मालवेअरपासून संरक्षण

तुमच्या अँड्रॉइड फोनचे नियंत्रण मालवेअरमुळे हॅकर्सच्या हाती जाऊ शकते, ते जाऊ नये यासाठी एक नवीन साधन संशोधकांनी विकसित केले आहे.

मालवेअरपासून संरक्षण
तुमच्या अँड्रॉइड फोनचे नियंत्रण मालवेअरमुळे हॅकर्सच्या हाती जाऊ शकते, ते जाऊ नये यासाठी एक नवीन साधन संशोधकांनी विकसित केले आहे. नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पूर्वीच्या ‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेज संकेतावली लिहिण्यात सुधारणा केली आहे, कारण त्यातील वैगुण्याचा वापर करून मालवेअर तयार केले जाते. अँड्रॉइडचे बरेचसे अ‍ॅप्लिकेशन हे ‘जावा’ भाषेत लिहिलेले असतात, मालवेअरमुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाइलमध्ये हॅकर्सला तुमच्या स्मार्टफोनचा ताबा घेण्याची संधी मिळते. ते टाळण्यासाठी ‘प्रॅक्टिकल रूट एक्सप्लॉइट कंटेन्मेंट’ हे नवीन सुरक्षा साधन तयार करण्यात आले असून सध्याच्या दोष सुधारणा पद्धतीत त्यामुळे बदल करण्यात आले आहेत. समजा, तुम्ही ‘अँग्री बर्ड’ हा गेम डाऊनलोड केला तर या साधनाच्या मदतीने डेटाबेसशी तो ताडून पाहिला जातो व तो नेमका कसा चालला पाहिजे याची आधीच चाचपणी केली जाते. जर त्यात काही दोष असेल तर तो लगेच ओळखला जातो. जर ते मालवेअर असेल किंवा हानिकारक नसलेले पण तरी वेगळेच अ‍ॅप्लिकेशन असेल तर ते रोखले जाते. कुठलेही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना त्यात मालवेअरचा समावेश आहे की नाही हे आधीच ओळखून ते रोखले जाते. यातील संशोधक डॉ.विल एंक यांनी सांगितले की, ‘सी’ भाषेच्या संकेतावलीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, कारण अँड्राइड रूट एक्सप्लॉइटस हे त्या भाषेत लिहिले जातात. त्यामुळे ‘फॉल्स पॉझिटिव्हची संख्या कमी होण्यास मदत होईल,’ असे डॉ. हेलन ग्यू यांनी सांगितले. अ‍ॅप्लिकेशन वर्तनचा डेटाबेस तयार करण्यासाठी गुगल प्ले व इतर विक्रेत्यांशी सहकार्य करण्याचा विचार आहे. अनेक अ‍ॅप विक्रेते त्यांच्या उत्पादनाची मालवेअर नाही हे तपासण्यासाठी छाननी करतात पण मालवेअर प्रोग्रॅमर्स फार हुशार आहेत; ते या छाननीत सापडणार नाहीत अशा पद्धतीने मालवेअर लपवतात व जेव्हा वापरकर्ता ते डाऊनलोड करतो व स्मार्टफोनवर पाहतो तर मालवेअर त्यात आलेले असते. प्रत्येक अ‍ॅपच्या सुरळीत वर्तनाचा डेटाबेस तयार करण्यात येणार असून तो पीआरईसी सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट केला जाईल, पण त्यात कंपन्यांच्या छाननी प्रक्रियेवर कुठलाही परिणाम मात्र होणार नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

राजस्थानातही फुलांचे नंदनवन
राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर येतो वाळवंटी भाग. रखरखीत ऊन. पण आता या राज्यातही लवकरच एक आल्हाददायक रूप दिसणार आहे. राजस्थानातील काही निवडक जिल्ह्य़ांत शोभेच्या फुलांची लागवड केली जाणार आहे. आर्किड, बर्ड पॅरेडाइज, अंथुरियमसारखी फुले राजस्थानचं रूपडं आणि अर्थव्यवस्थाही पालटणार आहेत. झेंडू, गुलाब, जस्मीन यांसारखी फुले राज्यात आताही आहेत, पण ती काही भागापुरती मर्यादित आहेत. आता जयपूर, बरण, बुंदी, सिरोही-अल्वर, अजमेर यांसारख्या भागांत जरबेरा,  बर्ड पॅरेडाइज, रजनीगंधा, टय़ुलिप, लिलियम, आर्चिड, अंथुरियम या शोभेच्या फुलांची लागवड होणार आहे. विवाह समारंभ व इतर छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमातही फुलांची मागणी मोठी असते. ती राज्यातील फूल उत्पादकच पूर्ण करतील. त्यासाठी शेतक ऱ्यांना फुलझाडांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राजस्थानातील फुले राज्याबाहेरही विकण्याचा प्रस्ताव आहे. जयपूर-दिल्ली महामार्गावर बेररोर येथे दोन महिन्यांत लिलियम व टय़ुलिप फुलांची बागच ४० हेक्टर क्षेत्रावर फुलवली जाणार आहे. नेहमीच्या काळात जयपूरच्या बाजारपेठेत ५० हजार किलो इतकी फुलांची मागणी असते.
सध्या पुष्कर, जयपूर, कोटा, भरतपूर या भागांत फुलझाडांची लागवड करण्यात येते. पुष्कर हा भाग गुलाबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सध्याच्या फुलझाडांच्या शेतीतून शहरातील मंदिरे व राज्यातील फुलांची गरज भागवली जाते. पुष्करचे गुलाब अजमेर दग्र्याच्या बाजारात जातात. झेंडू व इतर फुले मथुरा, वृंदावन व वाराणसी या उत्तर प्रदेशातील भागात जातात.

‘शक्तिमान’ यंत्रमानव
यंत्रमानव क्षेत्रातील प्रगती दिवसेंदिवस वाढते आहे. यंत्रमानव अनेक जोखमीची कामे करतात. इटलीच्या परसेप्च्युअल रोबोटिक्स लॅबोरेटरी या प्रयोगशालेने ‘बॉडी एक्सटेंडर’ नावाचा महायंत्रमानव तयार केला आहे. तो एका हातात ५० किलो वजन उचलू शकतो. सामान्य माणसापेक्षा त्याची शक्ती दहापटीने अधिक आहे. हा यंत्रमानव तुम्ही अंगावर परिधान करून शक्तिमान होऊ शकता. पेरक्रो प्रयोगशाळेचे फॅबियो सालसेडो यांनी या यंत्रमानव प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. यात मानवी शरीराच्या गुंतागुंतीच्या हालचालींचे अनुकरण तर केले आहेच पण त्याची शक्तीही दहापट आहे. त्याचे हात-पाय धातूच्या चौकटीत बसवलेले असून पाठीला नाळेसारखी केबल जोडलेली आहे. हा यंत्रमानव विद्युत मोटारीवर चालतो. विमान उत्पादन किंवा इतर गुंतागुंतीच्या कामात या लवचीक यंत्रमानवाचा उपयोग होतो. भूकंपाच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीही या यंत्रमानवाचा उपयोग होतो. शिवाय, ज्या व्यक्तीला बाहेर काढायचे त्याला कुठलीही इजा होऊ न देता तो तिला बाहेर काढतो. तर असा हा शक्तिमान यंत्रमानव केवळ वजन उचलण्याच्याच कामाचा आहे, असे नाही तर माणूस करू शकणार नाही इतक्या लवचीकतेने तो गुंतागुंतीची कामेही करतो.

डीएनएवर शेक्सपिअरचे सुनीत काव्य
ब्रिटनमधील प्रख्यात समीक्षक सॅम्युअल जॉनसन यांनी विल्यम शेक्सपियरची नाटके म्हणजे जीवनाचा आरसा आहेत, असे म्हणून ठेवले आहे, पण आता ब्रिटिश वैज्ञानिकांनी त्याची १५४ सुनीते (एक काव्यप्रकार) डीएनएच्या सूक्ष्मधाग्यात संचित केली आहेत. एक प्रकारे हा आरसा त्यांनी प्रत्यक्ष जीवनाशीच एकरूप केला आहे. युरोपियन बायोइनफॉम्रेटिक्स इन्स्टिटय़ूटच्या इवान बिरनी व निक गोल्डमन यांना पबमध्ये बीअर पिता पिता ही कल्पना सुचली. आपण माहिती साठवण्यासाठी हार्ड ड्राइव्ह वापरतो पण त्यात बरीच वीज खर्च होते, त्यापेक्षा ही माहिती डीएनएमध्ये साठवली तर किती बरे होईल अशी ती कल्पना होती. डीएनए हा निसर्गाचा हार्ड ड्राइव्ह आहे व त्यात रासायनिक भाषेत माहिती साठवलेली असते. ए, सी,जी, टी या न्यूक्लिओटाइडमधून ती साठवता येते. ही न्यूक्लिओटाइड्स अनेकविध प्रकारे रचल्यानंतर पेशींना त्यातून वेगवेगळ्या सूचना मिळतात. ३ अब्ज अक्षरांचा मिळून मानवी जनुकीय संकेत आराखडा बनतो. संगणकातील हार्ड ड्राइव्हपेक्षा हा डीएनएचा नसíगक हार्ड ड्राइव्ह फार आटोपशीर असतो. डीएनएमध्ये डिजिटल माहिती साठवणे हे गोल्डमन व सहकाऱ्यांपुढे आव्हान होते. दुसरी बीअर घेता-घेता त्यांनी नॅपकिनवर हे कसे करता येईल त्याचे उत्तर लिहायला सुरुवात केली. त्यांनी शेक्सपिअरच्या सुनीतांची टेक्स्ट फाइल बनवून ती संगणकाच्या मूळ ० व १ च्या भाषेतून डीएनएच्या ए, सी,जी, टी या अक्षरांच्या संकेतावलीत रूपांतरित केली. मार्टनि ल्यूथरचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे प्रेरणादायी भाषणही असेच डीएनए संकेतावलीत लिहिले. हा सगळा ऐवज त्यांनी अँजिलेंट टेक्नॉलॉजीज या जैवतंत्रज्ञान कंपनीला पाठवला, त्यांनी डीएनए संश्लेषण पद्धत वापरून ती माहिती भरली. मानवाने आतापर्यंत केलेले सर्व लिखाण म्हणजे अंदाजे ५० अब्ज मेगाबाइट्स जर डीएनएमध्ये भरायचे ठरवले तरी त्याचे वजन ग्रॅनोला बारपेक्षा कमी भरेल. फक्त त्यासाठी खर्च मात्र जास्त येईल एका मेगाबाइटला १२,४०० डॉलर इतका प्रचंड खर्च त्यात येईल. त्यामुळे सध्या तरी डीएनए संश्लेषण तंत्राने माहिती साठवणे महागडे आहे. पण डीएनए संश्लेषणाचा खर्च दिवसागणिक कमी होत असल्याने कालांतराने माहिती साठवणुकीसाठी हे तंत्र सहज वापरता येईल, माहिती साठवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा हार्ड ड्राइव्हचे ढीग मांडून बसावे लागणार नाही, अगदी आटोपशीर पद्धतीने माहिती साठवता येईल.

पाण्यापासून वाइन
मध्यंतरी आपल्याकडे धान्यापासून वाइन तयार करायची की नाही, यावरून बरीच वाद-चर्चा झाली होती. पण ‘वाइन म्हणजे दारू’ असा समज करून देण्यात आल्याने द्राक्षापासून वाइन करण्याच्या उद्योगालाही त्यात फटका बसला. आता वैमानिकांनी पाण्यापासून वाइन तयार करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. मिरॅकल मशीन नावाने प्रसिद्ध असलेल्या या यंत्रात तीन दिवसांत पाण्यापासून वाइन बनते फक्त त्यात काही घटक मिसळावे लागतात. ही वाइन  
२ डॉलरला उपलब्ध होत आहे. नेहमीची वाइन तयार करण्यास २० डॉलर खर्च येतो. मिरॅकल मशीनमध्ये आंबविण्याची प्रक्रिया करणारा एक कक्ष असतो. त्यात पाणी व द्राक्षाचा अर्क यिस्ट व विशिष्ट प्रकारची पूड टाकली, की तीन दिवसांत आपोआप वाइन तयार होते. या आंबवण्याच्या कक्षात विद्युतसंवेदक, ट्रान्सडय़ुसर्स, हीटर, पंप्स वापरून योग्य स्थिती निर्माण करून मिश्रण आंबवले जाते. यात ब्ल्यूट्रथच्या माध्यमातून एक अ‍ॅपही वापरले जाते ते या वाइन बनविण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण करते. तुमच्या आवडीची वाइन निवडण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. तुम्हाला हव्या त्या घटकांची वाइन तुम्ही करू शकता. यात जी पूड वापरली जाते त्यात ग्रोक व इतर स्वाद असतात त्यामुळे ही वाइन जुनी असल्याचा आभासही निर्माण करता येतो. २४ किंवा त्याहून थोडय़ा अधिक तासांनी याला जोडलेले अ‍ॅप तुम्हाला वाइन तयार झाल्याची पूर्वसूचना देते. या वाइन बनविण्याच्या यंत्राची किंमत ४९९ डॉलर्स आहे. वाइनतज्ज्ञ केव्हिन बॉयर यांनी हे यंत्र बनविले आहे. बॉयर यांनी नापा व्हॅलीत वायनरी स्थापन केली आहे. न्यूयॉर्क येथे राहणारे ब्रिटिश उद्योजक फिलीप जेम्स यांचे सहकार्यही या वाइन यंत्रनिर्मितीत  लाभले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sciece and technology