टेनिसमध्ये समान मानधनासाठी चळवळ तीव्र झालेली असतानाच क्रिकेटमध्येही हे विचार गती घेऊ लागले आहेत. महिला संघांनाही समान मानधन आणि सोयीसुविधा मिळाव्यात, अशी आग्रही भूमिका भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलर यांनी घेतली.
‘‘खेळ एकच आहे. नियमही समान आहेत. मात्र पुरुषांच्या सामन्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकसंख्येत प्रचंड तफावत आहे. कारण या सामन्यांचे मनोरंजनाचे पॅकेज म्हणून विचार केला जातो. प्रचंड चाहते पुरुषांच्या लढती पाहतात, साहजिकच पैसा उपलब्ध होतो. महिलांचे क्रिकेटही असते याची लोकांना जाणीव होते आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत महिलांची कामगिरी चांगली झाली, चाहत्यांची संख्या वाढली तर मिळणाऱ्या पैशातही वाढ होऊ शकते’, असे मितालीने सांगितले.
समान मानधनाबाबत स्टेफनी टेलरला विचारले असता ती म्हणाली, ‘पुरुषांएवढीच बक्षीस रक्कम मिळाली तर आम्हाला आनंद होईल. पुरुषांप्रमाणे आम्हीही प्रचंड मेहनत घेऊन खेळतो.’’