कूट पंक्तित लिहून ठेवला. या लॅटिनमधील  कुटाचा अर्थ साधारण असा होतो – आज मला आकस्मिक  निष्फळ शोध लागला. पण या वाक्यातील लॅटिन अक्षरांपासून असं पण वाक्य तयार होतं की प्रेमाची देवता (म्हणजे शुक्र) डायना (म्हणजे चंद्र) सारख्या कला दाखवते. जेव्हा पुढे काही दिवस निरीक्षणे घेऊन गॅलिलिओला खात्री पटली की आपली निरीक्षणे बरोबर आहेत तेव्हा त्याने आपला शोध जाहीर केला. विज्ञानाच्या दृष्टीने सूर्यकेंद्रित विश्वाच्या कल्पनेला भक्कम असा निरीक्षणांचा पुरावा मिळाला होता.
सध्या आकाशात पश्चिम क्षितिजावर सूर्य मावळल्यानंतर आपल्याला तेजस्वी शुक्र दिसत आहे. अगदी लहान दुर्बणिीतून सुद्धा तुम्हाला याच्या कला दिसू शकतील. तर त्या बघण्याचा तुम्ही अवश्य प्रयत्न करा.  
paranjpye.arvind@gmail.com