Chandrayaan-3 Vikram Lander Activation: भारताच्या यशस्वी चांद्रमोहिमेचा आज अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. चंद्रावर १४ दिवसांच्या अंधारानंतर आता प्रकाशकिरण पोहोचत असताना चांद्रयान तीन मोहिमेचे शिलेदार विक्रम लॅण्डर व प्रज्ञान रोव्हर आज पुन्हा झोपेतून जागे होणार आहेत. विक्रम व प्रज्ञान दोघांना १४ दिवसांपूर्वी स्लीप मोड वर टाकण्यात आले होते. ISRO आज पुन्हा एकदा विक्रम व प्रज्ञानशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील १४ दिवसांसाठी ही दोन्ही उपकरणे सक्रिय करून चंद्रावरील अन्य संशोधनांची गती वाढवण्याचा इस्रोचा मानस आहे. मात्र तत्पूर्वी आजचा दिवस हा अत्यंत कठीण व परीक्षेचा असणार आहे. ISRO चे माजी चेअरमन जी माधवन नायर यांनी ANI शी बोलताना विक्रम व प्रज्ञान यांना पुन्हा सक्रिय करण्यातील अडथळ्यांची माहिती दिली आहे.

जी. माधवन नायर सांगतात की, “विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हर आता जवळजवळ दोन आठवड्यांपासून गाढ झोपेत आहेत. आता त्यांना रीचार्ज करणं म्हणजे फ्रीझरमधून एखादी वस्तू बाहेर काढून वापरायला घेण्यासारखं आहे. या दोघांचे तापमान -१५० अंश सेल्सिअस च्या खाली गेले असणार आहे. त्या तापमानात बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रणा टिकून राहणे कठीण असते.

अर्थात, अशा स्थितीसाठी प्रक्षेपणाच्या आधीच पृथ्वीवर पुरेशा चाचण्या केल्या गेल्या आहेत. सौर उष्णतेमुळे उपकरणे आणि चार्जरच्या बॅटरी सक्रिय होण्यास मदत होईल आणि जर ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली, तर विक्रम व प्रज्ञानची प्रणाली पुन्हा पुढील १४ दिवसांत आणखी काही अंतर फिरून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागावरील अधिक डेटा गोळा करू शकते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद्रयान ३ विक्रम लॅण्डर झोपेतून जागा होणार का?

दरम्यान, यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी, विक्रम लॅण्डरचा अपडेट चांद्रयान २ च्या ऑर्बिटरकडून आला होता. चंद्राभोवती आधीपासूनच असलेल्या चांद्रयान-2 ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या विक्रमचे फोटो काढले होते. आज पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष विक्रम व प्रज्ञानकडे असणार आहे.