जेसन रॉयची ४४ चेंडूंत ७८ धावांची खेळी : न्यूझीलंडवरील विजयासह अंतिम फेरीत
जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जेसन रॉयच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रॉयल विजय साकारला. नाणेफेकीच्या कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडने धोकादायक न्यूझीलंडला १५३ धावांत रोखत पहिला टप्पा जिंकला. स्पर्धेत आतापर्यंत शिस्तबद्ध मारा करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत जेसन रॉयने ४४ चेंडूंत ७८ धावांची दिमाखदार खेळी साकारली. या खेळीच्या बळावरच ७ विकेट्सनी विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. गुरुवारी होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेत्याशी इंग्लंडचा ३ एप्रिलला मुकाबला होईल. अफलातून खेळीसह संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रॉयलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
छोटय़ा धावसंख्येचा बचाव करण्यात न्यूझीलंडचा संघ वाकबगार असल्याने इंग्लंडच्या सलामीच्या जोडीकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. जेसन रॉयने पहिल्याच षटकात चार चौकार वसूल करत इरादे स्पष्ट केले. न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाच्या आक्रमणावर चौकार, षटकारांची लयलूट करत रॉयने धावगतीचे दडपण वाढणार नाही याची काळजी घेतली. इश सोधीच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत रॉयने ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या अर्धशतकाची नोंद केली. ८३ धावांच्या सलामीनंतर अ‍ॅलेक्स हेल्सला मिचेल सँटनरने बाद केले. त्याने २० धावा केल्या. इश सोधीनेच रॉयचा झंझावात रोखला. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांसह वेगवान खेळी साकारली. रॉयच्या जागी फलंदाजीला आलेला कर्णधार इऑन मॉर्गन पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. या स्थितीतून न्यूझीलंड पुनरागमन करणार असे चित्र होते. मात्र जो बटलर (१७ चेंडूंत ३२) आणि जो रूट (२२ चेंडूंत २७) यांनी चौथ्या विकेटसाठी २९ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी न्यूझीलंडची १ बाद ८९ अशा स्थितीतून घसरगुंडी होऊन त्यांना केवळ १५३ धावांची मजल मारता आली. मार्टिन गप्तीलने तीन चौकारांसह धडाकेबाज सुरुवात केली. मात्र डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या. यानंतर केन विल्यमसन आणि कॉलिन मुन्रो जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. एकेरी, दुहेरी धावा आणि चौकार, षटकारांची सुरेख सांगड घालत या जोडीने धावफलक हलता ठेवला. मोइन अलीने विल्यमसनचा अडसर दूर केला. त्याने ३ चौकार आणि एका षटकारासह २८ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. लायम प्लंकेटने मुन्रोला बाद करत न्यूझीलंडला धक्का दिला. मुन्रोने ३२ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी साकारली. हे दोघे बाद होताच न्यूझीलंडच्या डावाची घसरण झाली. कोरे अँडरसनने एका बाजूने किल्ला लढवत २३ चेंडूत २८ धावा केल्या. इऑन मॉर्गनच्या अफलातून झेलामुळे अनुभवी रॉस टेलरला तंबूत परतावे लागले. त्याने ६ धावा केल्या. ग्रँट एलियट, ल्युक राँची, मिचेल सँटनर आणि मिचेल मॅक्लेघान यांच्यापैकी एकालाही उपयुक्त खेळी करता आली नाही. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. डेव्हिड विली, लायम प्लंकेट, ख्रिस जॉर्डन आणि मोइन अली यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १५३ (कॉलिन मुन्रो ४६, केन विल्यमसन ३२, कोरे अँडरसन २८; बेन स्टोक्स ३/२६) पराभूत विरुद्ध इंग्लंड : १७.१ षटकांत ३ बाद १५९ (जेसन रॉय ७८, जोस बटलर ३२*; इश सोधी २/४२)
सामनावीर : जेसन रॉय