गेल्या काही वर्षांत मेसेजिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी अॅप्सवर स्पॅम कॉल, मेसेज यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. वापरकर्ते असे कॉल, मेसेज बऱ्याचदा दुर्लक्ष करतात किंवा ब्लॉक करतात. पण, काही असे संपर्कसुद्धा असतात; जे बऱ्याचदा एक नंबर ब्लॉक केला की, दुसऱ्या नंबरवरून कॉल, मेसेज करण्याचा प्रयत्न करतात. तर हे सर्व प्रकार बऱ्याचदा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांबरोबर जास्त प्रमाणात घडताना दिसून येतात; जे अगदीच त्रासदायक व धोकादायक असू शकतात.
तर ही बाब लक्षात घेता आता, व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. ॲण्ड्रॉइड आणि आयफोनच्या वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनच्या लॉक स्क्रीनवरून संपर्क (Contact ) ब्लॉक करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जेव्हा तुमच्या फोनमध्ये एखादा नंबर सेव्ह नसेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती, एखाद्या फ्रॉड कंपनीकडून तुम्हाला संदेश आला असेल. तेव्हा व्हॉट्सॲप तुम्हाला उत्तर देण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी स्क्रीनवर दोन नोटिफिकेशन देईल.
तुम्ही संपर्क क्रमांक ब्लॉक करणे हा पहिला पर्याय निवडला, तर नेहमीप्रमाणे तुम्हाला यापुढे ती व्यक्ती मेसेज करू शकणार नाही. तसेच जर तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे ‘ब्लॉक आणि रिपोर्ट करणे’ हा पर्याय निवडला, तर त्या व्यक्तीकडून पाठविण्यात आलेले शेवटचे पाच मेसेज कारवाईसाठी व्हॉट्सॲपकडे पाठविले (Forward) जातील.
आतापर्यंत व्हॉट्सॲपवर सेव्ह न केलेला संपर्क ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला चॅट लिस्ट किंवा वैयक्तिक (पर्सनल) चॅट्स ओपन करून त्या संपर्काला ब्लॉक किंवा रिपोर्ट करावे लागायचे. पण, आता नवीन अपडेटसह व्हॉट्सॲप तुम्हाला ॲप न उघडता, पर्सनल चॅट्समध्ये न जाता एखाद्या संपर्काला नोटिफिकेशनद्वारे ब्लॉक किंवा रिपोर्ट करण्याची परवानगी देईल. या अपडेट्सबद्दल व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाउंटद्वारे सांगण्यात आले आहे. एकंदरीतच हे फीचर कसे काम करील याची मजकूर आणि फोटोद्वारे झलक दाखविण्यात आली आहे. त्यामुळे हे फीचर वापरकर्त्यांसाठी लवकरच रोलआऊट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.