भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो अंतराळात सातत्यान नवनवे पराक्रम गाजवतेय. अंतराळातून इस्रोसाठी नुकतीच एक चांगली बातमी आली आहे. इस्रोच्या सौरमोहिमेला मोठं यश मिळालं असल्याची ही बातमी इस्रोने एक्स (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने आदित्य एल-१ ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत भारताने गेल्या महिन्यात २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवलं. आता या अवकाशयानाने त्याच्या प्रवासातील दुसऱा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

इस्रोने नुकतीच माहिती दिली आहे की, आदित्य एल-१ या अवकाशयानाने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर इतकं अंतर पार केलं आहे. आता आपलं अवकाशयान एल-१ बिंदूचा शोध घेत आहे. आदित्यने पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकलं आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाणारं भारताचं हे आतापर्यंतचं दुसरं अवकाशयान आहे. यापूर्वी भारताने आपलं मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर पाठवलं होतं. त्यापाठोपाठ आता आदित्य एल-१ या अवकाशयानाने पृथ्वीचं प्रभावक्षेत्र ओलांडलं आहे.

इस्रोने १९ सप्टेंबर रोजी जाहीर केलं होतं की, आदित्य एल-१ ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत लॅरेंज पॉईंट १ च्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. इथून पुढे आदित्य एल-१ ला १०० ते १०५ दिवस प्रवास करायचा आहे. इस्रोच्या मते ४ जानेवारी रोजी हे यान एल-१ बिंदूपाशी जाऊन स्थिरावेल.

हे ही वाचा >> विश्लेषण: विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर ‘जागण्या’च्या आशा धूसर? चंद्रयान-३ मोहीम संपुष्टात येणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर सुरुवातीचे १६ दिवस आदित्य एल-१ हे अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत होतं. १९ सप्टेंबर रोजी या अंतराळयानाने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलली आणि एल-१ च्या दिशेने प्रवास केला. एखाद्या गोफणीप्रमाणे या यानाने त्याच्या कक्षा बदलल्या. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. सुमारे १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भारताचं हे यान ‘एल-१’ या बिंदूपाशी पोहोचेल. या संपूर्ण प्रक्रियेला १२५ दिवसांचा कालावधी लागेल.