09 March 2021

News Flash

स्वाइप टेलिकॉम व्हेलॉसिटी टॅब

वजनाला हलका आणि वेगवान डय़ुएल कोअरस्मार्ट रिव्ह्य़ू यंदाच्या दिवाळीमध्ये मोबाईल फोनच्या विक्रीबरोबरच टॅबलेटस्ची विक्रीही चांगल्यापैकी झाली. येणाऱ्या महिन्यांमध्ये टॅब्जची विक्री अधिक वाढत जाईल, अशी अपेक्षा

| December 25, 2012 01:04 am

वजनाला हलका आणि वेगवान डय़ुएल कोअर

स्मार्ट रिव्ह्य़ू

यंदाच्या दिवाळीमध्ये मोबाईल फोनच्या विक्रीबरोबरच टॅबलेटस्ची विक्रीही चांगल्यापैकी झाली. येणाऱ्या महिन्यांमध्ये टॅब्जची विक्री अधिक वाढत जाईल, अशी अपेक्षा बाजारपेठेला आहे. त्यातही मध्यंतरी आलेल्या लाटेवर स्वार होऊन अनेक कंपन्यांनी सात इंची टॅब्ज बाजारात आणले. मात्र त्याचा आकार काहीसा लहान असल्याची प्रतिक्रियाही बाजारात उमटली. तर १० इंची टॅब्ज हे अधिक मोठय़ा आकाराचे असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळेच कदाचित स्वाइप टॅबने या दोन्ही आकारांच्यामध्ये असलेला ८ इंची टॅब्लेट बाजारात आणला आहे. खरे तर या टॅबचा असलेला आकार आणि इतर बाबी यांच्यामुळे त्याची तुलना अ‍ॅपलने अलीकडेच बाजारपेठेत आणलेल्या आयपॅड मिनीसोबत केली जाऊ शकते.
आठ इंची आयपीएस स्क्रीनसोबत असलेले १०२४ (गुणिले) ७६८ हे रिझोल्युशनही तितकेच महत्त्वाचे आहे. अँड्रॉइडची चौथी आवृत्ती ४.१ जेली बीन या टॅबमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून वापरण्यात आली आहे. या टॅबमधील सर्वादिक महत्त्वाची बाब म्हणजे हा डय़ुएल कोअर टॅब आहे. १.६ गिगाहर्टझ् सीपीयू आणि एक जीबी रॅम अशी त्याची रचना आहे. त्यामुळे कामाच्या बाबतीत तो वेगवान आहे.
टॅबच्या उजवीकडे मागच्या बाजूस सात विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. अगदी वरच्या बाजूस ऑन- ऑफचे बटन आहे. त्याच्याखाली चार्जिंग, हेडफोन, यूएसबी, एचडीएमआय डॉक व मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. त्या खाली एक बारिकचे छिद्र असून ते रिसेटसाठी देण्यात आले आहे.
टॅबला समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा १.३ मेगापिक्सेलचा आहे. तर मागच्या बाजूस असलेला कॅमेरा हा २ मेगापिक्सेलचा आहे. या टॅबला ८ जीबीची इंटर्नल मेमरी आहे. स्क्रीनसाठी फाइव्ह पॉइंट मल्टिटच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन बोटांचा वापर करून प्रतिमा लहान किंवा मोठी करता येते. टॅबसाठी ८०२.११ बी/जी/एन वाय- फाय कनेक्टिविटी देण्यात आली आहे.  हायडेफिनेशन स्क्रीनबरोबरच हायडेफिनेशन स्टिरिओ साऊंडही देण्यात आला आहे. अर्थात तो हेडफोनवर ऐकण्यातच अधिक मजा आहे. थ्रीजी सपोर्ट असला तरी त्यासाठी डुंगल मात्र आवश्यक आहे. याची सर्वात जमेची बाजू म्हणजे याचे वजन अवघे ४३७ ग्रॅम्स एवढेच आहे. रिचार्ज न करता टॅबची बॅटरी तब्बल १२ तास काम करते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र रिव्ह्य़ू दरम्यानचा कालवधी काहीसा कमी होता. अर्थात तरीही इतर टॅबच्या मानाने बॅटरीची क्षमता अधिक चांगली आहे.  
या टॅबवर गुगल प्लेस्टोअरवरील तब्बल साठ हजारांहून अधिक अप्स उपलब्ध आहेत. याचा समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा बऱ्यापैकी असला तरी मागच्या बाजूस असलेला कॅमेरा हा तेवढासा चांगला नाही. त्यावरील चित्रण सुस्पष्टतेच्या बाबतीत तेवढे समाधानकारक नाही. मात्र एकूण किंमतीचा विचार करता या किंमतीस बाजारात उपलब्ध असणाऱ्या टॅब्जच्या बाबतीत हा तसा उजवा वाटावा, असा टॅब आहे. अगदी सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे आयपॅड मिनीसोबत याची तुलना करायची तर अ‍ॅपलच्या आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये मिळणारा एक सुखद अनुभव वगळता हा टॅब चांगला वाटावा, असा आहे.

जमेच्या बाजू
*    उत्तम वेगवान डय़ुएल कोअर प्रोसेसर
*    अँड्रॉइड जेली बीन ऑपरेटिंग सिस्टिम   चांगली बॅटरी क्षमता
*    ८ इंचाचा आयपीएस स्क्रीन
काही मर्यादा
*    अधिक किंमत
*    जीपीएस व ब्लूटूथचा अभाव
*    सध्याचा जमाना सिम टॅबचा आहे. आणि यात सिम कार्डाची सोय नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 1:04 am

Web Title: velocity tab swipe telecom
टॅग : Tech It
Next Stories
1 आयबॉल डय़ुएल सिम थ्रीजी टॅब एफएमसह!
2 भारतीय रस्त्यांसाठी गार्मिन नुवी ४० एलएम
3 ऑफिससाठी.. एप्सन इबी- झेड १००००
Just Now!
X