बांगलादेशवर ७५ धावांनी मात
कर्णधार केन विल्यमसनची दमदार खेळी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर ७५ धावांनी विजय मिळवला. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असली विल्यम्सनच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला १४५ धावांचा पल्ला गाठता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव अवघ्या ७० धावांमध्येच संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने साखळी फेरीत विजयी चौकार पूर्ण केला, तर दुसरीकडे बांगलादेशला रित्या हातीच मायदेशी परतावे लागले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इडन गार्डन्सच्या अवघड खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांना सहजपणे धावा करता आल्या नाहीत. मार्टिन गप्तीलऐवजी संधी मिळालेला हेन्री निकोल्स ७ धावा करुन तंबूत परतला. केन विल्यम्सनने कॉलिन मुन्रोच्या साथीने डाव सावरला. ३२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावांची खेळी करून विल्यमसन तंबूत परतला. मुन्रो आणि रॉस टेलर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. अल अमीन होसेनने मुन्रो (३५) आणि कोरे अँडरसन (०) यांना बाद करत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. अल अमीननेच अनुभवी रॉस टेलरला २८ धावांवर बाद करत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. टेलर बाद होताच न्यूझीलंडच्या उर्वरित फलंदाजांनी मुस्ताफिझूर रेहमानच्या भेदक गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. न्यूझीलंडचा सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. न्यूझीलंडला केवळ १४५ धावांचीच मजल मारता आली. मुस्ताफिझूरने २२ धावांत ५ बळी घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
स्पर्धेतील पहिल्यावहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणारा बांगलादेशचा संघ हे माफक आव्हान पेलत चमत्कार घडवणार असे चित्र होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. एकाही फलंदाजांला मोठी खेळी करता आली नाही आणि त्यांचा डाव अवघ्या ७० धावांतच गडगडला.
शुवागता होमने सर्वाधिक १६ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ग्रँट एलियट आणि इश सोधी यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. या विजयासह छोटय़ा धावसंख्येचा बचाव कसा करायचा याचा आणखी एक वस्तुपाठ न्यूझीलंडने सादर केला. ४२ धावांची खेळी करणाऱ्या केन विल्यमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १४५ (केन विल्यमसन ४२, कॉलिन मुन्रो ३५, रॉस टेलर २८, मुस्ताफिझूर रेहमान ५/२२) विजयी विरूद्ध बांगलादेश : १५.४ षटकांत सर्वबाद ७० (शुवागता होम १६, ग्रँट एलियट ३/१२, इश सोधी ३/२१)
सामनावीर : केन विल्यम्सन